कास्टिंग काऊच म्हणजे काय? अभिनेत्रींना याबद्दल काय वाटतं???

मागील काही दिवसात कास्टींग काऊचचा मुद्दा फार गाजत आहे. केवळ बॉलिवूड सेलेब्रिटी नव्हे तर सामान्य कलाकारांपासून ते राजकारणी महिलांपर्यंत सगळ्यांनाच कास्टींग काऊचला तोंड द्यावे लागत आहे. याबद्दल अनेक अभिनेत्रींनी आपले अनुभव देखील शेअर केले आहेत. कास्टींग काऊचचे हे वादळ कधी संपणार? अभिनय क्षेत्रातील नवोदित कलाकारांना संधी हवी असते मात्र त्यासाठी कास्टींग काऊच जर होत असेल तर नवोदित अभिनेत्रींनी त्याला का तोंड द्यावं?

कास्टींग काऊच म्हणजे काय?

कास्टींग काऊच म्हणजे एखाद्या चित्रपटात अभिनय करण्यासाठी अभिनेत्रीकडे निर्माता किंवा दिग्दर्शकाने शारीरिक संबंधाची मागणी करणे किंवा अभिनेत्रीसोबत वाईट वर्तवणूक करणे याला कास्टींग काऊच म्हणतात.

चित्रपटसृष्टीतील नवनवीन चेहरे…

चित्रपटसृष्टीत रोज नवनवीन चेहरे झळकताना दिसतात. प्रत्येक अभिनेत्री आपली नवीन ओळख निर्माण करण्यासाठी झटत असते. त्यासाठी रोज नवीन प्रयोग करत असते. एखादा चांगला रोल मिळावा आणि त्यातून आपण आपल्याला सिद्ध करावं. घरच्यांनी आपला अभिमान बाळगावा, असे स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक मुलगी चित्रपटसृष्टीत जीव ओतून झटत असते. मात्र चित्रपटात काम करायचं असेल तर कधी नाईलाजानं तर कधी बळजबरीनं कास्टींग काऊचला सामोरं जावं लागण्याची शक्यता असते.

करियर संपण्याची भीती…

कला विश्वात काही व्यक्तींना देव मानले जाते. त्यामुळे अनेक अभिनेत्रींसोबत कास्टींग काऊच सारखा प्रकार घडूनही कुणी तोंड उघडत नाही. आपलं चित्रपटसृष्टीतील करिअर संपेल, अशी भीती त्यांना असते. त्यामुळे यावर बोलणं टाळलं जातं.

कोण कोणत्या अभिनेत्रीला कास्टींग काऊचला तोंड द्यावं लागलं…

गेल्या काही दिवसात कास्टींग काऊच्या जुन्या वादळाला नवं रुप प्राप्त झालं आहे. अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींनी त्याचे चित्रपटसृष्टीतील वाईट अनुभव सांगितले. यात राधिका आपटे, इलियाना डिक्रुझ, रिचा चढ्ढा, हर्षाली झिने, सरोज खान, उषा जाधव, अलका कुबल या अभिनेत्रींचा समावेश आहे.

कास्टींग काऊच बद्दल अभिनेत्रीचे अनुभव…

#1. राधिका आपटे…

माझ्यासोबत अनेकदा असे प्रसंग घडले. प्रस्थापित लोकांकडून मला असे अनुभव आले. हॉलिवूडमध्ये हे सगळं संपवण्याचा स्त्री आणि पुरूष कलाकारांनी निर्धार केला तसा आपल्याकडे व्हायला हवा, अशी इच्छाही तिने व्यक्त केली.

#2. इलियाना डिक्रुझ…

दाक्षिणात्य चित्रपटातील एका ज्युनिअर आर्टीस्टने माझ्याकडे मागणी केली होती. कास्टींग काऊचवर जो बोलेल त्याचं करियर संपुष्टात येईल, असे इलियाना डिक्रुझने एका मुलाखतीत म्हटलंय.

#3. रिचा चढ्ढा…

रिचा स्त्रीवादी विचारांची आहे. कास्टींग काऊच फक्त चित्रपटसृष्टीतच नाही तर इतरही क्षेत्रात होतं, असं तीचं म्हणणं आहे.

#4. हर्षाली झिने…

जेव्हा मी रोल मिळाल्यानंतर मिटींगला जाते. तेव्हा अनेक नामवंत दिग्दर्शकांनी मला त्या गोष्टी करशील का?, असं विचारलं होतं.

#5. उषा जाधव…

फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टींग काऊच सामान्य आहे. मला एका सिनिअर आर्टीस्टनं विचारले होते की एक अभिनेत्री म्हणून तुला शक्य तेव्हा आनंदाने लैंगिक संबंध ठेवावे लागतील आणि तो बोलता बोलता मला कुठेही स्पर्श करत होता. ते सगळं पाहून मी स्तब्ध झाले. त्यावेळी त्याने मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं की नाही? अशी धमकीही दिली होती, असा धक्कादायक अनुभव उषा जाधवने सांगितला.

आणि अनेक प्रश्न…

अशा अनेक अनुभवामुळे नवोदित अभिनेत्रींसोबत अनेक प्रश्न उभे राहतात. नवीन अभिनेत्रींनी या कास्टींग काऊचला कसं तोंड द्यावं? या क्षेत्रात काम करणं कितपत योग्य?, आपल्यासोबत कास्टींग काऊच होणार नाही आणि झालं तर त्याचा सामना कसा करावा…? असे अनेक प्रश्न कास्टींग काऊच बाबत उद्भवत आहेत.