साहेबांचा गामा : अविरत – अविश्रांत (Gama Since 1971)

माझा साहेबांवरील ‘साहेब , मी आणि हेलिकॉप्टर’ हा लेख फेसबूक वर पोस्ट केला आणि त्याने पाच दिवसांत पाच लाख वाचकांचा आकडा पार केला. म्हटलं आता काहीतरी हलकं-फुलकं लिहावं . हलकं-फुलकं लिहायचं पण विषय मात्र वजनदार माणसाचा असावा. साहजिकच साहेबांच्या स्टाफ परिवारातली सगळ्यात वजनदार पण खट्याळ व्यक्ती समोर आली ती गामा ! गामा नावाच्या जुन्या नामचीन पहिलवानावरून बहूदा गामाचं नाव ठेवलं असावं. ‘ गामा कोण म्हणाल ? ‘तर मला आश्चर्य वाटेल. किमान महाराष्ट्रात जे-जे साहेबांना जाणतात , ते-ते गामाला ओळखतात. गामा असं व्यक्तीमत्व कि, साहेबांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ ह्या आत्मचरित्रपर लिखाणात दीड पान खर्ची घातलं आहे. गामाला हे कळलं आणि गामाने जेव्हा हे वाचलं तेव्हा गामाला कृतज्ञता भावाने उमाळा येईल, आयुष्याचं सार्थक झाल्याच्या भावनेनं गदगदून येईल असं वाटलं होतं. पण गामाचा खटयाळपणा पुढे आलाच . गामा मिश्किलीने म्हणाला ” माझ्यावर ज्यांनी दीडपान छापलं त्यां छापणाऱ्यांना पैकं मिळणारचं कि, मग मला पण त्यातली काय म्हणत्यात ते , रायल्टी नको का मिळायला ! ”

मी गामावर लिहायला घेणार म्हटल्यावर मला गामा ‘काय म्हणेल’ याची कल्पना होतीच. मी गामाला म्हटलं कि, गामा , तुम्ही माझ्यासमोर फक्त बोलत राहा; तुम्ही कधी साहेबांकडे कामाला लागला;तुम्हाला काय –काय अनुभव आले… वगैरे वगैरे ! पण मुलाखत म्हटले कि, गामाने काही वेळ लाजल्यासारखे केले पण पुन्हा गामाची डिमांड पुढे आली.

” लिव्हा पण, एका वाक्याला हजार रूपयं पडतील ! ”

मी म्हटलं ” पैकं कशाचं ? हे फेसबुक आहे, पुस्तक नाही ! ”

‘ते बुक असू द्या नाय तर फेसबुक, रायल्टी का काय म्हणत्यात त्ये द्यायला लागंल. ”

”ठिक आहे गामा, देतो मी वाक्याला एक हजार रूपये पण मी सगळं लिहिणार, काहीही लपवणार नाही.
पण फेसबुकवर टाकण्या आधी तुम्हाला दाखवणार. आणि तुम्ही जे गाळायला सांगाल त्या वाक्यागणीक तुमच्याकडून दोन हजार रूपये घेणार, आहे का मंजूर?”

गामाला कळलं कि राऊत सायबाचा काय नेम नाय, लगेच नको-नको म्हणत गामाने माघार घेतली.

तर असा हा गामा! गामा या वर्षी वयाची एकोणसत्तरी पुर्ण करीत आहे. गामा आमच्या साठी मामा असल्यामुळे गामाचा लिहिताना एकेरी उल्लेख करतो. पण त्यांच्याशी बोलताना आदरार्थीचं शब्द बाहेर पडतात. सारथ्य करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला देखील ‘अहो-जाओ’ कुठे म्हणतो आपण ! अहो-काहो ने उगीच परक्यासारखं वाटतं.

