अहो फडणवीस सांगा… लोकांनी तुम्हाला मत का द्यायचं???

महाराष्ट्रात कधी लोकप्रतिनिधींची तर कधी कार्यकर्त्यांची दिवसाढवळ्या हत्या केली जातेय. एक अल्पवयीन मुलगी आपल्या अब्रू रक्षणासाठी गच्चीवरून उडी मारतेय. ट्रेनमध्ये एक पुरुष महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न करतोय. तर कधी अल्पवयीन मुलींवर बलात्कार…अशा घटना ऐकून तळपायाची आग मस्तकात जातेय. अरे, हा नक्की जिजाऊंचा महाराष्ट्र आहे ना?मग असं का घडतंय? आपल्या महाराष्ट्रात? कोणी सांगेल का? या सर्व घटनांची तुलना यूपी-बिहारशी करता करता ते सुधारले असं वाटू लागलंय, पण आपलं काय? मिस्टर देवेंद्र फडणवीस द्याल का याचं उत्तर? या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची हिम्मत आहे का? गृहखातं आपल्याकडे आहे ना? मग सत्तेवर आल्यापासूनची पानं जरा चाळून बघा म्हणजे कळेल, की गृहखात्यानं काय दिवे लावले आहेत??

लोकांना ‘अच्छे दिन’चे वादे करत हेच दिवस पाहायचे तेवढे बाकी होते. रोज राज्यात बलात्कार, खून, दरोडे, हाणामारीच्या घटना सर्रास घडतायत.खरं तर हे ‘अच्छे दिन’ची लक्षणं नाहीएत, एकीकडे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’सारखे कार्यक्रम करुन महाराष्ट्राला वेगळी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न तुम्ही करताय पण दुसरीकडे काय? या सर्व घटना तुमच्या कारकीर्दीला नक्कीच ब्रेक लावणाऱ्या आहेत. कारण कायदा सुव्यस्थेचा अक्षरश: फज्जा उडाला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात काही वेगळी परिस्थिती होती अशातला भाग नाही, राज्यातली जनता त्यांच्या कारभाराला वैतागली होती म्हणून एक नवा पर्याय म्हणून 2014 मध्ये भाजपला सिंहासनावर बसवलं. पण 2015चा हा पुढचा अहवाल बघा…एनसीआरबीने म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचा अहवाल सादर केला त्यात महिलांवर सर्वात जास्त अत्याचार होणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत सत्तेवर आलात आणि आजही राज्य सुरक्षित नाहीय..ज्या राज्याची जनता सुरक्षित नाही त्या राज्यात छत्रपतीं शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाहीय, हे लक्षात ठेवा!!

2015 नंतर राज्यात परिस्थिती सुधारेल असं अपेक्षित होतं पण राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 2016 मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीत महाराष्ट्रात तब्बल 45 हजार 797 एवढ्या गुन्ह्यांची नोंद झाली होती, जी भाजप सरकारच्या काळात नक्कीच अपेक्षित नव्हती.पण तसं झालं… ही बाब महाराष्ट्रासाठी नक्कीच दुर्दैवी आहे. भाजप सरकारकडून अपेक्षा होत्या म्हणून जनतेनं सत्तेवर बसवलं पण फडणवीसांच्या गृहखात्यानं निराशा केली. त्यामुळे परिवर्तनाची लाट हळूहळू वाढताना दिसतेय. कारण इकडे माझ्या राज्यात ज्या सरकारवर विश्वास ठेवला त्याच सरकारच्या काळात माझी आई-बहिण सुरक्षित नाहीय तर या सरकारला परत संधी का द्यावी???

२०१७ला राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केलाला अहवाल तर भाजप सरकारला काळीमा फासणारा ठरला. 2017 मध्ये आपल्या तब्बल 49 हजार माता-भगिनी बेपत्ता झाल्या. महिला बेपत्ता होण्याच्या यादीत महाराष्ट्र अव्वल होता. किती लाजिरवाणी गोष्ट आहे? या महिलांचं काय झालं? कुठे आहेत? गृहमंत्र्यांनी जनतेला उत्तर द्यावी आणि सांगावं, की “बाबांनो आम्हाला अच्छे दिन आणता आले नाहीत, आम्हाला माफ करावं.”

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सत्तेवर आलात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं राजकारण करतायत, ज्या शाहू-फुलेंनी महाराष्ट्रात समता नी ममतेची ज्योत जागवली, आज त्याच छ्त्रपतींच्या, आंबेडकरांच्या, शाहू, फुलेंच्या महाराष्ट्रात आमचे माय-बापच सुरक्षित नाहीएत, आमची घराबाहेर गेलेली मुलं सुखरुप परत येईल का? या चिंतेत आई-बाप ग्रासले गेलेत. शाळेत गेलेली लहान मुलं जोपर्यंत घरात येत नाहीत तोपर्यंत आई-बापाचा जीव भांड्यात पडत नाही. अरे आपण कुठल्या शतकात जगतोय? गेली अनेक वर्ष सामान्य नागरीक याच चिंतेत जगत आलाय आणि 21व्या शतकांकडे वाटचाल करत असताना याच ओझ्याखाली जगायचं?

देवेंद्र फडणवीस जेवढं लक्ष पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेनेकडे देता, तितकंच तुमच्याकडे असलेल्या गृहखात्याकडे लक्ष द्या. नारायण राणेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी जेवढा खटाटोप केलात ना, तेवढाच राज्यातल्या कायदा-सुव्यस्थेसाठी करा. राज्यासह तुमचंही भलं होईल. महाराष्ट्रातल्या जनेतेनं दिलेल्या संधीचं सोनं करा, अजुन वेळ गेलेली नाहीय. 2017-18 मध्ये झालेले मोर्चे, जातीय दंगली त्यानंतर झालेली कारवाई यामुळे फडणवीसांचं गृह नुसतंच “खातं” अशी गत झाली आहे… आता 2019 जवळ येऊ लागलंय, मुख्यमंत्रिपदाची स्वप्न परत पाहात असला तर थोडं थांबा, 2019 च्या निवडणूकीत “अत्याचार झालेल्या महिलेनं, हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी, अल्पवयीन मुलींवर बलात्कार झालेल्या आई-वडिलांनी तुम्हालाच मत का दयावं? याचं उत्तर द्या, मगच या आखाड्यात!!!

लेखक- वैभव परब ( लेखक पत्रकार आहेत. )