मुंबईकरा, आता तरी जागा हो रे… पत्रकार वैभव परब यांचा विचार करायला लावणारा ब्लॉग

अरे मुंबईकरा, किती दिवस मरत मरत आयुष्य जगणार आहेस? कधी तू ट्रेनखाली चिरडून मरतोस तर, कधी मुंबईतल्या गर्दीत चेंगरून… आता तर नवीन मरण आलंय, माहित आहे ना? अरे, आता खड्ड्यात पडून मरायची नवी आॅफर आलीय. माॅलमध्ये एखाद्या आॅफरप्रमाणे तुझं मरणही आॅफरसारखं झालंय. फक्त तू बोलायचं आज मला खड्डयात, ट्रेनमधून पडून किंवा गर्दीत यापैकी कुठल्या एका आॅफरमध्ये मरायचं आहे. बघ, मरण आॅफरसारखं तुझ्या दारात येईल…

खुप स्वस्त झालंय रे, तुझं मरण!! पण कोण विचारतंय तुला? तू आपला जगतोस मुंबईकर असल्याचा टेंभा मिरवत… माझा जन्म मुंबईत झालाय, मी मुंबईकर आहे, मी मराठी माणूस आहे… तुझ्यासाठी फक्त ही वाक्य बोलण्यापुरती उरली आहेत. सत्य परिस्थितीत मुंबईतलं तुझं स्थान काय आहे रे? तुझं मुंबईतलं स्थान फक्त मतदानापुरतं आहे, हे डोक्यात जातंय का?, बाकी तुला विचारतंय कोण? पदवीधरची निवडणूक आली, की लागली रांग तुझ्या दारात, विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक आली का लागली रांग दारात, एवढीच तू स्वत:ची किंमत करून ठेवली आहेस रे मुंबईकरा!!…

किड्या-मुंगीसारखं जगणं झालंय रे तुझं!!!

पावसातल्या गुडघाभर पाण्यात तू कधी वाट काढतोस तर कधी खड्ड्यातली शर्यत पार करत तू कसाबसा घरी पोहोचतोस. असं जगताना पाहुन खुप वाईट वाटतं रे!!… पण काय करणार, मुंबईकरांसाठी “स्पिरिट” नावाच्या अफूच्या गो़ळीचं वाटप सातत्यानं होतं. स्पिरिट नावाची तुझी नशा उतरतच नाही. मुंबईचं स्पिरिट बघा!! मुंबईकरांनी दिला मदतीचा हात!! मुंबई पुन्हा धावली!!… हे ऐकणं बस्स करा आता…. ये बाबा स्पिरिटच्या नावावर जगणं सोडून दे, स्पिरिटची गोळी दिली की नशा काय पुढची घटना होईपर्यंत उतरत नाही. मुंबईकराचं स्पिरिट आणि स्पिरिटच जर बघायचं असेल मुंबईतल्या निवडणुका पावसाळ्यात ठेवा!! डोळ्यात झणझणीत अंजण घालणारं स्पिरिट दिसेल…

पावसाळयात निवडणुका ठेवायची आहे का हिम्मत? कोणी स्विकारेल का हे आव्हान? मुंबईकर गुडघाभर पाण्यात काय? छातीभर पाण्यात-खड्डयाच्या साम्राजातून वाट काढत मतदान करायला तयार आहेत. मुंबईकर गप्प बसतो म्हणजे तो काहीही करु शकत नाही असं नाही. त्याच्याकडे वेळ नाहीय म्हणून तो गप्प आहे. घड्याळाच्या काट्यावर तो धावत असतो त्याला व्यक्त व्हायला वेळ नाही, पण असंही समजू नये कोणी की तो काहीही करू शकत नाही. त्याचा अंत बघू नका… 

मुंबईकर आता वैतागला आहे राजकारणाला… सरकारी यंत्रणांचा त्याला अशरक्ष: कंटाळा आलाय…

मुंबईकर सरकारी यंत्रणा आणि राजकारणात भरडला जातोय एकदाचं खड्ड्यात घाला मुंबईला!! एवढंच उरलंय!!! नाहीतरी अर्धी मुंबई खड्ड्यात गेलीच आहे उरलीसुरलेली पण मुंबई खड्ड्यात घाला म्हणजे एकदाचं समाधान होईल. विकासाच्या नावाखाली मुंबईच्या भूगर्भात खड्डा खणलाच आहे तर आणि मोठे खड्डे हवेत कशाला?