काय असावं गामामध्ये कि, ज्यावर साहेबांनी दीडपान लिहावं ! गामा हे एक अजब रसायन आहे. १९७१ मध्ये साहेबांनी राज्यभर फिरण्यासाठी एखाद्या भरवशाच्या ड्रायव्हरची गरज बारामतीच्या डॉ.शहांकडे बोलून दाखवली. भरवशाचा माणूस द्यायचा डॉ.शहांनी स्वत:च्या ड्रायव्हरची म्हणजे गामा सोपाना बोराटे ह्या विशीतल्या तरूणाची वर्णी लावली. गामाने काम तर जोमात सुरू केले पण कामावर रूजू झाल्यावर काही दिवसांतच गामाच्या मनात काय आले कुणास ठाऊक ! त्याने पुन्हा डॉ.शहांच्या घरचा रस्ता धरला. पण डॉ. शहा देखील कच्चे खेळाडू नव्हते त्यांनी पुन्हा गामाला साहेबांच्या समोर उभे केले. तेव्हापासून आजतागायत गामा साहेबांसाठी अविरत आणि अविश्रांत सारथ्य करीत आहे.

तुम्ही साहेबांना मुंबईत भेटायला आलात कि, उतारवयातही तरलेले तरूणकाळे केस तेलाने चोपडून बसवलेला एक जेमतेम उंचीचा, मध्यम गोलकार पोटाचा माणूस भल्या सकाळी कपाळाला भस्म लाऊन किंवा दोन भुवयांच्या मध्ये ज्योतिबाच्या नावानं मोठा गोल टिळा लाऊन सिल्व्हर ओक निवासस्थानाच्या बाकड्यावर बसलेला दिसतो. वर्दळ सुरू झाली कि, डाव्या खिशातला लाल-पिवळा कंगवा , मोबाईल आणि एखादं कागदी पाकीट सांभाळत त्याची नजर रिघ न्याहाळीत असते. तोच तो पोलीसी नजरेचा आमचा गामा मामा !

कुणाच्या गाडीचा कर्कश आवाज कानी आला किंवा गाडी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केली कि, गामा ड्रायव्हरवर खेकसलाच म्हणून समजा. त्यावेळी बंदोबस्तातील पोलिसांची देखील धावपळ उडते. गामा माणसं ओळखण्यात वाकबगार ! त्यामुळे बंगल्यावर डि.एफ.एम.डी. ( मेटल डिटेक्टर) ची गरज पडत नाही. गामाचे केस जसे शाबूत तसे गामाचे डोळे पण एकदम झ्याक ! अद्याप चष्मा जवळपास पण फिरकला नाही. शी.आय.डी. गामाला ‘दाल में कुछ काला हैं’ म्हणीप्रमाणे काही काळंबेरं होत असेल तर दिसतंच , पण वयाची ६९ पुर्ण केली तरी गामाची नजर ‘चील की नजर हैं, कोई परिंदा भी पर नही मार सकता उनकी नजर सें बच के !’ पण शी.आय.डी. वृत्तीमुळे बंऱ्याचदा नसलेलंही दिसतं.

‘ चौकशी करणे हा आमचा धंदा , कुणी निंदा अथवा वंदा !’ साहेबांना जाणता राजा म्हणतात कारण साहेबांना सामान्य माणसांची जाण आहे आणि तळागळातल्या गोष्टींचं ज्ञान आहे. गामाही बऱ्यापैकी ‘जाणते’ आहेत. साहेबांना लोक येऊन सांगतात. पण गामा जाऊन चौकशी करतो. त्यामुळे गामाला आम्ही शी.आय.डी. म्हणतो. त्यांचा टि.व्ही. पाहण्याचा छंद हा त्यांच्या ह्या स्वभावाला अनुसरूनच आहे. गामाला सी.आय.डी. पाहण्याचा भारी शौक. सतत सोळा वर्षे सी.आय.डी. पाहून ते ही ए.सी.पी. प्रद्युम्न झाले आहेत. साटम साहेब कधी सुटीवर गेले कि, गामा ती कसर भरून काढतील. ‘दया, कुछ तो गडबड है ‘ हा प्रश्न समोरच्याची चाचपणी करताना सतत त्यांच्या मनात असतो. मी तर मजेने म्हणतो. एखाद्या गुन्ह्याची उकल झाली नाही तर गामाकडे केस सोपवा. गामा काहीतरी शक्कल लढविल्याशिवाय राहणार नाही. सी.आय.डी., क्राईम पॅट्रोल, सावधान इंडिया हे गुन्हे अन्वेषक कार्यक्रम गामाच्या कृपेनेच प्राईम टाईमला चालत असतात.

