भाजपनं छिंदमचा राजीनामा घेतलाच नाही?; छिंदमची नाटकं पुन्हा सुरु…

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमची पक्षातून हकालपट्टी करण्याची तसेच त्याला उपमहापौरपदावरुन हटवण्याची घोषणा भाजपने केली होती, मात्र हा सगळा देखावा होता का? प्रकरण शांत करण्यासाठी तोंडदेखलं दिलेलं आश्वासन होतं का? असा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण इतक्या दिवस गप्प असणाऱ्या श्रीपाद छिंदमने पुन्हा डोकं वर काढलं आहे. आपण राजीनामा दिलाच नसल्याचा दावा त्याने केला आहे. उपमहापौरांनी आपल्या लेटरहेडचा गैरवापर केल्याचा त्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याने महापौर सुरेखा कदम यांच्या कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलीय. 

कोण आहे श्रीपाद छिंदम?

-श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेत भाजपचा नगरसेवक आणि उपमहापौर होता.

-पालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी फोनवर बोलताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. छिंदमच्या फोनची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती.

-छिंदमची ऑडिओ क्लीप ऐकून संपू्र्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं.

-छिंदमच्या अटकेची मागणी केली जात होती. शिवप्रेमींनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये छिंदमविरोधात तक्रार दाखल केली होती. 

नेमकं काय आहे प्रकरण?

-शिवजयंती अवघ्या 3 दिवसांवर आलेली असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याला झापताना छिंदमची जीभ घसरली. त्याने शिवाजी महाराज आणि शिवजयंतीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. कर्मचाऱ्याच्या जातीचा उल्लेख केला.

-कर्मचारी पाठवले नाही म्हणून त्याने बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. बिडवे यांच्याशी बोलताना छिंदमची जीभ घसरली. 

-क्लिप व्हायरल झाल्यावर नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी छिंदमच्या कार्यालयाची तोडफोड केली.

-छिंदमच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी यांच्यासह 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

-शिवसेनेने तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या देत छिंदमविरोधात फिर्याद दाखल केली होती. शिवसेनेसोबतच युवक काँग्रेस कमिटी, छावा मराठा युवा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील छिंदमविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. 

भाजपनं छिंदमला पक्षातून हाकललं होतं-

छिंदम प्रकरणाचा बोभाटा होताच थेट मुख्यमंत्र्यांकडून सुत्रं हलली होती. नगरचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी छिंदमची उपमहापौरपद आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची घोषणा केली होती. गांधी यांनीच छिंदमचा राजीनामा महापौर कार्यालयाकडे पाठवला होता. 

छिंदमला फिल्मी स्टाईल अटक केली-

-छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून फरार होता. 

-क्लिपमध्ये शिवरायांबद्दल अत्यंत गलिच्छ शब्द वापरल्याने अनेक शिवप्रेमी त्याच्या मागावर होते. त्याला पकडून चोप देण्याचा त्यांचा मानस होता. 

-सोलापूर रोडवर तो असल्याची माहिती शिवप्रेमींना मिळाली, त्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली

-नागरिकांच्या संतापाची माहिती मिळताच श्रीपाद छिंदमने आपल्या चारचाकी गाडीतून पळ काढला. लोकांनी त्याचा पाठलाग सुरु केला. 

-रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत श्रीपाद छिंदम शिराढोण शिवारात लपून बसला होता.

-स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना यासंदर्भात माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छिंदमचे मोबाईल लोकेशन चेक केले. छिंदमचा मोबाईल सुरु होता आणि त्याद्वारेच तो घटनाक्रमाची माहिती घेत होता.  पोलिसांनी नगर-सोलापूर रस्त्यावरील शिराढोण शिवारात सापळा लावला. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास छिंदम या सापळ्यात अलगद अडकला.

-पोलिस आल्याचे कळताच छिंदम पळत सुटला आणि शेतात जाऊन अंधारात झोपला. पोलिसांनी रात्री नऊच्या दरम्यान शोधाशोध करुन त्याला ताब्यात घेतले.

तुरुंगात छिंदमला चोप? 

-पोलिसांनी श्रीपाद छिंदमला न्यायालयात हजर केलं. मात्र न्यायालयात गोंधळ होऊ शकतो म्हणून पोलिसांनी शक्कल लढवली. 

-न्यायालयाला विनंती करुन भल्या सकाळी श्रीपाद छिंदमची सुनावणी घेण्याचं ठरलं. सुनावणी न्यायालय उघडल्यावर होईल, असा अंदाज असल्याने शिवप्रेमी उशिरा न्यायालयात पोहोचले. तोपर्यंत कार्यवाही पूर्ण करुन छिंदमला घेऊन पोलीस रवाना झाले होते. 

-छिंदमच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्याविरोधात वातावरण तापलेलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात राडा होण्याची तसेच छिंदमला मारहाण होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी ही शक्कल लढवली. 

-न्यायालयातील सुनावणीनंतर त्याची रवानगी अहमदनगर जेलमध्ये करण्यात आली. याठिकाणी कैद्यांनीच छिंदमला मारहाण केल्याची बातमी होती, मात्र जेल प्रशासनाने याला दुजोरा दिला नाही. 

छिंदम होता अज्ञातवासात-

शिवप्रेमींपासून छिंदमच्या जीवाला धोका होता, त्यामुळे त्याला नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला जामीन मिळाला. थोडेक दिवस नगरपासून दूर असलेला छिंद नंतर नगरमध्ये आला. त्याला शिवप्रेमींनी विरोध केला. पोलिसांनी त्याला काही दिवसांसाठी तडीपार केलं होतं. दरम्यान, आता छिंदम नगरमध्ये राजरोसपणे फिरतोय. 

छिंदमनं पुन्हा रंग दाखवायला सुरुवात केली-

आपल्याला कोणी काही करु शकत नाही, अशी छिंदमची धारणा झाली असावी त्यामुळे नगरमध्ये त्याने पुन्हा एकदा डांगडिंग सुरु केली आहे. आता तर आपण राजीनामा दिलाच नाही, असा दावा छिंदमने केला आहे. महापौरांनी आपल्या लेटरहेडचा गैरवापर केल्याचा त्याचा दावा आहे.

छिंदमच्या दाव्यावर भाजपची चुप्पी-

छिंदमचा राजीनामा घेतल्याचं आणि त्याची हकालपट्टी केल्याचं घोषित करणाऱ्या खासदार दिलीप गांधी यांनी याप्रकरणी सध्या चुप्पी साधली आहे. आपण राजीनामा दिलेला नाही असं छिंदम म्हणत आहे, मात्र दिलीप गांधी याप्रकरणी चकार शब्द बोलायला तयार नाही. त्यामुळे भाजपने छिंदमचा राजीनामा घेतलाच नव्हता का?, असा प्रश्न आता निर्माण झालाय.