ड्रायव्हर नवरा नको गं बाई – भाग 2

“नवी गाडी तुम्ही चालवणार मग जुनी आहे तिचं काय करणार?” नुकतीच नविन गाडी घेतलेल्या अण्णांना मी विचारलं.

“मेहुणा आहे सर आपला. इथंच राहतो पुण्यात. त्याला ती गाडी चालवायला लावू.” त्यांनी उत्तर दिलं.

“हे बरं आहे.त्यालाही थोडाफार हातभार लागेल.” अण्णांच्या बोलण्याला दुजोरा देत मी म्हटलं.

“हो सर. यंदा त्याचं लग्न करायचा विचार आहे.” त्यांनी मनातला विचार बोलून दाखवला.

“अरे वा. मग जमलं की अजून शोध सुरु आहे?” माझा पुढचा प्रश्न.

“चाललंय. बघू कसं काय जमतंय.” ते म्हणाले.

अण्णांबरोबरच्या या प्रवासानंतर तीन चार महिने माझं कामानिमित्त त्यांच्या गाडीने प्रवास करणं झालं नाही. गेल्या आठवड्यात भेटले तेव्हा मी त्यांच्या मेहुण्याच्या लग्नाचा विषय काढला.

“मेहुण्याचं जमलं की नाही अजून?”

“कसलं काय. अजून काहीच नाही.” अण्णा उत्तरले.

“का? काय झालं?” मी प्रश्नार्थक चेहरा करत त्यांना विचारलं.

“अहो पोरीच मिळंनात. ड्रायव्हर पोरगा नको म्हनत्यात.” अण्णा हैराण झाल्याचं मला जाणवलं.

“आयला हे जरा विचित्रच आहे.” मीही बुचकळ्यात पडलो.

“मला सांगा सर, पोराला आपण आपली स्वतःची गाडी दिली. ती त्याच्या नावावर पण करून देऊ. सध्या ती गाडी एका कंपनीला लावली आहे. रोजचे दोन अडीच हजार सुटतात. फक्त त्याचं घर भाड्याचं आहे. मंग काय वाईट आहे? जमंल तेव्हा घेईल तो. बर आपला पोरगा निर्व्यसनी आहे. ते तुम्ही म्हणता तसं ऑकेजनली पण नाय पार. इतकं सगळं असताना पोरगी मिळाना. एक होती आठवी नापास. तीसुद्धा नाय म्हणाली म्हणजे बघा. पार डोकं आउट झालंय. सासरच्यांना वाटतंय पाहुणा करंल काहीतरी. आता त्यांना काय सांगावं कळंना झालंय. ते पोरगं नाराज हाये ते वेगळंच.

आम्ही पण ड्रायव्हरच होतो का नाय? झालं लग्न. चाललंय सगळं चांगलं. पोरींना हे का कळत नाही देव जाणे.” अण्णांनी आपलं मन मोकळं केलं.

“जमेल जमेल. यंदा नाही तर पुढच्या वर्षी. तुम्ही नाराज कशाला होता?” अण्णांना धीर देत मी विषय बदलायच्या मागे लागलो.

लेखक- आदित्य गुंड, aditya.gund@gmail.com

 

वाचा याआधीचा भाग –

ड्रायव्हर नवरा नको गं बाई!!! भाग - 1