साहेब सतत भ्रमंती करत असतात, गामासाठी हि नित्याची बाब झाली आहे. साहेबांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमाची एक प्रत गामाकडे दिली जाते. गामा ती आवर्जून मागतो. दौरा कार्यक्रमात टायपिंग मध्ये क्वचितप्रसंगी काही चूक असली कि त्याचे चाणाक्ष डोळयांनी ती टिपली जाते. गामा दौऱ्यावर असला कि, गाडी अजिबात सोडत नाही. साहेबांना झेड प्लस सुरक्षा असल्याने पुढे पायलट आणि मागे दोन एस्कॉर्ट अशा लवाजम्यासह आमचा प्रवास सुरू होतो. कुठे जायचंय ? जाण्याचा रस्ता कसा ? ट्रॅफीक किती आहे? हे सगळं गामा पी.एस.ओ. आणि पायलटशी चर्चा गामाशी करत असतो. चर्चा लहान आवाजात कधीच नसते. बंदोबस्तातल्या सगळ्या पोलिसांनी गामाला कॅम्प ऑफिसरचा दर्जा बहाल केलाय. मी तर डि.सी.पी. गामाच म्हणतो. एकदा ठाणे भागात असताना पुण्याला नेहमीच्या रस्त्याऐवजी वाहतूक पोलीसांनी दूसरा मार्ग निवडला. गामा राजी होईना . डि.सी.पी. परोपकारी होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त सुध्दा बाजूला होते. एक पोलीस म्हणाला-”गामा साहेब वाटेत खड्डे आहेत.” गामा भडकला ” कसले ख़ड्डे घीवून बसलाय…सगळं सरकारंच खड्ड्यात गेलंय!” सगळीकडे हशा पिकला. पुन्हा गामाचा कुणी नाद केला नाही. ताफा नेहमीच्या रस्त्यानेच न्यावा लागला. रस्त्यावरले खड्डे सांगणारी, वाहतूकीचे अडथळे सांगणारी गामाची समांतर चौकशी यंत्रणा आहे. जी सहसा चुकत नाही.

गाडीत कितीजण असावेत हे ठरवण्याचे अधिकार गामाला इरिव्होकेबल दिले गेलेले आहेत. त्यामुळे ”आले गामाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना !” अशा अधिकारवाणीनं ते गाडीचा रथ हाकतात. भागात दौऱ्याला गेले कि , जिल्हाध्यक्ष, आजी-माजी आमदार-खासदार , स्थानिक नेते यांची साहेबांसोबत गाडीत बसण्याची इच्छा असते. अशावेळी साहेब गामाशेजारी पुढच्या सीटवर बसतात. बाकिचे मधल्या सीटवर बसण्यासाठी धडपड करतात. पण गामाला तीन पेक्षा एकजरी जास्त झाला कि, गामा चालती गाडी थांबवून चौथ्याला उतरायला सांगतात. काल-परवा जून्नर दौऱ्यावेळी दिलीप वळसे पाटील गाडीत बसताना गामाला म्हणाले-” गामा , तुझी परवानगी असेल तर बसू का रे गाडीत ! मी चौथा आहे म्हणून म्हटलं !” गामा गालात हसला . वळसे पाटील साहेब एकेकाळी साहेबांकडे पी.ए. होते त्यामुळे गामाचा स्वभाव त्यांना अंतर्बाह्य माहित आहे. गामाशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे . गामाला ते लाडानं मिस्टर गोम्स म्हणतात आणि जुन्या सहकाऱ्याची अधून-मधून चेष्टा-मस्करी करतात. जुन्या काळातलं दो या तीन बस्स असं कुटूंब नियोजनाचं सुत्र गाडीतील प्रवाशांच्या बाबतीत त्यांनं अंगिकारलं आहे.

