विमान प्रवासात भेटलेले बिलंदर प्रवासी आणि त्यांच्या अजब तऱ्हा…

कामानिमित्त अनेकदा विमानाने प्रवास करण्याचा प्रसंग येत असतो. या विमानप्रवासामध्ये बरेच लोक भेटत, दिसत असतात. या लोकांचे निरीक्षण करायला मला आवडते. त्यांचे लोकांचे काही प्रकार इथे मांडायचा प्रयत्न करतोय…..

पहिल्यांदा विमान प्रवास करणारे पण एकटे असणारे –

हे लोक बऱ्याचदा गोंधळलेले असतात. नक्की काय करायचंय याची पुरेशी माहिती त्यांना नसते. काहीजण मग इकडेतिकडे विचारपूस करून पुढे सरकत असतात. सेक्युरिटी चेकला या लोकांची मजा येते. मोबाईल फोन खिशात ठेवून तसेच पुढे जातात.सीआयएसएफने परत पाठवले की मग येऊन मोबाईल फोन ट्रेमध्ये ठेवतात. काहीजण बोर्डिंग पाससुद्धा ट्रे मध्ये सरकवून देतात. पुन्हा मागे येऊन बोर्डिंग पास घेऊन जातात. सेक्युरिटी चेक झाला की बोर्डिंग गेटवर जाऊन बसणार आणि तिथे असलेल्या टीव्ही स्क्रीनवर आपल्या विमानाचा क्रमांक दिलेला असतानासुद्धा काउंटरवर जाऊन विचारणार अमुक एक फ्लाईट इथूनच जाणार ना? विमानात बसेपर्यंत यांना कशाचीच खात्री नसते. सतत एक प्रकारच्या टेंशनमध्ये असतात.

अति सामान असणारे –

हे लोक बिझनेस ट्रॅव्हलला जातानासुद्धा प्रचंड सामान घेऊन जातात. एक चेक इन बॅग, एक लॅपटॉप बॅग आणि अजून एक मोठी कॅरीऑन बॅग. विमानात सामान ठेवायला असलेली जागा आपण विकतच घेतली आहे अशा थाटात हे लोक आपल्या मोठ्या बॅग्ज तिथे कोंबत असतात. बरेचजण आपली बॅग ठेवण्यासाठी इतरांचे सामान बाजूला काढणे, दुसरीकडे ठेवणे, त्यांच्या बॅगवर आपली बॅग दाबून बसवणे असे प्रकार करत असतात. क्वचित या लोकांना बॅग ठेवायला जागा नसेल आणि एअरलाईन स्टाफने बॅग चेक इन बॅग्जबरोबर ठेवावी लागेल असे सांगितले तर हे लोक तमाशा करतात. काही लोक बसायला २५ व्या रांगेत असतात पण सामान मात्र १० व्या रांगेजवळ ठेवून खुशाल आपल्या जागी जाऊन बसतात. १० व्या रांगेत असणाऱ्या लोकांनी आपले सामान कुठे ठेवायचे असे प्रश्न या लोकांना पडत नाहीत.

लेटलतीफ –

या लोकांना जगाची अजिबात काळजी नसते. जग तिकडे बुडालं तरी बेहत्तर, पण मी मात्र माझ्याच वेळेत जाणार असा काहीसा यांचा हेका असतो. बोर्डिंग जेव्हा सुरु होत असते तेव्हा हे  कुठेतरी चहा वगैरे पित असतात. एअरलाईन स्टाफ बोर्डिंग गेटपासून ते सिक्युरिटी चेकपर्यंत मोठ्याने यांच्या नावाचा पुकारा करत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्यामुळे इतरांना उशीर होतोय याबद्दल यांच्या चेहऱ्यावर खेदाचा लवलेशही नसतो.

