गोष्ट दुर्देवी, शिक्षणव्यवस्थेनं नाडलेल्या आदित्यची….

एअरपोर्टला जायला गाडीत बसलो आणि नेहमीप्रमाणे ड्रायव्हर बरोबर गप्पा सुरु केल्या.. आज तर गप्पा सुरु करायला कारणही होतं.. ड्रायव्हरचं नाव आदित्यच होतं..

“आदित्य, कुठला तू?” मी सुरुवात केली.

“सर सध्या पुण्यात असतो. पण मूळचा लातूरचा आहे.” त्याने सांगितले.

“बरं बरं.. उबर पार्ट टाइम म्हणून करतोस की फुल टाइम हाच व्यवसाय?”

“सर फुल टाइम मी उबरच चालवतो.”

“शिक्षण?”

“सर बारावी सायन्स केलंय मी”

बारावी सायन्स असूनही हा आदित्य कॉलेज वगैरे न करता उबर का चालवतोय? असा प्रश्न लगेच माझ्या डोक्यात आला. त्याला मी तसे विचारलेसुद्धा,

“अरे बारावी सायन्स आहेस मग पुढे शिकत का नाहीस? की परिस्थिती नाहीये तुझी?”

“नाही सर, तसं काही नाही. पण माझा बारावीचा निकाल लागलाच नाही.”

“निकाल लागलाच नाही म्हणजे?? तू परीक्षा दिलीस ना? मग निकाल कसा नाही लागला?”

“हो सर, परीक्षा दिली पण माझा निकाल आलाच नाही. माझ्या कॉलेजने माझे आयुष्य बरबाद केले.”

“मला जरा नीट सांगतोस का? कॉलेजने काय केले असे?”

“सर माझ्या कॉलेजने माझा बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरलाच नाही आणि त्यामुळे परीक्षेच्या आधी माझं हॉल तिकीट आलं नाही.”

“अरे असा कसा फॉर्म भरला नाही? तू अकरावीला त्याच कॉलेजला होतास ना?”

“हो सर… परीक्षेच्या अगोदर मला कॉलेजच्या प्रिन्सिपलने बोलावून सांगितले, की तुला परीक्षेला बसता येणार नाही. तू कॉमर्सला ऍडमिशन घे. तू पास होशील याची मी खात्री देतो.”

“अरे पण तू सायन्सला होतास ना? मग कॉमर्सला कसं ऍडमिशन घ्यायचं? परीक्षा कशी द्यायची एकदम? सायन्सच्या परीक्षेला तुला बसता येणार नाही मग कॉमर्सच्या परीक्षेला कसा बसणार तू?” मी एकामागोमाग एक प्रश्न त्याला विचारले.

“हो सर मी पण त्यांना हेच सगळं विचारलं पण ते ऐकायला तयार नव्हते.”

“मग काय केलंस?”

“मी बॉम्बे हायकोर्टात कॉलेज आणि महाराष्ट्र बोर्डावर केस लावली सर. विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्याला परीक्षा देण्याची परवानगी द्यावी, असा कोर्टाने निकालही दिला. मी परीक्षासुद्धा दिली. जेव्हा निकाल आला तेव्हा कॉलेजला गेलो तर माझा निकाल आलाच नव्हता. कॉलेजवाल्यांना विचारले तर त्यांनी सांगितले कोर्टाने तुला तुझा रिझल्ट द्यावा, असा आदेश दिलेला नाही. त्यामुळे आम्ही तुला तुझा रिझल्ट देऊ शकत नाही.”

“अरे असे कसे?? ते तुला तुझा रिझल्ट द्यायला नाही कसे म्हणू शकतात?’

“सर मी खूप रिक्वेस्ट केली कॉलेजला पण मला माझा रिझल्ट नाहीच समजला. मी पास झालोय की नापास हेसुद्धा मला कळले नाही. या सगळ्यात बरेच दिवस गेले. मी पुण्यात येऊन एमएचसीईटीचा क्लास लावला होता पण बारावीचा निकालच न आल्याने मला नैराश्य आले. त्यात मी एमएचसीईटी दिलीच नाही. आम्ही परत कोर्टात गेलो. माझ्या वडिलांनी 40-50 हजार रुपये खर्च करून नवीन वकील केला पण काय झाले काही कळले नाही. नवीन वकील आल्यावर एक-दोन आठवड्यातच कोर्टाने निकाल दिला आणि तो निकाल माझ्या विरोधात होता. माझे वडील वरच्या कोर्टात जाण्याच्या तयारीत होते पण मी त्यांना नको म्हटलं.”