कमालीचा खट्याळ गामा स्टेअरींगवर एकदम कुल असतो. त्याची दोन कारणे आहेत . एकतर बाजूलाच साहेब बसलेले असतात, गामाचं स्पिड वाढलं किंवा कुणी वाटेमध्ये आडवं आलं कि साहेब गामाला हातानं इशारा करून गाडी शिस्तीत चालवण्याचा इशारा करतात. अर्थात ‘गाडी मी शिस्तीतच चालवतो’ असा गामाचा दावा असतो. बरं गाडी चालवताना रागावून काय उपयोग ? त्यापेक्षा तो गिळलेला बरा. डोक्यातला राग पोटात गिळायचं भारी तंत्र अवगत झालंय गामाला. गाडी थांबल्यावर , साहेब आत गेल्यावर तो बाहेर पडतो. घरगडयांवर. गामाची गाडी थांबली कि, पोरं गाडीतलं साहित्य उतरावयाला तयार पाहिजेत अन्यथा घरगड्याचं काय खरं नाय. आगपाखड करण्याचं कारण असतं पोटातली आग . दिवसभर ड्रायव्हींग करायचं असेल तर गामा दूपारी जेवण करत नाही त्यामुळे पोटातल्या आगीचं डोक्यातल्या रागात रुपांतर होतं. शेवटच्या थांब्याच्या ठिकाणी पोहोचलं कि, चहा आणि बिस्किटांवर ताव मारून उदराग्नी शांत झाला कि गामा पण शांत होतो.

गामा एक नंबरचा खवय्या आहे. स्टेअरिंग वर नियंत्रण आहे पण स्टेअरिंगवरून बाजूला झालं कि, जीभेवर नियंत्रण नाही. गामाच्या पोटात काही गेलं कि गडप होतं. पोटाच्या आतल्या गडद अंधारातून ओकारी वाटे कधी काही बाहेर पडलं नाही. फळांच्या फोडी, तळलेले ओले बोंबील, मटणाचा रस्सा, बटाटे-वडे , इडल्या ,समोसे , भेळ-चिवडा, थम्सअप, पेप्सी, आईस्क्रीम, मिठाई सगळं गडप होतं. तृप्तीचा ढेकर दिला कि समजायचं पुरे झालं यांचं. चमचमीत, तिखट, तेलकट-तूपट, आंबट-गोड सगळं काही आलबेल सामावलं जातं त्याच्या उदरात. पिठलं भाकर , मिरचीचा खर्डा हे गामांच्या आवडीचे पदार्थ. ते घरगड्यांना कधी-कधी पिठलाची आवर्जून फर्माइश करतात. गामानं कधी काटे-चमच्यांनी खाल्लेलं मला आठवत नाही. एकदा कालवणात बोटं बुडवून ताव मारत असलेल्या गामाला हटकलं तेव्हा गामा म्हणाला ”बोटं भरल्या बिगार पोटं भरत नाय ! ”