मोठ्या टाॅवरसाठी खड्डा, मेट्रोसाठी खड्डा, रस्त्यावर खड्डा, मोठमोठ्या केबलचं काम करायला खड्डा!!

“खणा, किती खड्डे खणायचेयत तेवढे, खड्डे खणा!!

स्पिरिटच्या नावाखाली जाणारा मुंबईकर ढिम्मपणे हे सगळं सहन करतोय… सकाळी कामावर जायचं बस, ट्रेन, टॅक्सीत किंवा रिक्षात बसून फक्त मोठमोठ्या बाता मारायच्या. मोबाईलचं नेटवर्क मिळालं तर सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं… बस्स झालं काम आमचं….

पण असं करून चालणार नाही आता, प्रत्येक मुंबईकराला आता पेटून उठावं लागले, सर्वांना एकत्र येऊन याचा शेवट करावा लागेल नाहीतर उरलीसुरलेल्या मंड़ळींना वसई-विरार, बदलापूर, डोंबिवली, अंबरनाथ, कर्जतसारख्या ठिकाणी जावं लागेल… वस्त्या कशा वाढतायत यावर लक्ष द्यावं लागेल. मोठमोठे टाॅवर उभे राहत आहेत, तुमची आमची टाॅवरमध्ये राहण्याची ऐपत नाही. कुलाबा, मलबार हिल, वाळकेश्वरप्रमाणे आता लालबाग, परळ, वरळी, दादर प्रभादेवी डेव्हलप होत आहे. तिकडे मुलुंड, घाटकोपर, विद्याविहार, सायन, माटुंगा तर पश्चिमेला दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाडमधून मराठी माणूस हद्दपार झालाय. ही मुंबई कोणाच्यातरी हातात जातेय की काय? अशी भीती वाटतेय. परप्रांतियांचे लोंढे वाढत चाललेत. वस्त्या, झोपडपट्ट्या, अनधिकृत बांधकामं दिवसेंदिवस वाढत जातायत. एक दिवस असा येईल की मूळ मुंबईकर हद्दपार होईल आणि भलतीच लोकं मुंबईवर राज्य करतील, तशी परिस्थिती निर्माण झालीय.

अनेक लोक आज स्वतःला मुंबईचे पहारेकरी समजतात, दुसरीकडे काही सत्तधारी समजतात. विरोधी पक्ष आंदोलनात व्यस्त आहे. तुमची चिंता कोणाला आहे? मुंबईकरा अरे तूच या मुंबईचा खरा पहारेकरी आहेस आणि सत्ताधारीसुद्धा…

उठ !! तूलाच आता तुझं पुढचं भविष्य ठरवायचं आहे.

थोड़ा कामातून वेळ काढ… तुझ्या माझ्या लाडक्या ‘मुंबई’साठी. जिकडे अन्याय दिसेल तिकडे कायदेशीररित्या लाथ मार आणि दाखवून दे तुझी ताकद!! नाहीतर सोन्याचं अंड देणाऱ्या या मुंबईला गिळायला अनेकजण टपले आहे…

जागा हो रे… जागा हो… मुंबईकरा!!!

लेखक- वैभव परब ( लेखक पत्रकार आहेत. )

 

आणखी काही वाचावं असं-

-एकेकाळी बूट घ्यायला पैसे नव्हते; आज शेतकऱ्याच्या याच पोरीनं भारताची मान अभिमानानं उंचावली!

-साहेबांचा गामा : अविरत – अविश्रांत (Gama Since 1971)

-तो म्हणतो, “साहेबांना निवडून नाही द्यायचं मग कुणाला?”

-ड्रायव्हर नवरा नको गं बाई!!!

-गोष्ट दुर्देवी, शिक्षणव्यवस्थेनं नाडलेल्या आदित्यची….

-सेल्फी हवी??? मग 20 पुशअप्स मारा… मिलिंद सोमणचा अजब नियम…