….ही तर भाजपची नाटकं, आकडेवारी वेगळंच काहीतरी सांगते!

राजकारणात संधीसाधूपणा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जे संधीसाधूपणा करत नाहीत त्यांची राजकारणात प्रगती होत नाही, असंही मानलं जातं. असाच संधीसाधूपणा सध्या भारतीय जनता पक्ष करत असल्याचं दिसतंय. 

विरोधी पक्ष संसदेचं काम चालू देत नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्यासोबत संपूर्ण भाजप एकदिवसीय उपोषण करणार आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा स्वतः हुबळीत उपोषणाला बसणार आहे. अर्थात सत्ताधारी पक्षाला उपोषण करावं लागतंय ही आश्चर्याची बाब आहे, मात्र लोकशाहीत काहीही अशक्य नाही. 

भाजप हे उपोषण करत असला आणि त्याला विरोधकांनी रोखलेलं संसदेचं कामकाज हे कारण असलं तरी ते काही पटण्यासारखं नाही. कारण इतिहासातील आकडेवारी काही वेगळंच सांगते. भाजप विरोधात असताना त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज न चालण्याचे आकडे मोठे आहेत. उपोषण पुकारताना मोदींनी त्या आकड्यांचाविचार केला नसावा.

काँग्रेस प्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीच्या 2004 ते 2009 या कार्यकाळात पहिल्या 8 अधिवेशनांमध्ये संसदेचं फक्त 38 टक्के कामकाज होऊ शकलं. याला जबाबदार भाजपचा गोंधळ आहे.

यूपीए 2 जेव्हा सत्तेत आली तेव्हाही भाजपचा हा गोंधळ सुरुच राहिला. यावेळी तर हद्दच झाली. लोकसभेचं तब्बल 61 टक्के कामकाज फक्त आणि फक्त भाजपच्या गोंधळामुळे वाया गेलं. याच काळात राज्यसभेचं 66 टक्के कामकाज वाया गेलं. 

संसदेत होणाऱ्या गोंधळामुळे भाजप सध्या उपोषण करत असलं तरी कधीकाळी या गोंधळाचं त्यांनी समर्थन केलं होतं. सत्ताधाऱ्यांना या गोष्टीचा सध्या विसर पडल्याचं दिसतंय. सध्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधात असताना यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. “जेव्हा सरकार चर्चा टाळण्याचा प्रयत्न करते तेव्हा विरोधकांकडे असलेले ते एकमेव हत्यार आहे, असं अरुण जेटली म्हणाले होते.