गामाच्या पोटातलं ओठावर कधी येत नाही. मुखावाटे गेलेलं तृप्तीच्या ढेकरानं तरी कळतं पण कानावाटे उदराच्या आड गेलेलं काळाच्या पडद्याआड कायमचं जातं. हार्टडिस्क (हार्डडिस्क नव्हे ) कायमची फॉर्मेट होते. मी तर विनोदानं म्हणतो लता मंगेशकरांचा कंठ आणि गामाचं पोट ह्या गोष्टी संशोधनासाठी कायम जतन करून ठेवायला हव्यात.
साखरेचं खाणार त्याला देव नेणार . असं म्हणावं इतकी मधूमेहाची दहशत सगळीकडे झाली आहे. उतारवयानं गामाला देखील साखर दिली.सकाळी कुणी जिलब्या आणल्या, दुपारी कुणी आईस्क्रीम आणली तर त्यावर यथेच्छ ताव मारणे , आंब्याचा सिझन असला तर काय म्हणावं . गामा किचनमध्ये जाऊन , एखादा रसरशीत आंबा घेऊन गुपचूप एखाद्या झाडामागं जाऊन आंबा खाताना हमखास दिसायचा. मांजर डोळे मिटून दूध पितं तसा हा प्रकार. डायबेटीसवर लेक्चर द्यायला गेलं कि ‘काय व्हत नाय, टेन्शन घ्यायचं नाय !’
”अहो ! पण अधून-मधून साखर तपासत जा.”
” हॅ !आजाबात तपासायची नाय….साखर तपासली कि वाढती. ”

मागच्या दिवाळी पाडव्याला गोविंदबागेतले लाडू जरा जास्त झाले आणि गामाचं साखर खाणं कमी झालं. पण ते काही दिवसांपुरतं. डॉ. समदानींकडे इलाज केला आणि गोळ्यांच्या इंधनावर गामाची गाडी पुन्हा जोमात सुरू झाली. पण खाण्यासाठी गामाच्या खिशातून पैसे बाहेर सहजा-सहजी निघत नाही. गामा कधी-मधी वडापाव तर उन्हाळ्यात दूपारची आईस्क्रिम मागवतो. पण ती फक्त १० रू. वाली बर्फाची कांडी, मलईची कुल्फी कधी मिळायची नाही.काल परवा वहिनींनी गोड खाऊ नये म्हणून गामाला खबरदार केलंय. गामानं पण मनावर घेतलंय असं वाटतंय. जेथे पोहोचेल तेथे शुगर फ्रि गोळ्या तयार ठेवण्याचं फर्मान सोडलंय गामानं. पाहू या घोडामैदान जवळ आहेच. कालच रत्नागिरीच्या शेखर निकमांनी आंबरसाचे सात-आठ कॅन आणलेत. घर पे जाके कुछ तो खायेगा गामा !

गामाची चासी एकदम पक्की आहे. गामाने गेली ४७ वर्षे सातत्याने लाखो मैल गाडी दौडली असेल , प्रवासाचं अंतर मोजलं असतं तर गिनिज बुक रेकॉर्ड झालं असतं. कित्येक गाड्या बदलल्या त्यांची मोजदाद नाही. पण गामा बदलला नाही. त्याची चासी मजबूत आहे. जुनं इंजीन आहे , एकदाम जोरदार ..गामाला विचारलं तर म्हणतो ” जूनं खाणं आहे, तुमच्यासारखं हायब्रीड नाही.” पण काळाबरोबर गामा पण बदलत गेला , गाडीनं त्याला सतत पुढे जायला शिकवलं, त्यामुळे तो मागे राहिला नाही. गाड्या अम्बेसडर, पजेरो , प्रॅडो ,ऑडी झास्या , लॅंन्ड क्रूझर आली , गिअरच्या गेल्या , ऑटोमॅटीक आल्या पण गामानं त्या वश केल्या. एका मंत्र्याच्या पी.एस.नं विचारलं गामाला ह्या नव्या गाड्यांचं समजतं का, ह्या वयात चालवता येती का गाडी ? मी ही बात गामाला नंतर गंमत म्हणून ऐकवली , गामा असा काही भडकला कि सांगायची सोय नाही. गामाच्या कार्यकुशलतेवर, गाडी चालवण्याच्या ज्ञानावर शिक्षणामुळे आणि वाढत्या वयामुळे कुणी शंका घ्यायचा नाद करायचा नाही. कुणी तसं केलं कि तो गेलाच समजा. गेला म्हणजे गामाच्या ब्लॅकलिस्ट मध्ये गेला.

