व्हायचं होतं पोलीस मात्र झाला खुनी… केडगाव हत्याकांडाची संपूर्ण कहाणी!

अहमदनगर जिल्ह्यातील केडगावमध्ये दोन शिवसैनिकांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. आधीच बदनाम असलेल्या नगरला ‘नरक’ म्हणून संबोधलं जाऊ लागलं. प्रथमदर्शनी ही घटना राजकीय वादातून झाल्याचं समोर आलं होतं. आता पोलीस तपासात या हत्या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा झाला आहे…  

संदीप गुंजाळ… केडगावमधील इतर मुलांप्रमाणेच हे एक नाव… शिकायचं आणि मोठं व्हायचं हे त्याचं स्वप्न… महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या दिशा काही सापडत नव्हत्या, त्यामुळे गुंजाळने MPSC परीक्षा द्यायचं ठरवलं आणि त्यादृष्टीने तयारी सुरु केली. चांगला अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर त्याने PSIच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले. PSIची मुख्य परीक्षाही त्याने दिली. आता पास व्हावं आणि PSI व्हावं एवढी एकच मनिषा त्याच्या डोक्यात होती, मात्र नियतीला बहुदा ते मान्य नसावं. PSIची मुख्य परीक्षा तो पास होऊ शकला नाही. पोलीस अधिकारी होण्याच्या पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. आता पुन्हा नव्यानं तयारी करणं भाग होतं, मात्र पुन्हा तयारी केली तरी पुढे काय? असा प्रश्न त्याच्या मनात उभा राहात असे.

काही दिवस तयारी केल्यानंतर त्याने केडगावमध्येच MPSCची तयारी करणाऱ्या मुलांसाठी क्लासेस सुरु केले. चरितार्थ चालविण्यासाठी हा एक चांगला मार्ग त्याला गवसला. असं असलं तरी केडगावच्या विषारी राजकीय वातावरणापासून तो दूर राहू शकला नाही आणि एकेकाळी पोलीस अधिकारी बनू पाहणारा संदीप गुंजाळ चक्क खुनी बनला…

केडगाव दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संजय सोने यांचा फोन खणाणला. त्यांनी फोन उचलताच आपण दोन जणांची हत्या केल्याची माहिती संदीपनं त्यांना दिली तसेच पारनेर पोलिस ठाण्यात हजर होत असल्याचं सांगितलं. पोलीस उपनिरीक्षक संजय सोने सुट्टीवर होते त्यामुळे त्यांनी लगेचच सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना फोन केला आणि गुंजाळने सांगितलेली माहिती त्यांना कळवली. गुंजाळ पोलिसात हजर झाला आणि त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही हत्या आपण केल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला, मात्र गुंजाळ दिशाभूल देणारी माहिती सांगत असल्याचं पोलिसांनी जाणवलं, त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच गुंजाळ बोलता झाला… त्याने सांगितलेली माहिती पुढीलप्रमाणे….

हत्या प्रकरणानंतर सुन्न केडगाव

केडगाव पोटनिवडणुकीच्या निकालानंतर अर्थात शनिवारी दुपारी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे हे महाज्योत हॉटेल येथे बसले होते. पोटनिवडणुकीतील मतदानावरुन त्यांच्यात चर्चा सुरु होती. कुणी मदत केली? कुणी गद्दारी केली? असे विषय त्यांच्यात सुरु होते. रवी खोल्लम नावाच्या व्यक्तीच्या परिसरातून शिवसेनेच्या उमेदवाराला कमी मतं पडल्याचं लक्षात येताच कोतकर यांनी खोल्लमला फोन लावला. कोतकर यांनी खोल्लमला चांगलीच शिवीगाळ केली. खोल्लमही ऐकण्याच्या मनस्थितीत नसावेत. त्यांनी कोतकर यांना चांगलंच सुनावलं. घडलेल्या प्रकाराने संतापलेल्या कोतकर यांनी खोल्लमला सज्जड दम दिला. “तू घरीच थांब, आम्ही तुझ्या घरी येतो आणि तुझ्याकडे पाहतो”, असं ते म्हणाले. फोन ठेवल्यानंतर कोतकर आणि ठुबे दुचाकीवरून केडगावमधील सुवर्णनगर परिसरातील खोल्लमच्या घराकडे निघाले.

कोतकरांच्या फोनमुळे खोल्लम संतप्त झाले होते. त्यांनी नगरसेवक विशाल कोतकर आणि औदुंबर कोतकर यांच्या कानावर ही बाब घातली. मला बघून घेण्यासाठी संजय कोतकर येत आहे, असंही त्यांनी त्यांना सांगितलं. विशाल कोतकर यांनी मी सगळं पाहतो म्हणत फोन ठेवला आणि संदीप गुंजाळला फोन लावला आणि तातडीने खोल्लमच्या घरी जाण्यास सांगितलं. विशाल कोतकर यांनी गुंजाळला घडलेल्या घटनेची कल्पना दिली होती त्यामुळे गुंजाळ तातडीने खोल्लमच्या घरी रवाना झाला. गुंजाळ खोल्लमच्या घरी गेला मात्र खोल्लम घरी नव्हता, त्याने खोल्लमच्या वडिलांना यासंदर्भात विचारणा केली. त्यांनी तो बाहेर गेल्याचं सांगितलं. तिथून तो बाहेर पडताच त्याला संदीप गिऱ्हे आणि महावीर मोकळ हे दोन साथिदार मिळाले. विशाल कोतकर यांनीच आपल्याला पाठवल्याचं त्यांनी सांगितलं.  

