ड्रायव्हर नवरा नको गं बाई, भाग- 3; आदित्य गुंड यांचा विचार करायला लावणारा ब्लॉग

“आजची शेवटची ट्रीप का ही?” गाडीत बसल्यावर मी ड्रायव्हरला विचारले. रात्रीचे 11 वाजून गेले होते. यावेळी बरेच उबर ड्रायव्हर एक तर ड्युटी सुरु करत असतात किंवा संपवत असतात.

“नाही सर. अजून एक-दोन ट्रिप करून जाईन घरी.” त्याने उत्तर दिले.

“बराच उशीर होईल की घरी जायला.” मी त्याला म्हणालो.

“चालतंय सर. तसं पण घरी आपली वाट बघायला कोणी नाही.” उसासा टाकत तो बोलला.

“का बरं? कुणीतरी असेलच की.” मी पुन्हा त्याला विचारलं.

“बायको होती सर. ती वारली दीड वर्षापूर्वी.” तो उत्तरला.

“अरे अरे…. सॉरी….” आपण उगाच विषय काढला असं मला वाटलं.

“नाही सर. सॉरी कशाला म्हणताय? तुम्हाला माहित नव्हतं.” त्यानेही मला दोष दिला नाही.

त्याच्या या अशा उत्तराने एरवी ड्रायव्हर लोकांशी घडाघडा बोलणारा मी थोडा वेळ शांत झालो. काय बोलावं याचा विचार करू लागलो. तो दिसायला तसा माझ्याच वयाचा वाटत होता. न राहवून मी त्याला म्हणालो,

“राग मानू नका. तुम्ही तरुण आहात. मग दुसऱ्या लग्नाचा विचार का नाही करत?”

“करतोय ना सर, पण मुलगी मिळत नाही.” तो हताशपणे म्हणाला.

“का? तुमचं वय कितीक आहे असं?”

“29 वर्षं…. त्याचं काय नाय सर…. लग्नाची गाडी माझ्या धंद्यापाशी येऊन थांबतीये.” माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे आरशातून पहात तो म्हणाला.

“का? वाईट काय आहे ह्या धंद्यात?” मलाही कोडं पडलं.

“वाईट काहीच नाही हो. कधी मुलीच्या आईबापाला तर कधी मुलीला हा धंदा नको वाटतो. एका मुलीला पसंत पडलो तर तिच्या आई-बापाला काय त्रास झाला कोण जाणे. एका आई-बापाने मी दुसऱ्यांदा लग्न करतोय हे स्वीकारून तयारी दाखवली तर मुलीला ते पटलं नाही. म्हणजे माझं दुसरं लग्न आहे ह्याच्याबद्दल तिला काही प्रॉब्लेम नव्हता पण मी ड्रायव्हर आहे हे तिला नको होतं. माझी गाडी स्वतःची आहे. कर्ज नील केलंय. हडपसरला स्वतःचं घर आहे. 2-3 एकर शेती आहे. ती वडील पाहतात. बहीण भाऊ नाही. मी एकटाच आहे. माझं दुसरं लग्न आहे म्हणून तडजोड करायची पण तयारी आहे माझी. मुलगी जास्त शिकलेली नसली तरी चालेल, दुसरं लग्न करणारी असली तरी चालेल. असं असूनही मुली नको म्हणतात. मग सारखं ते डोक्यात राहण्यापेक्षा मी आपला गाडी चालवतो. घरी गेलं की डोक्यात तेच विचार येणार. त्यापेक्षा तुमच्यासारखे गप्पा मारणारे कस्टमर भेटले की जरा मन मोकळं होतं. आता बघू. मुली पहात रहायचं. जमंल तेव्हा जमंल….”

“खरंय तुमचं. जमंल लवकरच….” असे म्हणून मीही शांत बसणे पसंत केले.

 

-लेखक- आदित्य गुंड, aditya.gund@gmail.com

 

वाचा याआधीचा भाग –

ड्रायव्हर नवरा नको गं बाई!!! भाग - 1

ड्रायव्हर नवरा नको गं बाई – भाग 2