गामानं परदेशी बनावटीच्या गाड्या लिलया चालवल्या. परदेशी म्हणजे इंग्रजी भाषा बोलण्याचाही अयशस्वी प्रयोग तो अधून-मधून करीत असतो. गामाच्या इंग्रजीच्या ज्ञानाचा उगम शाळाबाह्य ज्ञानातून आहे. हे लोकशिक्षण आमच्या हातातले दौऱ्याचे कार्यक्रम वाचून, आजूबाजूच्या लोकांचे इंग्रजीतले संवाद ऐकून त्यांना प्राप्त झाले आहे. गामा मिश्किल मूडमध्ये असला कि, लॅंडलाईन वरून कुणाला जवळच्या माणसाला फोन करतो. फोन पलिकडून उचलला कि, गामा स्पिकींग …, आय डोन्ट… असे काहीतरी सुरू करतो, हसतो आणि मराठीवर येतो. गामाला इंग्रजी येत नाही, पण बोललेलं वरवरचं का होईना …समजतं. नेमकं कशाविषयी चाललंय… कुणाबाबतीत चाललंय….चांगलं बोलतात… कि कुणावर टिका टिप्पणी चालली आहे. हे बरोबर ओळखतो. पोटापुरतं वाचता येतं. वाचता येतं पण उच्चार नाही करता येत. कधी उच्चार केलाच तर इंग्रजीचा मर्डर होतो. लिहिता बिल्कूल येत नाही. मोबाईल फोन मध्ये सगळ्यांची नावं इंग्रजीत आहे, पण सगळ्यांच्या स्पेलींगची वाट लावलेली असते. प्रत्येक शब्दाचं गामाने स्वत: स्पेलींग्ज तयार केलेले आहेत. कुणाचा समज असेल कि गामासमोर इंग्रजीत बोलल्यावर गामाला डोंबल्याचं कळत नाही तर तो गैर आहे. तुमचं इंग्रजीतलं बोलणं त्याच्या मेंदूचं सॉफ्टवेअर लगेच मराठीत भाषांतरीत करतं आणि मेमरीमध्ये कायमचं स्टोअर होतं. गामासमोर कोड भाषेतही बोलू नये. मिनीटात त्याचं मेंदूचं मशीन डिकोडींग करतं. आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा हा अनोखा नमूना आहे. गाडी चालवताना गामाची नजर समोर असली तरी कान झुपकेदार केसांच्या अँटेनासह टवकारलेले असतात. कानावरील केस गामा कधीही कापत नाही. ते कापल्याने बरकत जाते. पाकिट रिकामं होतं अशी गामाची अंधश्रद्धा आहे. कानातून बाहेर येणारे केस रिसिव्हरची भुमिका वठवतात तेव्हा गामासोबत असताना , विशेषत: प्रवास करताना सावधान !