गुंजाळ आणि मोकळ यांच्यात संभाषण सुरु असतानाच संजय कोतकर आणि वसंत ठुबे त्याठिकाणी पोहोचले. ते समोर येताच गुंजाळने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत गेला आणि गुंजाळने कोतकर यांच्या गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या लागताच कोतकर खाली कोसळले. कोतकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचं लक्षात येताच ठुबेंनी पळ काढला. ठुबे पळत असल्याचं लक्षात येताच गिऱ्हेने ठुबेंच्या दिशेने गोळ्या झाडल्या. एक गोळी ठुबे यांना लागली, मात्र ते तरीही खाली पडले नाहीत. त्यानंतर त्याने झाडलेली गोळी मात्र ठुबेंना बरोबर लागली आणि ठुबे जमिनीवर कोसळले. गिऱ्हेने ठुबेंजवळ जाऊन फिल्मी स्टाईलने त्यांच्या छातीवर पाय ठेवला आणि पुन्हा ठुबेंवर गोळ्या झाडल्या. 

दुसरीकडे दोन गोळ्या झाडल्यानंतर कोतकर मृत झालेत असा समज गुंजाळचा झाला आणि तो ठुबेंच्या दिशेने धावला. त्याने ठुबेंच्या अंगावर कोयत्याने सपासप वार केले आणि त्यांचा गळाही कापला. तिथून त्यानं कोतकर यांच्या दिशेने पाहिलं असता त्यांना कोतकर फोनवर बोलत असल्याचं दिसलं. गुंजाळने पुन्हा कोतकर यांच्या दिशेने धाव घेतली आणि त्यांच्यावरही कोयत्यानं सपासप वार केले आणि त्यांचा गळाही कापला. 

वसंत ठुबे आणि संजय कोतकर

अतिशय क्रूर पद्धतीने कोतकर आणि ठुबे यांचा खून करताच गुंजाळने गिर्‍हेकडील पिस्तुल स्वतःच्या ताब्यात घेतले. ‘तुम्ही येथून निघून जा. मी माझ्या अंगावर सर्व घेतो’, असं म्हणत त्याने त्यांना पाठवून दिलं. हत्या प्रकरणानंतर गुंजाळ पारनेरकडे निघाला. केडगावहून हिवरे बाजारकडे जाणार्‍या वाटेत त्याने त्याच्याकडील 1 मोबाईल तोडून टाकला. सीमकार्ड फेकून दिले. रस्त्यावरील नाल्यात गिर्‍हेने वापरलेला गावठी कट्टा फेकून दिला. तोफखाना पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संजय सोने यांना फोन करून खून केल्याची कबुली दिली आणि आपण पारनेर पोलिस ठाण्यात हजर होत असल्याचं त्यानं सांगितलं. सोने स्वतः सुट्टीवर होते मात्र घडलेला प्रकार वरिष्ठांना कळवणं गरजेचं होतं, त्यांनी लगेचच सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना फोन केला. गुंजाळने केलेल्या कृत्याची आणि तो शरण येत असल्याची माहिती त्यांनी त्यांना दिली. 

पारनेर पोलिस ठाण्यात शरण जाताना गुंजाळने त्याच्या खिशातील 4 जीवंत काडतुसं पोलीस ठाण्यातीलच कचर्‍यात टाकली. खून स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी त्याने गिर्‍हे, मोकळ आणि त्याच्या साथीदाराला पळून जाण्यास सांगितले. मोबाईल  तोडून टाकला. गुन्ह्यात वापरलेला एक गावठी कट्टा टाकून दिला. ‘द‍ृश्यम’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे जीवंत काडतुसे पोलिस ठाण्यातच टाकली. एवढंच नव्हे तर पोलिसांना केलेला फोन नंबरच माझा आहे, दुसरा कुठलाही फोन वापरत नाही, असं सांगून त्याने विशाल कोतकर यांच्याशी केलेल्या संभाषणाचा नंबर देण्याचं टाळलं. सिंघम चित्रपटातील अजय देवगणप्रमाणे त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र खरं आयुष्य हे फिल्मी दुनियेपेक्षा वेगळं असतं हे गुंजाळला कळालं नाही. पोलिसी खाक्या दाखवताच गुंजाळ खरी माहिती सांगू लागला आणि केडगाव हत्याकांडाप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलीस आणखी तपास करत आहेत, यात आणखी काही जणांचा हात असल्याचा संशय आहे.