ड्रायव्हर नवरा नको गं बाई!!!; आदित्य गुंड यांचा विचार करायला लावणारा ब्लॉग

आपल्या आजूबाजूला बरीच लग्ने जमत असतात, होत असतात. अनेकदा लग्न जमायला नवऱ्या मुलाची नोकरी, धंदा हे कारण असते. अशीच लग्न जमवायला अडचण येणारी एक जमात म्हणजे ड्रायव्हर लोक. अशा लग्नासाठी थांबलेल्या ड्रायव्हर लोकांची कहाणी असलेली तीन भागांची ही लेखमाला… ड्रायव्हर नवरा नको गं बाई!…

 

“नगरचे दिसताय तुम्ही.” गाडीत बसताना एम.एच. १६ पासिंग बघून मी अंदाज लावत म्हणालो.

“नाही सर. अमरावतीचा आहे. (किंवा चंद्रपूर मला नीटसं आठवत नाही.) गाडी सेकंडहँड घेतली.”

“बरं बरं.” मी म्हटलं.

“गाडी चांगली ठेवली आहे तुम्ही.” गाडीत बिसलेरीची नवी, झाकण न उघडलेली बाटली, स्वच्छ सीट कव्हर्स, कार फ्रेशनर या सगळ्या गोष्टी पाहून मी त्याला म्हटलं.

“ह्याच्यावरच सगळं आहे सर. मग करणारच ना.” तो म्हणाला.

“किती पैसे सुटतात महिन्याला?” मी त्याला विचारलं.

“सर मन लावून धंदा केला, सुट्ट्या नाही घेतल्या तर ४५-४६ हजार सुटतात. डिझेल, बाकी खर्च जाऊन ३५ ते ३७ हजार सहज.”

“सगळेच नाही करत तुमच्याएवढं. स्वतःची गाडी असली तरी.” मी त्याला त्याच्यातला आणि इतर गाडीवाल्यांमधला फरक सांगत म्हणालो.

“पुण्यात नोकरीसाठी आलात का?” माझा पुढचा प्रश्न.

“माझं शिक्षण इथेच झालं सर. अमरावतीला असताना बी कॉम केलं आणि पुण्यात आलो. इथे डीजेचा कोर्स केला.”

“अरे वा.”

“मला आवड होती सर. मग तेच शिक्षण घेतलं. डीजे सिस्टीमचा सेट अप विकत घेऊन गावाला बिझनेस सुरु केला. एक दीड वर्ष गेलं बरं गेलं असेल तर सरकारचा डीजेबंदीचा नियम आला. मग सगळंच गुंडाळून ठेवावं लागलं. दरम्यान वडील गेले. लहान भाऊ इंजिनियर होऊन पुण्यात नोकरी करत होता. आई वडिलांनी इथे फ्लॅट घेऊन ठेवला होता. मग मी सुद्धा इथे आलो. सुरुवातीला फ्लिपकार्टला डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी केली. इतर मुलांपेक्षा माझे काम चोख असे. बॉसच्या ते लक्षात आले आणि त्याने मला अकाउंटला बसायला सांगितले. इथे काम चांगले होते पण शेवटचा माणूस येईपर्यंत हलता येत नसे. घरी जायला उशीर व्हायचा. कामाच्या तुलनेत पगार मिळत नव्हता. काय करावे असा विचार करत असताना उबरबद्दल कळलं. मग उबरला गाडी चालवायची ठरवली. लगेच ही गाडी घेऊन सुरुवात केली. गेले ८-९ महिने झालेत. सगळं व्यवस्थित सुरु आहे.” एका दमात एवढं सगळं सांगून तो मोकळा झाला.

“चांगलं आहे की.” मी त्याला प्रोत्साहन देत बोललो.

“लग्न झालंय का?” मी पुढचा प्रश्न विचारला.

“नाही सर. चाललंय बघणं. मुलीच मिळत नाहीत.” त्याने उत्तर दिलं.

“का बरं? सगळं तर चांगलं आहे तुमचं. स्वतःची गाडी आहे, घर आई वडिलांचं असलं तरी पुण्यात आहे. तिकडे अमरावतीला आहे ते वेगळं. मग काय प्रॉब्लेम आहे?” मी त्याला विचारले.

” ते सगळं बरोबर सर, पण शेवटी मी ड्रायव्हरच ना!”

“अरे पण ड्रायव्हर काही कुणा दुसऱ्याच्या गाडीवर तर नाही ना? स्वतःची गाडी आहे तुमची. तुम्ही तर शेठ आहात. महिन्याला निदान घर चालवता येईल इतके पैसे तर निश्चितच कमावता आहात.”

“काय सांगू सर. मुलींना नाही चालत हे असं स्थळ. गेल्या ३-४ महिन्यात आठ दहा मुली पाहिल्या मी. दहावी नापास असलेल्या, काहीही करत नसलेल्या मुलींनासुद्धा ग्रॅज्युएट नवरा हवा असतो. पन्नास हजार लाख रुपये पगार हवा असतो, पुण्या-मुंबईत रहायचं असतं.”

“क्या बात है!” मी विनोदाने म्हणालो.

“सर मला एका मुलीचे स्थळ आले होते. ती मुलगी एका कंपनीत अॅडमिनला काम करत होती. तिने मला व्हाट्सअपवर “Hi” म्हणून पिंग केलं. मीसुद्धा रिप्लाय दिला. तिचा पुढचा प्रश्न होता तुम्ही काय करता?

मी सांगितलं की, मी उबर चालवतो. गाडी स्वतःची आहे. त्यानंतर तिने परत मला मेसेज केलाच नाही. मीही विषय सोडून दिला. नंतर चौकशी केली तर कळलं तिला पगार होता ८ हजार रुपये! आता सांगा लग्नाला नाही कुणी म्हटलं पाहिजे?”

त्याचं हे बोलणं ऐकून आम्ही दोघंही मनमोकळं हसलो. एव्हाना गाडी एअरपोर्टला आली होती. तुम्हाला लवकरच तुमच्या योग्य मुलगी मिळेल, अशा शुभेच्छा त्याला देऊन मी पुढे निघालो.

 

लेखक- आदित्य गुंड, aditya.gund@gmail.com