दूध आंदोलक शेतकऱ्यांना फुकटचे सल्ले देणाऱ्यांना शालजोडीतून…

रात्री दूध रस्त्यावर न ओतता गरिबांना फुकट वाटा, अशी पोस्ट सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड करून चिन्मय आनंदाने झोपी गेला…

सकाळी लवकरच झोपेतून उठून, हातात मोठं पातेले घेऊन रामभाऊच्या गोठ्यावर गेला, पाहतो तर तिथं अगोदरच खाकी पँटीतले ओळखीतलेच चार आजोबा पातेली घेऊन दिनवाने चेहरे करून उभे होते…

रामभाऊ गोठ्यातच खुर्चीवर बसून दात टोकरत बसला होता, त्यानं तिरपा कटाक्ष टाकत मानेनेच विचारले, “काय?”

एक आजोबा धारिष्ट्य करून पुढे झाले अन् म्हणाले, “तुम्ही दूध रस्त्यावर फेकणार आहात असे समजले”

“बरं मग?”

“नाही, आम्ही काय म्हणतो, रस्त्यावर दूध फेकण्यापेक्षा आमच्या सारख्या गरिबाला………”

एव्हढं म्हणायचा अवकाश… रामभाऊने खुर्चीच्या शेजारचा सोटा उचलला, “तुमच्या तर आयला तुमच्या……”

रामभाऊचा हा रौद्र अवतार बघून चिन्मय मागच्या मागे पळाला, दोन आजोबांनी भीतीने पातेली तिथेच टाकत धूम ठोकली, तर बाकी दोघे पायात पाय अडकून पडले, कसं तरी उठून गुढघे चोळत, ‘गावंढळ कुठला” पुटपुटत घरचा रस्ता धरला.

या प्रकाराने चिन्मय जरा भेदरला, थोडा वेळ विचार करून त्याने आपला मोर्चा दत्ता सानप यांच्या गोठ्याकडे वळवला. दत्ता सानप माळकरी माणूस. त्यामुळे अंगावर नक्कीच येणार नाही याची चिन्मयला खात्री होती…

दत्ता सानपांनी चिन्मयला बसायला खुर्ची दिली. त्याला बरं वाटलं. गड्याला हाक मारून दुध आणायला लावले. गड्याने एक एक लिटरचे दोन तांबे चिन्मय पुढे आणून ठेवले.

पातेल्यात ओतणार एव्हढ्यात सानप म्हणाले, “अहो हे इथं प्यायला दिलंय, म्हशीचे आहे एकदम निरस, लावा तोंडाला”

चिन्मयने पण आनंदाने दोन्ही तांबे संपवले, सानपांनी वर अजून पातेले भरून दूध दिले. चिन्मय खुशीत घरी गेला.

संध्याकाळी चला चिन्मय बरोबर थोड्या गप्पा मारू म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो. पाहतो तर चिन्मय उताणा पडलेला….

“आजारी आहेस की काय?”

“हम्मम्म”

“किती चेहरा सुकलाय, कपभर दूध घे पाहू”

आम्ही एव्हढं म्हणायचा अवकाश… तसा तो मोठ्याने ओरडला…

“नाव नका घेऊ दुधाचं. फोक लागलीय हो…. सकाळपासून 15 वेळा जाऊन आलो. नुसतं पाणी पडतंय.”

सर्व प्रकार आमच्या लक्षात आला, आम्ही समजावण्याचा सुरात म्हटलं,

“फुकटचं पचत नसतं चिन्मय, डॉक्टरकडे जा आणि बुच बसवून घे आणि दोन दिवस आराम कर पाहू.”

“हम्मम्म”

“आणि हो व्हॉट्सअॅपचा मेसेज छान होता हं!”, एव्हढं बोलून आम्ही उठलो.

 

लेखक- अमोल शिंदे, amolshinde25@gmail.com

 

आणखी काही वाचावं असं-

-एकेकाळी बूट घ्यायला पैसे नव्हते; आज शेतकऱ्याच्या याच पोरीनं भारताची मान अभिमानानं उंचावली!

-साहेबांचा गामा : अविरत – अविश्रांत (Gama Since 1971)

-तो म्हणतो, “साहेबांना निवडून नाही द्यायचं मग कुणाला?”

-ड्रायव्हर नवरा नको गं बाई!!!

-गोष्ट दुर्देवी, शिक्षणव्यवस्थेनं नाडलेल्या आदित्यची….

-सेल्फी हवी??? मग 20 पुशअप्स मारा… मिलिंद सोमणचा अजब नियम…