गाडीतल्या गुपचूप गामाच्या आवाजाचं गाडीबाहेर आल्यावर काय सांगावं. सायलेंसर पुर्ण फाटलेला. गामा एवढा मोठयाने बोलतो कि, लंकेचा कुंभकर्ण खडबडून जागा व्हावा. फोनवर बोलतानाही तेवढाच मोठा आवाज. मी तर म्हणतो , गामा पलिकडच्या माणसाला ऐकू जायला फोनची आणि फोनच्या वायरीची गरजच नाय. नुसतं इकडून बोललं कि , तिकडं आवाज गेलाच समजा. कधीकधी वहिनींचा निरोप येतो कि गामाला जरा आवाज कमी करायला सांगा. तर कधी आम्हीच सांगतो गामा साहेबांचा आतून इंटरकॉमवरून विचारताहेत कि एवढं मोठ्यानं कोण बोलतंय. मग गामाचा आवाज खाली येतो.गामाच्या चढ्या आवाजामुळं तिऱ्हाईत माणसाला वाटतं कि गामा कुणाशीतरी वाद घालतोय. क्वचित प्रसंगी गामाने आवाज कमी करावा म्हणून तक्रार येते पण गामाला समजावून काही उपयोग नसतो. त्याचं स्वच्छ मत आहे कि, शांतताप्रिय माणसानं शहरापासून लांब फार्म हाऊस करून राहावं. ‘निसर्गाकडे चला’ हि त्याची हाक सगळ्यांनी ऐकली तर शहरं रिकामी होतील. गामाचा आवाज एकदाच बसला. १९७१ साली साहेबांकडे आल्यावर काही महिन्यातच आंबोली घाटामार्गे कोल्हापूरहून कोकणात जायचे होते. गामाचा असा काही आवाज बसला कि कंठातून काही निघेना आणि तोंडावाटे बाहेर पडेना. गामाला तेव्हा दौरा अर्धवट सोडावा लागला होता. त्यानंतर मात्र गामाचा कंठकार्यात खंड कधी पडला नाही.

साहेबांच्या सावलीत वाढल्याने देवादिकांच्या बाबतीत गामावर साहेबांचेच संस्कार आहेत. गामा कोल्हापूरच्या जोतिबाला मानतो. जोतिबाच्या नावानं रविवारी मांसाहार खात नाही. नेमकं त्याच दिवशी साहेबांच्या घरी आणि दौऱ्यात देखील मटण मासेच असतात. गामाची मजा बघत आम्ही मात्र मुद्दाम फुरक्या काढत मटणावर ताव मारतो. सासवडलाच घर असल्यानं जेजूरीच्या खंडोबावर सुद्धा त्याची श्रध्दा असावी हे जय-मल्हार ही मालिका कान टवकारून आणि डोळे वटारून पाहताना जाणवलं. पण खरं काय ते गामा आणि देवंच जाणे. गामाची खरी दैवतं दोनच एक साहेब आणि दूसऱ्या वहिनी. आणि ती श्रध्दा पदोपदी जाणवते. बजरंगाला श्रीराम-सीतामाई निष्ठा छाती फाडून दाखवावी लागली. गामाला ती आवश्यकता नाही. गामा भेटीसाठी आलेल्या ओळखीच्या लोकांना स्वत हून म्हणतो ”आत बसल्यात ते महादेव हायेत आण मी नंदी . मला भेटल्याबिगर तुमचं दर्शन कसं व्हणार ! ” त्यामुळे ह्या नंदीशी सुंदोपसुंदी कुणी घेत नाही.

गामा अव्याहतपणे साहेबांची गाडी हाकत आला आहे. सीमेवरल्या जवानांवर तरी सरकार मेहरबान होतं. एखादी दिवाळीची सुट्टी देतं. पण गामानं सुट्टी क्वचितच घेतली असेल. लग्न झालं, मुलं झाली. पण ती वाढली कशी , शिकली किती. गामानं कधी फिकिर केली नाही. गामाच्या सौ.ना त्याबाबतीत धन्यवाद द्यायला हवेत. त्यांनी कधी आडकाठी घातली नाही म्हणून गामाच्या प्रवासात गतीरोधक आले नाहीत. १९७६ साली पहिल्या मुलाच्या बाळंतपणा अगोदर सौ. मुंबईच्या केम्प्स कॉर्नरजवळ रस्त्याच्या कडेला दवाखान्याकडे जाण्यासाठी तिष्ठत उभी असताना गामाने दोन मिनिटासाठी सुध्दा गाडीला ब्रेक लावला नाही. कमिटमेंट याला म्हणतात. ज्योतिबाच्या कृपेने मुलं शहाणी-सुरती निघाली. संसार थाटले. नातवंडं झाली.

