मुलगी झाली यात बिचाऱ्या एकट्या अलकाचा दोष काय???

आयुष्यात काही गोष्टी मनात मोठं वादळ निर्माण करून जातात. बी.ए.एम्.एस. पुर्ण झाल्यानंतर अंतरवासियता प्रशिक्षण घेत असताना खूप शिकायला मिळते… पण त्यासोबतच अनेक चांगले आणि वाईट अनुभवही येतात…

त्यादिवशी स्त्रीरोग प्रसुती तंत्र विभागात पहिला दिवस… रात्री उशिर झाला अर्थात लेबर रूममध्ये केव्हा रात्र झाली कळलंच नाही… पण काम केल्याचं समाधान होतं… रुमवर जाऊन पेटपुजा केली आणि केव्हा स्वर्गात गेल्यासारखी झोप लागली कळालेच नाही. सकाळी धावपळ करत आंतररुग्ण विभागात पोहोचले… राऊंड चालू होता… अलका थोडी नाराज दिसत होती… मी मात्र तिच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून मोठ्या उत्साहात विचारलं,

” अलका, काय म्हणतंय बाळं?”  तिने उत्तर दिलंच नाही…  मला वाटलं रात्रीचं डिलीव्हरी झालीये काही त्रास होत असेल. मग तिला थोडं आश्वासक शब्दाने व प्रेमळ स्पर्शाने सावरत विचारलं, ” काय त्रास होतोय अलका?, पोटात दुखतंय का?, भूक लागली का?, काही खायचंय का तुला?, चहा आणू का तुला?”

तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मला काही कळायला मार्ग नव्हता… मी आजूबाजूला पाहत सिस्टरला नातेवाईकांना भेटण्यासाठी बोलवायला सांगितले… सिस्टरने हातातलं काम न चुकवता उत्तर दिलं,  ” नातेवाईक रात्रीच न सांगता निघून गेले… रात्री सोबत कुणीचं नव्हतं…”

मी थक्कच झाले… असं कसं होऊ शकतं??? अलकाची रात्रीच डिलिव्हरी झाली… तिला आता ह्या अवस्थेत तिच्या जवळच्या लोकांची किती गरज आहे… नवरा, आई, सासू… ह्या अवस्थेत कुणी सोबत असेल तर एक मानसिक आधार असतो… एक मानसिक समाधान असतं… काल संध्याकाळ पासून प्रसुतीच्या वेदनेने विव्हळणारी अलका रात्री शांत होईल वाटलं होतं… मात्र ती आता पण विव्हळत होती प्रसुतीच्या कळांनी नाही, तर जवळच्यांच्या आधारासाठी… अलकाला उठवून बसवलं… पाणी पाजलं… चहा मागवला… दोन बिस्कीट भरवली… बाळाला तिच्या मांडीवर टेकवलं… ती थोडी शांत झाली… मग दमानं विचारलं,

” काय झालंय अलका? तुझी सासू कुठे गेली? काल रात्री तर होती इथेच? मीच तिला बाळ आणि तू सुखरूप असल्याची गोड बातमी दिली… कुठे गेली ती?…” अलकाने डोळ्यातलं पाणी साडीच्या पदराने पुसलं आणि भरलेल्या आवाजात बोलली, ” रात्रीच गेली घरी… तुम्ही दिलेली गोड बातमी तिला ‘कडू’ लागली… नवऱ्याला सांगितलं… त्यानं परक्या माणसासारखं ऐकून फोन ठेवला… बाळ रात्री पासून रडतंय… काय करावं सुचेना झालंय… सकाळी सिस्टरच्या मोबाईल वरून फोन केला… आई ढसाढसा रडली… “बाळ मी येते रडू नकोस” म्हणत फोन ठेवला… अनु आणि मनु (अलकाच्या मुली) सकाळपासून बाळाला शांत करायचा प्रयत्न करताय… पण त्यांना काय उमगतंय… ”

मला कळालं रात्री सासूला गोड बातमी दिली,” काकू लक्ष्मी आलीये घरी…” पण तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला… ती पांढरी पडल्यासारखी माझ्या तोंडाकडे पाहत होती…” पण हे मला रात्री का नाही समजलं… हे सगळं कशामुळे तर अलकाला तिसरी मुलगी झाली म्हणून… अरे पण त्यात तिचा काय दोष??? दोष कोणाचाच नाही… ना अलकाचा… ना तिच्या निष्पाप, नवजात मुलीचा… पण ह्या डोळ्यांवर झापड घेतलेल्या लोकांना कोण सांगणार???

अलकाची आई दुपारी पोहोचली आणि रूग्णालयाच्या सगळा कागदोपत्री व्यवहार करून अलकाला सोबत घेऊन गेली… नंतर काय झालं माहिती नाही… माझी आणि अलकाची पुन्हा भेट झाली नाही… मात्र अनेकदा मला तिची आठवण येते… ‘स्त्री-पुरुष समानतेचा’ फेटा मिरवणाऱ्या आपल्या पुरुषप्रधान समाजाचा हा नकारात्मक दृष्टिकोन केव्हा बदलेल याची वाट पाहू नका… त्यासाठी काही तरी हालचाल करा… पुढे या… पाऊल उचला… एक ‘स्त्री’च स्त्री वरचं हे काळे ढग दूर करू शकते… कारण अलकाला रूग्णालयात एकटं सोडून जाणारी एक ‘स्त्री’ होती आणि तिला रुग्णालयातून घरी घेऊन जाणारीही एक स्त्रीच होती… ही परिस्थिती बदलण्यासाठी काही लोक आपल्यापरीने प्रयत्न करत आहे… त्यातील एक म्हणजे डॉ. गणेश राख… आपण पण पुढे यावूया आणि समाज परिवर्तन घडवू आणूया…

लेखिका- डॉ. अश्विनी पाटील-वर्पे, ashwinitpatil1991@gmail.com