मातोश्रीच्या पायऱ्या चढण्याआधीच शिवसेनेनं ‘पाव्हण्या’चे कान टोचले!

भाजपाध्यक्ष आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी चक्क मातोश्रीच्या पायऱ्या चढणार आहेत. शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जातेय. मात्र हा पाव्हणा मातोश्रीच्या पायऱ्या चढण्याआधीच त्याचे कान टोचण्याचे काम शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलंय. 

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात???

-भाजपने व्यापक संपर्क मोहीम सुरू केलीय. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभ्रमंतीवर आहेत तर भाजपाध्यक्ष अमित शहा देशभ्रमंतीवर आहेत. एनडीएतील घटकपक्षांना शहा भेटणार आहेत. ते नक्की काय करणार आहेत? तसेच ते नेमके आत्ताच म्हणजे पोटनिवडणुकांमध्ये भाजपची धूळधाण झाल्यावरच का भेटत आहेत? हा सुद्धा प्रश्नच आहे.

-2019 च्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणारच आहे. पालघरने शिवसेनेचे ‘स्व’बळ दाखवून दिले आहे. तेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या संपर्क अभियानामागे 2019 च्या निवडणुका हे एकच कारण होऊ शकते.

-शिवसेनेसारखे पक्ष कायम जनसंपर्क, जनाधार यावरच वाटचाल करत असतात. त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी, लढण्यासाठी कोणत्याही ‘पोस्टर बॉय’ची गरज नसते. गरजेनुसार पोस्टरवरची चित्रे बदलायची आणि मतं मागायची असले धंदे आम्ही केले नाहीत.

-पालघर निवडणुकीत भाजपच्या पोस्टरवरून मोदी-शहा अनेक ठिकाणी गायब झाले होते. त्या जागी चिंतामण वनगांचे फोटो होते. वनगा कुटुंबाने आक्षेप घेऊनही भाजपवाले मोदींच्या नव्हे तर वनगांच्याच नावाने मते मागत होते. काँग्रेसचे गावितांचा विजय झाला अन् विजयाच्या पोस्टरवरून वनगा गेले आणि पुन्हा मोदी-शहा आले. त्यामुळे कुणाशी संपर्क ठेवायचा आणि तोडायचा याची ‘व्यापारी गणिते’ ठरलेली असतात.

-सध्या सर्वात मोठा संपर्क घोटाळा बिहारमध्ये सुरू आहे. नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड व भाजपचे संयुक्त सरकार बिहारात आले. त्यांचा दुसरा-तिसरा मधुचंद्र संपत आल्याचे दिसत आहे. नितीशकुमार यांचे सहकारी के. सी. त्यागी यांनीच कुरबुरीस तोंड फोडले असून भाजपला मित्रांची फिकीर नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

-‘नोटाबंदीमुळे नक्की देशाचा काय फायदा झाला?’ असा प्रश्न नितीशकुमार यांनी उपस्थित केला आहे. सुरुवातीला नितीशकुमार हे ‘नोटाबंदी’चे वकील होते. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार संपेल, काळा पैसा बाहेर येईल, अशा स्वप्नरंजनात ते होते. त्याच स्वप्नावस्थेत त्यांनी भाजपशी गांधर्व विवाह करून नवा ‘संपर्क’ निर्माण केला. आता ते स्वप्नातून जागे झाले आहेत.

-गांधर्व विवाहानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जनाधार खचू लागला आहे. लालू यादव यांना तुरुंगात पाठवल्यास बिहारचे मैदान मोकळे होईल असा त्यांचा भ्रम होता तोही तुटला. बिहारमधील सर्वच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांत भाजप-जेडीयू आघाडीचा पराभव झाला आहे आणि लालू यादव जिंकले आहेत. त्यातच आता बिहारात जागावाटपावरून जदयु आणि भाजपचे वाजले आहे.

-बिहारातील निवडणुका मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढायच्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यावरून दोघांत खणाखणी सुरू झाली आहे. नितीश कुमार यांचा चेहरा आगामी निवडणुकीत चालणार नाही. त्यामुळे मोदीच पोस्टरवर हवेत हा भाजपचा आग्रह जेडीयूवाले मानायला तयार नाहीत. त्यामुळे बिहारात संपर्क घोटाळा सुरू झाला आहे. अर्थात भाजपबरोबर जाणे म्हणजे स्वतःच्या स्वतंत्र जनाधाराचा स्वतःहून गळा घोटण्यासारखे आहे, असे वाटणारे अनेक जण आहेत.

-राजस्थान, मध्य प्रदेशातही सत्ताबदलाचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातही सत्ताबदल अटळ आहे. अमित शहा यांचे लक्ष्य लोकसभेतील किमान 350 जागांचे आणि तेही स्वबळावर जिंकण्याचे आहे. 350 जागा भाजपास मिळतील तेव्हाच अयोध्येत राम मंदिर उभारू, असा विडा त्यांनी उचलला आहे. त्यांच्या जिद्दीस सलाम करावा लागेल.

-देशात पेट्रोलचा भडका उडून महागाईचा वणवा पेटला आहे, शेतकरी संपावर आहेत आणि शेतकऱ्यांशी सरकारचा संपर्क तुटल्याने शेतकरी संप मोडून काढण्याचे काम सुरू आहे. पालघर साम, दाम, दंड, भेदाने जिंकले, तसे साम, दाम, दंड, भेद वापरून शेतकरी संप मोडून काढू, असेच जणू सुरू आहे. अशा परिस्थितीत मोदी जगात आणि शहा देशात संपर्क मोहीम राबवत आहेत. त्यांच्या संपर्क कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच!!!