“निकाल विरोधात कसा गेला?? कोर्टाने कोणत्या आधारावर कॉलेजच्या बाजूने निकाल दिला??’

“सर कोर्टाने 1987 च्या कोणत्यातरी केसचा दाखला दिला होता. मला नक्की आठवत नाही पण माझ्याकडे निकालाची प्रत आहे. मी तुम्हाला ती व्हाट्सऍप वर पाठवतो.”

“मग पुढे काय केलंस तू?”

“सर दोन वर्षे मी घरीच होतो. काहीच करायची इच्छा नव्हती. माझे मित्र माझ्यापुढे निघून गेले होते. मला कोणाला भेटायची इच्छा नव्हती. आई वडिल मला समजावत होते. अखेरीस वडिलांनी मला एक हॉटेल सुरू करून दिले पण तेही फार चालले नाही म्हणून बंद करावे लागले. भाऊ पुण्यात नोकरीला होता. त्याने मला इथे बोलावून घेतले. एक वर्ष कॉल सेंटरमध्ये नोकरी केली पण फ्रेशर असल्यामुळे तिथे पगार 8-9 हजार मिळायचा. त्यात कामाचाही ताण असायचा मग ती नोकरी सोडली आणि उबर सुरू केलं.”

“पण मग केसचं पुढे काय झालं?”

“काही नाही सर. घरच्यांनी अजून पैसे खर्च करावेत असे मला वाटत नव्हते. त्यामुळे मी त्यांना केसचा नाद सोडायला सांगितला. आता मी पैसे साठवतो आहे. थोडेफार पैसे साठले की मी परत माझ्या कॉलेजवर केस लावणार आहे.”

“चूक कॉलेजची होती याची तुला खात्री आहे?? असे काही झाले का की तू सायन्सला असूनही कॉलेजच्या चुकीने तुझा फॉर्म कॉमर्सच्या परीक्षेसाठी भरला गेला?”

“नक्की काय झाले माहीत नाही सर. पण मी त्यांना सोडणार नाही.”

“बारावीची परीक्षा कोणत्या वर्षी दिलीस तू?”

“2011 साली सर.”

“माझ्या मते तुझं ऑलरेडी बरंच नुकसान झालं आहे. कॉलेजचा ढिसाळपणा म्हणू किंवा त्यांनी निकाल आपल्या बाजूने लागावा म्हणून पैसे दिले असं म्हणू, नुकसान तर तुझे झालेय ना. मग आता परत केस करून काय साध्य होणार आहे? माझ्या मते तू हा नाद सोडून बारावीची परीक्षा पुन्हा द्यावीस. तुझ्याकडे गुणवत्ता आहे. मग काय हरकत आहे? उद्या लग्नाच्या बाजारात उभा राहिलास तर तुला कोण मुलगी देणार? नातेवाईकसुद्धा समोर नाही बोलले तर पाठीमागे तर बोलणारच.”

“ते तर आत्ताच बोलत आहेत सर. माझे वडील इरिगेशनमध्ये इंजिनियर आहेत. भाऊसुद्धा इंजिनियर आहे. पुण्यात हनिवेलमध्ये नोकरी करतो. मीच असा सडाफटींग गाडी चालवतो.”

“अरे मग मी काय सांगतोय. अजूनही वेळ गेलेली नाही. तू बारावी पुन्हा दे.”

“त्या वाटेला जायचं नाही सर परत.”

“चुकतोय तू. शिक्षणाशिवाय पर्याय नाही राजा. माझं ऐक. मी तुझा कोणी लागत नाही पण फक्त आपलं दोघांचं नाव सारखं आहे म्हणून तुझ्याबरोबर बोलायला सुरुवात केली. तू सांगतोय ते मला खरं वाटतंय. तू म्हणालास तसं कोर्टाच्या निकालाची प्रत मला पाठव. तुझी बाजू योग्य असेल तर माझ्याकडून होईल ती मदत मी तुला करेन. मी थोडंफार लिहितो. तुझ्याबद्दल मी लिहिलं तर चालेल का? तुझं म्हणणं खरं असेल आणि कॉलेजची चूक असेल तर तुझी स्टोरी लोकांपर्यंत मी पोहोचवेन.”

