…तो प्रसंग आठवला की आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो!

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात महाआरोग्य शिबीराचं वारं वाहतंय. उस्मानाबादमध्येही असंच एक शिबीर नुकतंच पार पडलं. या शिबीरात घडलेली एक घटना मनाला चांगलीच चटका लावून गेली. 

महाआरोग्य शिबीराच्या आठ दिवस अगोदर आमची विविध प्राथमिक आरोग्य केंद्रं, ग्रामीण रुग्णालयं, जिल्ह्यातील शाळा आणि आसपासचे पाडे याठिकाणी ड्युटी लावण्यात आली होती. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत याठिकाणी जाऊन पेशंट स्क्रिनिंग करुन शेवटच्या दिवशी उस्मानाबादला बोलवायचे असं शेड्यूल होतं.

मोफत वैद्यकीय तपासणी म्हटल्यावर संपूर्ण गाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लोटलेला असायचा. त्यामुळे पेशंट आले, की हातातला केस पेपर घेऊन नेहमीच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु व्हायची…

“काय होतंय? केव्हापासून होतंय? पूर्वीचे काही आजार आहेत का? काही औषधे सुरू आहेत का?” वगैरे… वगैरे…

त्यादिवशी एक मुलगी आली. मी केसपेपर हातात घेत नेहमीप्रमाणे तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली…

“काय होतंय?”

“ताप येतोय”, तिनं दबक्या आवाजात सांगितलं.

“केव्हापासून?”

“लई दिवस झाले…” आईकडे चोरटा कटाक्ष टाकत ती पुटपुटली…

मी थोडा आवाज वाढवून… “लई… म्हणजे किती दिवस?”

मुलगी खाली मान घालून,” झाले असतील 2 महिने…”

“मग काही औषधोपचार घेतले की नाही?”, मी थोडं गांभीर्यानंच विचारलं…

ती पुन्हा नजर चोरत,” हो घेतले पण तेवढ्या पुरतंच कमी होतंय…”

ती खाली मान घालून बोलत होती मात्र मागे तिच्या आईची अव्याहत बडबड सुरु होती.

” त्या बाईला तर मी उद्या भेटतेच… पोरींना कामाला लावती व्हय… पोरी काय हिच्या घरच्या आहेत का? पोरींना आई-बाप शिकायला पाठवतात की ह्या सटवीची कामं करायला???”

मला त्यांच्या बोलण्याचा रोख समजला नाही, मी न राहवून त्यांना विचारलं,” कोण बाई?… कोण कामाला लावतं मुलींना?”

माझ्या प्रश्नासोबत मुलीच्या आईचा आवाज वाढला… “बघा ना मॅडम, आम्ही दिवस रात्र कष्ट करून पोरीला शाळेत शिकायला पठवतो अन् शाळेत पोरींना कामाला लावत्यात…”

“कसलं काम?”

“शाळेतल्या बाई पोरींना संडास-बाथरुम धुवायला लावत्यात…”

मुलीच्या आईचं कथन ऐकून मला तर धक्काच बसला…

मी मुलीला विचारलं,”काय गं खरं आहे का हे?”

मुलीने घाबरुन मान डोलवत होकार दिला…

मुलीच्या आईने सांगायला सुरुवात केली… “शाळेत नेहमीच पोरींना वर्ग धुणे, शाळेतील संडास बाथरुम धुणे, वरंडा झाडणे आणि धुणे अशी कामं लावली जातात… अशी कामं केली म्हणून पोरी आजारी पडतात…”

मुलीसोबत बोलत बोलत मी शाळेचं नाव, मुलीचं नाव आणि शिक्षिकेचं नाव लिहून घेतलं… आईला शाळेत तक्रार करायला सांगितली… “असली कामं करायला पोरीला शाळेत पाठवत नाहीत, असं त्यांना ठणकावून सांगा,” असं मुलीच्या आईला बोलायला सांगितलं.

आई आणि मुलीसोबत बोलण्यात मागची गर्दी खोळंबली होती… तिकडे लक्ष जाताच मुलीला योग्य औषधोपचार सुरु करुन 3 दिवसांनी पुन्हा दाखवून घे, असं सांगितलं आणि पुढच्या पेशंटचा केसपेपर हातात घेतला.

दिवसामागून दिवस उलटले मात्र त्या मुलीचा चेहरा काही माझ्या डोळ्यासमोरुन जात नव्हता. शेवटी हा प्रसंग लिहायचं ठरवलं. आपल्याकडील शिक्षण व्यवस्था आणि तिचं वास्तव अजूनही किती भयानक आहे हे लिहिताना माझ्या अंगावर काटा आल्याशिवाय राहिला नाही…

 

लेखिका- डॉ. अश्विनी पाटील-वर्पे, ashwinitpatil1991@gmail.com