एकेकाळी बूट घ्यायला पैसे नव्हते; आज शेतकऱ्याच्या याच पोरीनं भारताची मान अभिमानानं उंचावली!

‘मूर्ती लहान पण किर्ती महान’, या म्हणीला साजेशी कामगिरी करणारी हिमा दास…. वयाच्या 18 व्या वर्षी तीनं हिमालयाएवढा पराक्रम केला आहे. 18 वर्षाखालील जागतिक अॅथलिटीक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. अॅथेलेटिक्स जगतातलं हे पदक म्हणजे धावपटूसाठी वर्ल्डकप जिंकल्यासारखं आहे. सुवर्णकन्या पी. टी. उषा आणि फ्लाईंग जट मिल्खा सिंग यांनाही ही कामगिरी करता आली नाही.

आसामच्या एका लहानशा गावातील शेतकरी कुटुंबात हिमा दासचा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाकीची… घरी फक्त 2 एकर जमीन…. याच शेतीवर तिच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरात सर्वात लहान मुलगी… शाळेत फुटबॉल खेळायची. फुटबॉलमध्ये करिअर करून भारताच्या संघात खेळण्याचं स्वप्न ती पाहत होती….

शेतात वडिलांसोबत फुटबॉल खेळताना गावातील प्रशिक्षक निपून दास यांनी तिला पाहिलं. तिच्यातील धावपटूच्या गुणांना हेरलं. तिला अॅथलेटिक्समध्ये जाण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर तिने तशी तयारीही केली. मात्र, शर्यतीत भाग घेण्यासाठी तिच्याकडे बुट घेण्यासाठीही पैसे नव्हते. तेव्हा साधे स्वस्तातले बुट घालून तिने आंतरजिल्हा स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. एवढंच नाही तर तिथं 100 आणि 200 मिटरच्या स्पर्धेत तिने चक्क सुवर्णपदकही मिळवले. तिचं हे यश पाहून निपून दास देखील आश्चर्यचकित झाले होते.

पुढच्या तयारीसाठी तिला जेव्हा गुवाहाटीला जाण्याबद्दल प्रशिक्षकांनी सांगितलं, तेव्हा आर्थिक परिस्थितीमुळं वडिलांनी नकार दिला. ती या क्षेत्रात आली तर काय काय करू शकते हे निपुण दास यांनी हिमाच्या वडिलांना समजावलं. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला गुवाहाटीला जाण्यास परवानगी दिली. तिथे गेल्यावर तिला चांगले बुट पहिल्यांदा पाहायला मिळाले. त्यानंतर हिमाने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही.

खरं तर हिमाने धावण्याच्या शर्यतीत फार उशिरा पाऊल टाकले. फक्त 2 वर्षापूर्वीच तिनं हा निर्णय घेतला. फक्त 2 वर्षात सर्वांना तोंडात बोट घालायला लावणारी कामगिरी तिनं करून दाखवली. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला तिनं पदक मिळवून दिलं आहे. सीमा पुनिया, नवजीत कौर धिल्लन यांनी थाळीफेकमध्ये कांस्यपदक मिळवले. भालाफेकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवले आहे पण धावपटू म्हणून आजवर कोणालाही ही कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पुरुष आणि महिला दोन्हीमध्ये ती एकमेव आहे.

तिनं राष्ट्रकुल स्पर्धेत सहावे स्थान मिळवले होते, मात्र तेव्हा तिने 20 वर्षांखालील गटाचा 51.13 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडला. नुकत्याच झालेल्या आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेची पात्रताही पूर्ण केली आहे.

स्पर्धा सुरु झाल्यावर पहिल्या तीनमध्येही ती नव्हती. मात्र पुढं जाऊन शेवटच्या टप्प्यात तिनं वेग वाढवत सर्वांना मागे टाकत सुवर्णवर स्वत:चं आणि भारताचं नाव कोरलं.

सुवर्ण कामगिरी केल्यानंतर पदक घातल्यानंतर जेव्हा मैदानावर भारताचं राष्ट्रगीत सुरू झालं. तेव्हा मात्र हिमाला आपले अश्रू अनावर झाले. मला कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव आहे. कशा पद्धतीने संघर्ष करावा लागला हे माहिती आहे. मला माझ्या आई-वडिलांसाठी आणि देशासाठी करायचे आहे. आतापर्यंतचा प्रवास हा एखाद्या स्वप्नासारखाच झाला असून मी आता वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियन आहे, अशी प्रतिक्रिया तिनं दिली. भारतासाठी अशीच कामगिरी करण्याची इच्छाही तिनं व्यक्त केली.

पहा हाच तो ऐतिहासिक क्षण-

हिमा दासची प्रतिक्रिया-

आणखी काही वाचावं असं-

-साहेबांचा गामा : अविरत – अविश्रांत (Gama Since 1971)

-तो म्हणतो, “साहेबांना निवडून नाही द्यायचं मग कुणाला?”

-ड्रायव्हर नवरा नको गं बाई!!! भाग – 1

ड्रायव्हर नवरा नको गं बाई – भाग 2

-ड्रायव्हर नवरा नको गं बाई!!! भाग – 3

-गोष्ट दुर्देवी, शिक्षणव्यवस्थेनं नाडलेल्या आदित्यची….

-सेल्फी हवी??? मग 20 पुशअप्स मारा… मिलिंद सोमणचा अजब नियम…