…आणि ‘मातोश्री’वर एकच आवाज झाला; “खान घाबरला, खान घाबरला, खान घाबरला!!!”

“सडा टाकला का? अंगण सारवले का? रांगोळी काढा कोणीतरी, ये आदु पळत जा आणि झमझम मधून मिठाई घेऊन ये आणि हो ढोकळा पण घेऊन ये, कटकट नुसती, एकजण व्यवस्थित काम करेल तर नशीब, अहो ऐकले का? आवरायला घ्या तुम्ही, असे मख्ख तोंड करून का बसलात? उठा, उठा म्हणते ना आणि मी फक्त कांदा पोहेच बनवणार आहे, कंटाळा आलाय मला, बाकी बाहेरूनच मागवले आहे.”

पाहुणे बातचित करायला येणार हे समजल्यावर सकाळपासून रश्मी वहिनींची मातोश्रीवर नुसती धावपळ धावपळ चालू होती…

“पाहुणे यायची वेळ झाली तरी स्वारींची कोणतीही तयारी दिसेना, नक्की काय चाललंय यांच्या मनात? घरचे कार्य, म्हणलं मदतीला शर्मिला ताईंना बोलावते तर कसले ओरडले हे, अशा वेळी घरचे लोक नको? पण नाही, यांचा जास्त विश्वास मिलिंद भावजी आणि संजु भावजींच्यावर”

“संजु भावजींच्या मनात या येणाऱ्या पाहुण्यांच्या बरोबर सोयरीक करायची नाही अशी कुजबुज कानावर आलीय, यांचं कोणाबरोबर पटत की नाही काय माहित?”

बघू पुढचे पुढे, कामे खूप पडलेत म्हणत वहिनी पदर खोचून स्वयंपाकघरात शिरल्या.

इतका वेळ स्वस्थ बसलेले उधोजी आरामात उठले आणि आदेश दिला… “तयारीला लागा”

आदेश मिळताच सेवक ताटात वस्त्र घेऊन समोर हजर, ताटात एक कटाक्ष टाकत उधोजी गरजले,

“मिलिंदा, ही वाघनखे कशाला पाठवलीस?”

“महाराज, सावध असायला हवं, खान भेटायला येतोय, कपटनीती करून काही दगा फटका केला तर ……”

“खामोश, पाहुण्याबद्दल अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत.”

असला ड्रामा संजय रावांसाठी नवीन नव्हता, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करत आणि कपाळावरील आठी न काढता त्यांनी मध्येच नाक खुपसले,

“नाही… नाही… नाही… शरणागती बिलकुल नाही”

“यांना काय चावले बघा जरा, का किंचाळत आहेत ते?”

“महाराज… महाराज… ज्यांनी आपला पदोपदी अपमान केला, त्यांना मातोश्रीच्या पायरीवर पाय ठेऊन देऊ नये, आज हे गोड बोलून गळ्यात गळे घालतील आणि उद्या पाठीत खंजीर खुपसतील.”

इतक्यात रश्मी वहिनी धावतपळत आल्या,

“तुमचा वग संपला असेल तर टीव्ही लावा, टीव्ही लावा”

सगळे टीव्हीकडे धावतात….

BREAKING NEWS: भेटीबाबत संभ्रम

मातोश्रीच्या कानाकोपऱ्यात एकच आवाज दुमदुमला

“खान घाबरला… खान घाबरला… खान घाबरला”

( सदर पाहुणे भेंडी-बाजारात उंदराचा पिंजरा घेताना नुकतेच निदर्शनास आले आहेत. )

 

लेखक- अमोल शिंदे, amolshinde25@gmail.com