गामाला तीन नातू आहेत. नात नाही. पण गामाचा सगळ्यात लाडका नातू आहे शुभम. जे काही येईल ते सगळं शुभमला. शुभम करोती कल्याणम. हल्ली दौऱ्यांचं प्रमाण वाढलंय, गामा सतत स्टेअरिंगवर असल्यामुळे शुभमशी बोलणेच होईनासे झाले. मग गामाने शुभमला फोन केला.” शुभम , म्या आजकाल सारखी गाडी चालवतोय हां बाळा, फोन नाय उचलता येत मला. आसं करतो ,मी सकाळी साडेआठला आणि राच्च्याला साडेआठला न चुकता फोन करतो बरं का बाळ!” नशीब आहे नातवाच! बायकोला पण इतक्या वेळा कधी फोन नसेल केला गामानं. नातवांवरून विषय निघाला कि मी गामाची खेचतो –” गामा बघा तीघेही नातू , गोळाच करायचंय , ओन्ली इनकंमींग …नो आऊटगोईंग , मज्जा आहे तुमची !” गामा हसतो. गामाला नो आऊटगोंईंग चा अर्थ समजतो.

साहेबांकडे ४७ वर्षे झाल्याने आमच्यात सगळ्यात शिनियर आहे. आजी-माजी मंत्री देखील ‘काय गामा ..काय चाललंय?’ अशी विचारपूस केल्याशिवाय साहेबांना भेटायला आत जात नाहीत. साहेबांजवळ कुणाचं किती वजन आहे हे गामाला नेमकं ठाऊक आहे. पक्षातले आणि बाहेरचे कितीतरी ज्येष्ठ मंडळी राजकारणात नवखी असताना गामानं पाहिलंय. गामाच्या भाषेत कुणाला हाफचड्डीत बघीतलंय , तर कुणाला सरपंच – तालुका अध्यक्ष असताना सायबाकडं चकरा मारताना बघीतलंय. असे असतानाही गामा त्यांचा आज आदर करतो. पण ज्येष्ठ मंडळी जुनी सलगी विसरत नाहीत. चंद्रशेखरजी भारताचे पंतप्रधान असताना मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी गामाशी हस्तांदोलन करण्यासाठी त्यांनी हात पुढे केला. गामा लाजला. पण पंतप्रधानांनी गामाला हाताला धरून सोफ्यावर शेजारी बसवलं. असा वट आहे गामाचा !

थकनें का नाम नही, मायूसी का नामोनिशान नही |
ना बिमारी ने छुआ कभी, साहब जहॉं गामा कि जान वही l

ना कोई ख्वाईश रखी, ना कभी कुछ फरमाईश की l
बरसोंसे हैं साथ फिर भी, ना नजदिकीयों की नुमाईश की l

साहब जहॉ निकल पडे, बस्स वही उसकी राह थी l
ना घरवालोंको वक्त दिया , ना रिश्तों की परवाह की l

हमारा ध्यान कामपर होते हूए भी बटा रहता है l
अंधेरे में साया भी साथ छोडे, पर गामा डटा रहता है l

गामा आम्हा सगळ्यांचा मामा एकोणसत्तरीत तरो-ताजा जवानदिल आहे. कारण तो काळाबरोबर स्वत:मध्ये बदल घडवतोय. स्मार्टफोनचं नवतंत्र पण शिकलाय. वॉट्स अप वर चॅटींग, फेसबुकवर पोस्टींग आणि युट्यूबचं शेअरींग छान जमतं गामाला. गामावर साहेबांनी दीड पान लिहिलं , मी आता…. एवढी पानं लिहिली , कविता पण केली …….बघू या किती रॉयल्टी देतोय गामा! काही का असेना पण गामाची चासी कायम भक्कम राहावी आणि गाडी सतत चालत राहावी. हिच सदिच्छा !

लेखक- सतीश ज्ञानदेव राऊत ( शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक )