तो म्हणतो, “साहेबांना निवडून नाही द्यायचं मग कुणाला?”

फार क्वचित एकदा प्रवास केलेल्या उबर ड्रायव्हरबरोबर पुन्हा प्रवास करायचा योग येतो. ड्रायव्हर गप्पा मारणारा असेल तर फारच उत्तम. 14 जुलैला संतोषरावांसोबत एअरपोर्टहून घरी आलो होतो. येताना घर, गाव, त्यांचा लग्नाअगोदरचा विहfरी खोदण्याचा व्यवसाय, पुण्यातील नोकरी आणि आता उबर असा प्रवास त्यांनी सांगितला होता.

आज गाडीत बसतानाच मला आधीच ओळखलेल्या त्यांनी “सर नमस्कार” म्हणून स्वागत केले.

संतोषराव माढा तालुक्यातील कुर्डुवाडीजवळच्या कव्हे रोकळे या गावचे. तिथून पुढे मग गावातला ख्वाजा बाबाचा उरूस, महादेवाचा उत्सव, त्या निमित्ताने एकत्र येणारे गावकरी, त्यांच्यात होणारे वाद, उरुसाच्या वेळी होणारा कुस्त्यांचा आखाडा, गावातल्या एका माजलेल्या बोकडाची आख्यायिका अशा अनेक गोष्टींवर त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

माढ्यातून 2009 साली साहेबांनी निवडणूक लढवली होती.

त्याबद्दल विचारल्यावर, “लोक काहीही म्हणतो सर. तो माणूस लई मोठ्ठा आहे आणि आपला आहे. कितीही काही झालं तर आज त्यांचं योगदान नाकारता येणार नाही. आज दिल्लीत सुद्धा महाराष्ट्राचा माणूस म्हटलं, की फक्त साहेबांचं नाव घेतात. परत उभे राहिले तरी त्यांनाच निवडून देणार. त्यांना नाही निवडून द्यायचं तर मग कुणाला द्यायचं?” असं म्हणून साहेबांना आजही पाठिंबा असल्याचं त्यांनी दाखवलं.

राजकारण, शेती, गावकी अशा सगळ्याच विषयांवर भरभरून गप्पा मारणारे ड्रायव्हर तसे दुर्मिळच. एअरपोर्टला पोहोचल्यावर त्यांचा फोटो काढून घेण्याचा मोह आवरला नाही.

आणखी काही प्रवासगोष्टी-

-ड्रायव्हर नवरा नको गं बाई!!! भाग – 1

ड्रायव्हर नवरा नको गं बाई – भाग 2

-ड्रायव्हर नवरा नको गं बाई!!! भाग – 3

-गोष्ट दुर्देवी, शिक्षणव्यवस्थेनं नाडलेल्या आदित्यची….

-सेल्फी हवी??? मग 20 पुशअप्स मारा… मिलिंद सोमणचा अजब नियम…