अति खाणारे –

आपल्या या विमान प्रवासानंतर आयुष्यात पुन्हा कधीही आपल्याला विमानात प्रवास करायला संधी मिळणारच नाहीये अशा भावनेने हे लोक फक्त खात असतात. संपले की पुन्हा मागून घेऊन खातात. खाताना आपण अन्न सांडले तर त्याबद्दल चुकीचा लवलेशही यांच्या गावी नसतो. काहीजण आपल्या बॅगेत खाण्याचे पदार्थ घेऊन आलेले असतात. लांबच्या फ्लाईटमध्ये जरा आराम करावा म्हणून शेजारचे प्रवासी झोपले असतील तर हे लोक हमखास प्लास्टिकच्या कव्हरचा आवाज करत, तोंडात कुर्रम कुर्रम आवाज करत भुजिया किंवा वेफर्सवर ताव मारत असतात.

बिझनेस ट्रॅव्हलर्स –

हे लोक सतत विमानप्रवास करत असल्याने यांच्याकडे सगळ्याच एअरलाईन्सची गोल्ड किंवा प्लॅटिनम मेंबरशिप असते. चेक इन केल्यानंतर हे लोक इतर कुठे वेळ घालविण्यापेक्षा बिझनेस लाउंजमध्ये बसतात. बोर्डिंग अनाउंसमेंट झाली की इतर लोक एकामागे एक रांगेत उभे राहिलेले असताना हे बिझनेस ट्रॅव्हलर्स मध्येच येऊन वेगळ्या रांगेतून आपले गोल्ड/प्लॅटिनम कार्ड दिमाखात दाखवून पुढे निघून जातात. एअरलाईन स्टाफदेखील त्यांना गुड मॉर्निंग सर, गुड इव्हिनिंग मॅडम असे आदरातिथ्य दाखवत असतो. हे घडत असताना रांगेत उभे असलेल्या इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर ह्या बिझनेस ट्रॅव्हलर्सबद्दल संताप आलेला दिसतो.

ग्रुप ट्रॅव्हलर्स –

हे लोक त्यांच्या एखाद्या मित्राच्या लग्नाला,लग्नाआधीच्या बॅचलर्स पार्टीला किंवा कुठेतरी सुट्टीला निघालेले असतात. हे बिचवर घालायचे बरमुडा आणि हवाईयन शर्ट घरूनच घालून निघालेले असतात. आपण सुट्टीला निघालोय किंवा लग्नाला निघालोय म्हणजे आपण विमानात बसूनच पार्टी केली पाहिजे असा चंग यांनी बांधलेला असतो. मोठमोठ्याने हसणे, अर्वाच्च शब्द वापरणे, द्वयर्थी जोक करणे याचा आपण मक्ता घेतला आहे अशा थाटात यांचे विमानातले वागणे असते.

चित्रपटप्रेमी –

ह्या लोकांना आजूबाजूला काय चालले आहे ह्याबाबत काहीही देणे घेणे नसते. एअरपोर्टवर आल्यापासून कानात हेडफोन घालून हे त्यांच्या मोबाईलवर चित्रपट पाहण्यात गुंग असतात. काहीजणांचे हे चित्रपटप्रेम इतके उतू जाणारे असते की हेडफोन्स नसतील तरीही हे लोक चित्रपट बघण्याचा अट्टाहास सोडत नाहीत. आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय असा विचार यांच्या मनात अजिबात येत नाही. यावर उपाय म्हणून अलीकडे एअरलाईन्सने हेडफोन्स शिवाय मोबाईलवर चित्रपट पाहण्याला बंधन आणले आहे.

स्त्रीवादी –

या वर्गात बायकांचा समावेश होतो. आपल्या शेजारील पुरुष प्रवासी फक्त आणि फक्त आपल्याला त्रास देण्याकरताच किंवा आपल्याशी लगट करण्यासाठीच बसलेला आहे असा यांचा ठाम समज असतो. दिवसेंदिवस विमानातील आसने अरुंद होत चालली आहेत. दोन आसनांचे आर्म रेस्ट कॉमन असते. कितीही प्रयत्न केला तरी दोन जण तिथे एकाच वेळी हात ठेवू शकत नाहीत. अशा वेळी शेजारच्या पुरुष प्रवाशाच्या हाताचा चुकूनही या स्त्रियांच्या हाताला धक्का लागला तर यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे काही बदलतात की तो बिचारा पुरुष प्रवाशी अक्षरशः अंग चोरून घेतो. याच स्त्रिया विमान उतरल्यानंतर त्याच पुरुष शेजाऱ्याला, “Can you please help me with my bag? That red one please.” असे लडिवाळपणे म्हणताना दिसतात. तेव्हा यांच्यातली नारीशक्ती गायब झालेली असते.

