घाटकोपरमध्ये विमान कोसळलं… नेमकं काय झालं? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

घाटकोपरमध्ये आज एक चार्टर्ड विमान कोसळलं. जीवनदया लेन परिसरात ही धक्कायदायक घटना घडली. या दुर्घटनेत पायलटसह विमानातील तिघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यु झाला आहे. व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 असं या विमानाचं नाव आहे. 

महिला वैमानिक मारिया कुबेर, सहवैमानिक प्रदीप राजपूत, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर पादचारी गोविंद पंडित यांचाही या अपघातात दुर्दैवी अंत झाला.

कशी घडली दुर्घटना?

-दुपारी 1 वाजता विमानाने जुहूमधून उड्डाण घेतलं.

– दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी विमान कोसळलं

-परिसरातील लोकांना मोठा आवाज आल्याने एकच घबराट पसरली

-1 वाजून 16 मिनिटांनी अग्नीशमन दलाला पहिला फोन आला

-1 वाजून 37 मिनिटांनी अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचलं

-1 वाजून 40 मिनिटांनी आग विझवण्यात आली

उत्तर प्रदेश सरकारनं विकलं होतं विमान-

घाटकोपरमध्ये कोसळलेलं विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. अलाहाबादमध्ये या विमानाला अपघात झाला होता, त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने हे विमान विकलं होतं. मुंबईतील यूवाय एव्हिएशन या कंपनीनं हे विमान विकत घेतलं होतं. अपघातानंतर झालेला बिघाड दुरुस्त केल्यानंतर आज या विमानाची चाचणी घेतली जात होती. 

महिला वैमानिकाने वाचवले अनेकांचे प्राण-

महिला वैमानिक मारिया कुबेर यांना अपघाताची कल्पना येताच त्यांनी विमान निर्मनुष्य ठिकाणी लँड करण्याचा प्रयत्न केला. मारिया यांच्या या प्रयत्नामुळे विमान नागरी भागात पडण्यापासून वाचलं. एका बांधकाम सुरु असलेल्या साईटवर विमान क्रॅश झालं. सुदैवाने या साईटवर दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान जेवणाची सुट्टी होती. त्यामुळे या साईटवरील कामगार जेवण्यासाठी गेले होते. मारिया यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले. एका पादचाऱ्याला मात्र आपला जीव गमवावा लागला. 

सकाळी पूजा, दुपारी विमान कोसळलं-

घाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमानाची आज चाचणी होती त्यामुळं सकाळी विमानाची पुजा करण्यात आली होती. मात्र दुपारी चाचणी दरम्यान या विमानाचा अपघात झाला. विमानाचे पुजेचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

दुर्घटनाग्रस्त विमान नेमकं कुणाचं?

सी 90 प्रकारचं 12 लोकांची क्षमता असलेलं हे विमान होतं. जुहू येथून हे विमान चाचणीसाठी निघालं होतं. विमानावर उत्तर प्रदेशचं नाव दिसत असल्याने सुरूवातीला हे विमान उत्तर प्रदेश सरकारचं असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र हे विमान आमचे नसून ते 2014 साली विकले असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे. हे विमान दीपक कोठारी यांच्या मालकीचं असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक कोठारी हे पान परागचे मालक आहेत.