उडत्या तबकडीचं रहस्य उलगडलं, जे घडलं ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं!

जिन्यावरून मोबाईल पहात पहात घरात जायचे सोडून आम्ही कधी टेरेस वर पोहचलो ते लक्षातच आले नाही, आता आलोच तर थोडावेळ ग्राहताऱ्यांचे काय चालले आहे ते पाहू असा विचार करून आम्ही वर तोंड केले, आता आकाशातील याला काय कळते असा प्रश्न बहुदा उपस्थित केला जाऊ शकतो, त्यांना सुरवातीलाच सांगू इच्छितो की खोडद ची रेडिओ दुर्बिणीत तांत्रिक बिघाड असल्यावर बऱ्याच वेळा उघड्या डोळ्यांनी आकाश निरीक्षण करण्यासाठी आम्हाला निमंत्रित केले जाते,

आम्ही थोडा वेळ डोळे बंद करून , मंगळावर दुष्काळ आहे का, बुधावर पालवी फुटली का, गुरू, फ्लूटो व्यवस्थित फिरत आहे का वगैरे माहिती नमूद करून देत असतो,

असो, तर आम्ही वर तोंड करून आकाशाचे निरीक्षण करत असतानाच, आम्हाला मंगळ ग्रहावर बारीकशी हालचाल दिसली, तसे आम्ही सावध झालो, सूक्ष्म डोळे करून पाहिले असता, आमच्याकडे पाच बिंदू येताना दिसले, हा नवीन प्रकार काय आहे? आमची जिज्ञासा जागी झाली, ते पाच बिंदू हळूहळू मोठे व्हायला लागले,

हे मोठे गोलाकार बिंदू जसजसे जवळ यायला लागले तसतसे आमची धडकन वाढत गेली, आम्ही कोपऱ्यात लपून बसलो, याचा छडा लावायचाच ही खूणगाठ मनाशी पक्की केली, आणि कपडे वाळत टाकायच्यावेळी वापरतात तो चिमटा आम्ही तारेवरून काढून हातात घेतला,

शेवट जशा त्या आकृत्या जवळ आल्या आम्ही हिम्मत करून तो चिमटा एका ठिकाणी अडकवला आणि त्याला लोमकळू लागलो, आम्ही हवेत तरंगत असताना निरीक्षण केल्यावर समजले की या तर तबकड्या आहेत.

देशावर मोठं संकट आले आहे हे आम्ही त्वरित जाणले, जीवाची पर्वा न करता आपण मोठा लढा द्यायचा हे आम्ही मनोमन ठरवून टाकले,

सदर तबकड्यांनी उत्तरेकडे कूच केले हे आम्ही लगेच जाणले, काही क्षणात तबकड्या एका घरावर स्थिरावल्या, हे घर कुठं तरी आपण पाहिले आहे हे लक्षात आले, बहुतेक टीव्हीवरच,

आम्ही हळूच चिमटा सोडवून घेतला, आणि खिशात ठेवला (आमच्याकडे चिमट्या चिमट्याचा हिशोब ठेवला जातो, परत घेऊन जाणे गरजेचे होते) आणि अंधारात लपून बसून पुढच्या हालचाली पाहू लागलो,

पाच तबकड्यात मध्यभागी असलेली तबकडी ही पुरुष तबकडी आहे हे आम्ही लगेच ताडले, सदर तबकडीला सोंड होती, आणि मंगळावर पण पुरुषप्रधान सत्ता आहे हे आम्ही वेळीच जाणले,

तबकडीचे हळूहळू दरवाजे उघडले गेले, आणि चित्रविचित्र पाच लोक त्यातून उतरले, आपसात खुसुरपुसुर केल्यावर ते जिन्यातून खाली उतरू लागले, आम्ही पण हळुवार पावले टाकत त्यांचा मागोवा घेत मार्गक्रमण केले,

त्यांनी हळुवारपणे बहुतेक मंत्राने एक दरवाजा उघडला, आणि आत गेले, आम्ही पण गुपचुप आता घुसलो, आणि दरवाजामागे लपलो,

किलकिल्या डोळ्यांनी आम्ही पहात होतो, समोर एक इसम तोंडावर पांघरून घेऊन बेडवर झोपला होता, हे सर्व परग्रहवासी बेडभोवती गोळा झाले, आणि त्यांनी चादर बाजूला काढली, पाहतो तर काय? साक्षात मोदीजी….

“मोदीजी उठा… मोदीजी उठा”, हे शब्द आमच्या कानावर पडले, पण हुं नाही की चुं नाही, फिटनेस व्हीडिओमुळे दमले असतील, असा मनात विचार आला.

त्यांच्यातला एकजण घड्याळ बघत बोलला, “5 वाजलेत तरी अजून उठले नाहीत, ट्विटरवर तर 4 वाजता उठतो अशी पोस्ट होती यांची.”

तो तसं बोलल्यानंतर आम्हाला उगाच लाजल्यासारखे झाले.

बराच वेळ जोरात हलवल्यावर मोदीजी जागे झाले, उठून बसले, डोळे चोळत चोळत म्हणाले,

“या विराट कोहलीच्या तर … फुल्या फुल्या फुल्या…”

“नमस्ते मोदीजी” तिकडून आवाज आला, तसे मोदीजी जरा सावध झाले, या चित्र-विचित्र आकृती पाहून न घाबरता आपली ५६” छाती त्यांनी ६५” करून त्यांनी “कोण बे तुम्ही?” असं डायरेक्ट दम भरला,
तसे तबकडीवाले टरकले, चार पावले मागे गेले.

त्यातला एकजण धीर धरून पुढं येऊन म्हणाला, “मोदीजी, आम्ही तुमचे मित्रच, या पृथ्वीवर तुमचे सगळे देश हिंडून फिरून झालेत, आता कुठं पुढची ट्रीप काढायची या प्रश्नाने तुम्हाला पछाडले आहे, हे आम्ही जाणले. म्हणूनच खास तुमच्यासाठी आम्ही आमच्या मंगळ ग्रहाला भेट द्यावी हे निमंत्रण घेऊन आलो आहोत.”

हे ऐकल्यावर मोदींचा जो चेहरा खुलला जो चेहरा खुलला काय सांगु…

तर सर्व तमाम देशवाशींच्या पुढे आम्ही नमूद करू इच्छितो की, सदर तबकड्या या खास मंगळ ग्रह भेटीचे निमंत्रण देण्यासाठी आल्या होत्या. आम्ही स्वतः साक्षीदार असल्याने कोणतीही चिंता न करता, मोदींजींना पुढील दौऱ्यासाठी शुभेच्छा द्याव्यात ही विंनती….

लेखक- अमोल शिंदे, amolshinde25@gmail.com