दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हे आता आम्ही ठरवणार

19 जून 1966 रोजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केला. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत महत्त्वाच्या ठरलेल्या या पक्षाचा आज 52 वा वर्धापनदिन आहे. राज्यात भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या शिवसेनेला सत्तेची उब चाखता आलेली नाही. भाजपने आपल्यासोबत द्रोह केल्याची भावना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांच्या मनात आहे. उद्धव ठाकरे यांनी तर आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. खुद्द भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीच्या पायऱ्या चढल्या, मात्र उद्धव ठाकरे यांनी अद्याप तरी आपला हा निर्णय बदललेला नाही. 

आज पक्षाचा 52 वा वर्धापनदिन, त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका मांडत आलेलं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखाकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. या अग्रलेखात महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर येईलच मात्र दिल्लीच्या तख्तावरही कोण बसणार हे ठरवण्याची ताकद शिवसेना निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मोदी सरकारवर या अग्रलेखाच्या माध्यमातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. याचा अर्थ आगामी काळात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच भाजप हे देखील शिवसेनेचं लक्ष्य असणार आहे. 

काय म्हटलंय सामनाच्या वर्धापनदिन विशेष अग्रलेखात?

-52 वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना एका प्रतिकूल परिस्थितीत झाली. असंख्य खाचखळग्यातून, काट्याकुट्यांमधून शिवसेनेचा प्रवास झाला. या सगळ्यांवर यशस्वी मात करत शिवसेना आजच्या शिखरावर पोहोचली आहे. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.

-शिवसेना नक्की काय आणि कसे करणार? असे प्रश्न तेव्हा ज्यांना पडले आहेत त्यांच्या गोवऱ्या स्मशानात गेल्या पण शिवसेनेचा वेलू आजही गगनावर का जात आहे?, याचा अभ्यास आमच्या विरोधकांनी करायचा आहे.

-शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा किती तरी लोक म्हणाले की, ‘‘इकडे मोगलांचे  केवढे विराट राज्य आहे. दक्षिणेकडील राष्ट्रे किती मोठी आहेत. या शिवाजीजवळ पगार द्यायला पैसा नाही, हा कसला स्वराज्याची स्थापना करतो. याच्यामागे कोण जाणार?’’ असे शिवाजी महाराजांना महाराष्ट्रातील जहागीरदार, सरदार, सुभेदार म्हणत होते आणि तरीही शिवाजी महाराजांनी आपले काम केले. याचे कारण आपल्या पश्चात शिवसेना उभी राहणार आहे, यावर त्यांचा विश्वास होता.

-जो विरोध छत्रपती शिवाजी महाराजांना झाला, तो शिवसेना प्रमुखांना त्यांच्या वाटचालीत झाला. मात्र अशा प्रकारचा विरोध पत्करूनही जो सत्कार्यावर विश्वास ठेवतो, तो कार्य तर निश्चितपणे तडीस नेतोच पण जयस्तंभ आणि मानस्तंभ देऊन पुढे चालतो. असे ऐतिहासिक कार्य शिवसेना करत आहे.

-मराठी माणूस हिंदुत्व आणि हिंदू संस्कृतीशी द्रोह करणार नाही, असे व्यापक तत्त्वज्ञान स्वीकारून मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी मंडळी शिवसैनिक आहेत. म्हणून तर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून हिमालयापर्यंत प्रत्येक राज्य शिवसेनेकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे.

-आसाम गण परिषदेचे सर्व प्रमुख लोक कालच आम्हाला ‘मातोश्री’वर येऊन भेटले. देशभरातील प्रादेशिक पक्ष मजबुतीने एकत्र यावेत आणि त्यांचे नेतृत्त्व शिवसेनेने करावे, असा विचार या मंडळींनी मांडला. हे लोक आसामात भाजपबरोबर सत्तेत सहभागी आहेत पण आसामची संस्कृती, भाषा, अस्तित्व आणि भूगोल संकटात येत असताना सत्ता म्हणून तेथे सगळेच मिठाच्या गुळण्या घेऊन बसले आहेत.

-प्रत्येक प्रांताला स्वतःची एक अस्मिता आहे म्हणूनच घटनेनुसार भाषावार प्रांतरचना निर्माण केली गेली. स्वतःच्या घरामध्ये शिरणे म्हणजे आभाळाशी वैर नव्हे तसे महाराष्ट्रावर प्रेम करणे म्हणजे हिंदुस्थानचा द्रोह नव्हे. कारण महाराष्ट्र हे हिंदुस्थानचे सगुण रूप आहे, पण महाराष्ट्रावरही आघात सुरू आहेत. पैसा व सत्तेचा विषप्रवाह मुंबईसह महाराष्ट्राचे रूप बदलू पाहत आहे.

-मुंबई नासवण्याचे कारस्थान रचले जात आहे. ‘बॉम्बे’चे मुंबई केले याची पोटदुखी असणाऱ्यांनी मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावे परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पाठीवर धपाटा मारला जाईल. परळ, दादर, गिरगाव, वडाळा आणि शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावाने ओळखली जातील. ज्यांना या ‘गावां’ची नावे बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून ‘बाजार’ मांडायचा आहे त्यांनी आधी आपल्या बापांची नावे बदलून यावे.

-2014 चा राजकीय अपघात 2019 सालात होणार नाही. सत्तेचा माज आम्हाला कधी चढला नाही आणि पुढेही आम्ही तो चढू देणार नाही. देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे. नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणे व राज्य चालविणे मुश्कील होईल.

-धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळ्यात आणि श्वासात धुळीचे कण जात नसावेत पण जनता बेजार आहे.

-शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही. शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्या डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील.

-महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल आणि दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करील. तेवढा आत्मविश्वास आमच्यात नक्कीच आहे.