पवार घराण्यातील आणखी एक व्यक्ती राजकारणाच्या आखाड्यात?

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घराणं म्हटलं की भल्याभल्यांचे कान टवकारतात. तर याच पवार घराण्यातील आणखी एक व्यक्तीमत्त्व राजकारणाच्या आखाड्यात उडी घेणार असल्याचं कळतंय. अनेकांना त्या नावाची कल्पना असेलही… पार्थ अजित पवार असं या व्यक्तीमत्त्वाचं नाव आहे. होय, महाराष्ट्रातील मुत्सद्दी राजकारण्यांपैकी एक असलेल्या अजित पवार यांचे ते चिरंजीव आहेत तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू…

पार्थ पवार राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र मध्यंतरी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हा अंदाज चुकवत शरद पवार यांचे दुसरे नातू अर्थात अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांची राजकारणात एन्ट्री करण्यात आली. त्यांना जिल्हा परिषदेचं तिकीट देण्यात आलं होतं, त्या तिकीटावर ते निवडूनसुद्धा आले. कोणाच्या ध्यानी मनी नसताना रोहित पवार यांचा राजकारणात प्रवेश झाला. हा प्रवेश सर्वांनाच अचंबित करणारा होता. 

रोहित पवार यांच्या राजकीय प्रवेशामुळे अजित पवार यांचा मुलगा पार्थचा प्रवेश लांबणीवर पडला. मधल्या काळात पार्थ पवार यांच्या पाठीमागे राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण झाली. पार्थ यांनी लवकरात लवकर राजकारणात सक्रीय व्हावं ही या कार्यकर्त्यांची भावना होती.

रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर जनसंपर्क व्यापक केला. त्यांची मधल्या काळात साखर संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. पुढल्या वर्षी ते नियमानूसार आपोआप साखर संघाचे अध्यक्ष होतील. देशातल्या एका मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदी जाण्याने ते राजकारणात वेगळं अस्तित्व निर्माण करतील. पार्थ पवार मात्र या सगळ्यात कुठंच नव्हते. मात्र आता पार्थ राजकारणात सक्रीय होणार असल्याचं कळतंय. 2019च्या निवडणुका लक्षात घेऊन पार्थ सक्रीय होत असल्याचं बोललं जातंय.

पार्थ राजकीय कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावत नव्हते. मात्र अशा कार्यक्रमांना हजेरी लावण्याचं त्यांचं प्रमाण वाढलंय. आज ते आपले आजोबा शरद पवार यांच्यासोबत होते. बारामतीतील अनेक कार्यक्रमांना त्यांनी सोबत हजेरी लावली. व्यासपीठावरही पार्थ पवार शरद पवार यांच्या पाठीमागे बसलेले पहायला मिळाले. त्यामुळे पार्थ पवार आपल्या आजोबांकडून राजकारणाचे धडे तर गिरवत नाहीत ना? असा प्रश्न आता चर्चिला जातोय. 

पार्थ पवार यांच्या राजकारणातील प्रवेशाने पवार घराण्याच्या नव्या फळीतील आणखी एक व्यक्ती राजकारणात पाऊल टाकेल, मात्र यामुळे घराणेशाहीची चर्चा पुन्हा एकदा सुरु होईल. पक्षाला मोठं करण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी खर्ची पडत असताना आपल्या घरातील व्यक्तीला नेता बनवण्याचा, वारसदार बनवण्याचा ट्रेंड राष्ट्रवादीमध्येही सुरु आहे हे नक्की…