कामसू प्रवासी –

हे सतत काम करत असतात. विमानात बसण्यागोदर लॅपटॉपवर काम करत असतात. विमानात येताना एका हातात लॅपटॉप तसाच उघडा ठेवून एका हाताने फोनवर बोलत असतात. विमानात आल्यावर एका हाताने लॅपटॉप आपल्या सीटवर ठेवून फोनवर बोलतच बॅग वर ठेवणार. परत लॅपटॉप उचलून फोनवर बोलणे सुरु ठेवत सीटवर बसणार. स्टाफचा सेफ्टी डेमो सुरु झाल्यावरसुद्धा लॅपटॉपवर उघडलेल्या कसल्याशा एक्सएल शीटवर एका हाताने टाईप करत यांचा फोन सुरूच असतो. एव्हाना यांना “Sir, Please switch off your phone.” अशी वॉर्निंग मिळालेली असते. अखेरीस टेक ऑफची वेळ आल्यानंतर गेला एक तासभर फोनवर बोलूनदेखील आपलं अतिशय महत्वाचं काहीतरी बोलणं राहूनच गेलं या दुःखात ते फोन ठेवतात. टेकऑफ नंतर लगेचच पुन्हा लॅपटॉप उघडून काम सुरु. गंतव्य स्थळी विमान उतरल्याक्षणी यांना अगोदर अर्धवट बोलणं झालेल्या माणसाचा फोन येतो आणि “Yes, Where were we?” असं म्हणत ते संभाषण पुढे चालू ठेवतात. अशी माणसे माझ्या शेजारी बसल्यावर आपण आयुष्यात काय झेंडे गाडलेत असा विचार पुढचे तीन दिवस सतत माझ्या डोक्यात घर करून राहतो.

उतरण्याची घाई असलेले प्रवासी –

कधी एकदा विमान जमिनीवर उतरते आणि कधी एकदा मी बाहेर पडतो अशी यांची अवस्था असते. विमान धावपट्टीवरून पार्किंग बेला जाईपर्यंत यांना थांबवत नाही. आपली बॅग चोरीला जाते की काय अशी एक भीती यांच्या मनात असल्यासारखे असे यांचे वागणे असते. अनेकदा सांगूनही हे लोक एअरलाईन स्टाफच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत आपली बॅग काढून घेण्यात धन्यता मानतात. बाहेरच्या देशात प्रवास करताना भारतीय लोक असे करायला लागले की इतर लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहतात. पण या लोकांवर कशाचाही फरक पडत नाही.

फूSSकाड प्रवासी –

ना सिगारेट म्हणजे जीव की प्राण असते. एअरपोर्टमध्ये जाण्याअगोदर एक सिगारेट, बोर्डिंग होण्याअगोदर स्मोकिंग झोनमध्ये जाऊन अजून एक दोन सिगारेट फुंकल्याशिवाय यांच्या फुफ्फुसांना चैन पडत नाही. वेगवेगळ्या एअरपोर्टचे स्मोकिंग झोन कुठे आहेत याची यांना इत्थंभूत माहिती असते. माझ्या एका सहकाऱ्याला तर वेगवेगळ्या एअरपोर्टचे अरायव्हल आणि डिपार्चरचे स्मोकिंग झोन कुठे आहेत याची देखील माहिती आहे. विमानात लायटर चालत नाही म्हणून हे सिगरेटप्रेमी विमानप्रवास करताना एक माचिस आपल्या सामानात टाकायला विसरत नाहीत.

तुम्हीही कधीतरी विमानप्रवास केला असेलच ना? मग तुम्ही यापैकी कोणते प्रवासी आहात किंवा तुम्हाला यापैकी कोणते प्रवासी भेटलेत हे खाली कमेंट करून जरूर सांगा. लेख आवडला तर शेअर करायला विसरू नका!

लेखक- आदित्य गुंड, aditya.gund@gmail.com