“ठीक आहे सर. मी आज रात्री किंवा उद्या सकाळी तुम्हाला कोर्टाच्या निकालाची प्रत पाठवतो. सर तुमची माझी ओळख नाही पण तरी तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलंत त्याबद्दल धन्यवाद.”

“ठीक आहे रे. तुझ्या मेसेजची वाट पाहीन.”

त्याला माझा नंबर देत मी गाडीतून उतरून एअरपोर्टकडे चालू लागलो. त्यानंतर त्याने मला कोर्टाच्या निकालाची प्रत व्हाट्सऍप वर पाठवली. मी माझ्या एका वकील मित्राला ती पाठवून काही करता येईल का याची चाचपणी करायला सांगितले. कोर्टाचा निकाल 2011 साली लागला होता. तोही नियमाला धरून होता. दहावी इयत्तेमध्ये सायन्स विषयात 40 पेक्षा कमी गुण असतील तर अकरावी सायन्सला अॅडमिशन मिळत नाही. आदित्यला 39 गुण होते. त्याच्या कॉलेजने हा नियम धाब्यावर बसवत त्याला अकरावी सायन्सला अॅडमिशन दिले होते. बारावीला बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म जेव्हा भरला तेव्हा बोर्डाच्या लोकांनी ही चूक लक्षात आणून दिली. नियमानुसार त्याला परीक्षा देता येणार नव्हती. पण कोर्टाने नुकसान नको म्हणून त्याला परीक्षा देऊ दिली पण पुढच्या सुनावणीमध्ये बोर्डाने आपली बाजू मांडताना नियमाचा आधार घेतला. कोर्टाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांच्या बाजूने निकाल दिला यात कॉलेज मात्र मोकाट राहिले. आदित्यने इतकी वर्षे काहीही केलं नाही त्यामुळे आता कॉलेजला पुन्हा आरोपी करण्यातही काहीच अर्थ उरलेला नाही. माझ्या वकील मित्रानेही मला हेच सांगितले.

दुसऱ्या दिवशी आदित्यला फोन करून मी माझे मत सांगितले. परत एकदा केस लावण्यापेक्षा त्याने आता बारावीची परीक्षा बाहेरून देऊन पुढील शिक्षण घ्यावे असा अगोदर सुचवलेला पर्याय मी त्याला पुन्हा सुचवला. काही मदत लागली तर तीही करण्याची खात्री दिली. आता पुढे काय करायचे हे मात्र त्याच्या हातात आहे. यातून एक गोष्ट मात्र लक्षात आली. कॉलेजने नियमांची पायमल्ली करत आदित्यला अकरावी सायन्सला प्रवेश दिला. त्याच्याकडून अकरावी आणि बारावीची फी सुद्धा घेतली. पण ऐन वेळी मात्र आपली चूक मान्य न करता बोर्डाकडे बोट दाखवले. बोर्डानेही केवळ कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याकरता नियमाचा आधार घेत आपली सुटका करून घेतली. दर वर्षी लाखो विद्यार्थी बारावीची परीक्षा देतात. मग एकाने परीक्षा दिली नाही तर बोर्डाला असा काय फरक पडणार? पण त्याच विद्यार्थ्याच्या आयुष्याचे नुकसान होतेय हे बोर्डाच्या लक्षात आले नाही. फी घेताना जी तत्परता कॉलेजने दाखवली तीच तत्परता आदित्यची मदत करायला दाखवली नाही. पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्टाफकडून झालेली चूक झाकून टाकण्यात धन्यता मानली. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले तर छाती ठोकून आपला निकाल सांगणाऱ्या कॉलेजने इथे मात्र विद्यार्थ्याचे नुकसान होत असताना देखील स्वतःची चूक मान्य केली नाही. दर वर्षी असे किमान 10-12 विद्यार्थी परीक्षेला मुकत असतील. पण लाखो विद्यार्थ्यांच्या समोर त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ आहे?त्यांच्या आयुष्याबाबत कोणाला काय पडले आहे? आदित्यसारखेच असेच काही विद्यार्थी दरवर्षी ह्या समस्येला सामोरे जात असतील. कॉलेज मात्र फी घेण्यात धन्यता मानतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे.

लेखक- आदित्य गुंड, aditya.gund@gmail.com