मुख्यमंत्री आणि मराठा आमदारांना का वाहिली जातेय श्रद्धांजली???

राज्यभरात सध्या मराठा आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रद्धांजली वाहिली जात असल्याचं चित्र सोशल मीडियावर पहायला मिळतंय. औरंगाबाद, बीडच्या पाटोदा आणि नाशिकमध्ये असे प्रकार घडल्याचं समोर आलंय. हा नेमका प्रकार आहे तरी काय?

 

मराठा आमदारांना का श्रद्धांजली वाहिली जातेय?

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकतंच नागपूरमध्ये पार पडलं. या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, नवी मुंबई जमीन घोटाळा, पावसामुळे विधीमंडळात शिरलेलं पाणी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आणि मुस्लीम आरक्षण असे अनेक मुद्दे गाजले. सभागृहात या मुद्द्यांवर जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. मात्र या अधिवेशात सर्वात जास्त चर्चिल्या गेलेल्या विषयांपैकी एक म्हणजे मराठा आरक्षण… मराठा आरक्षणाचा प्रश्नही विधीमंडळात गाजला, मात्र या प्रश्नासंदर्भात मराठा समाजाने मराठा आमदारांवर एक गंभीर आरोप केला आहे. 

मराठा आंदोलनावर मराठा आमदारांनी आपला आवाज उठवणं अपेक्षित होतं, मात्र एकाही मराठा आमदाराने मराठा आरक्षणाचा मुद्दा सभागृहात लावून धरला नाही, असा मराठा समाजाचा आरोप आहे. मराठा आरक्षणाबाबत कुठलीही ठोस घोषणा सभागृहात झाली नाही त्यामुळे मराठा समाज नाराज आहे. सोशल मीडियावर या साऱ्या प्रकारासाठी मराठा आमदारांना जबाबदार धरलं जात आहे. त्यामुळेच मराठा आमदारांना श्रद्धांजली वाहिली जातेय. 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दहावा का घातला जातोय?

राज्यभरात ठिकठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दहावा घालण्यात आला. काही ठिकाणी तर चक्क मराठा आंदोलकांनी स्वतःचं मुंडन देखील केलं. नागपूरचा पोपट काय म्हणतो, मराठा आरक्षण नाय म्हणतो, अशा प्रकारच्या घोषणा देखील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिल्या गेल्या. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कुठलीही ठोस घोषणा न केल्यामुळे मराठा समाजात मुख्यमंत्र्यांविरोधात रोष निर्माण झाला आहे. नोकरभरतीमध्ये मराठा तरुणांना 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र याआधी मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या घोषणा वाटाण्याच्या अक्षता ठरल्यामुळे मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर विश्वास नसल्याचं चित्र आहे. 

मराठा आरक्षण प्रश्न सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या मुद्द्याचं राजकारण करु नका, असं मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले होते. मराठा समाजाला आरक्षण केव्हा मिळेल हे न सांगितल्यामुळेच मुख्यमंत्र्यांविरोधात असलेला रोष आता बाहेर पडत आहे. आगामी काळात मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या आणखी रोषाचा सामना करावा लागू शकतो. 

 

आज मराठा आंदोलनाचं काय झालं?

पावसाळी अधिवेशन संपताच राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चांना जोरदार सुरुवात झाली आहे. आज या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेले पहायला मिळाले. अनेक ठिकाणी एसटी बसची मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली, काही ठिकाणी बस पेटवून देण्याचे प्रकार देखील घडले आहेत. सोलापूरसह अनेक शहरांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. परळीत सलग चौथ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरु आहे. परळीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुणे, सातारा, सांगली, बीड, नाशिक, वाशिमसह राज्यातील अनेक शहरांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयांमध्ये ठिय्या आंदोलन केलं जातंय. 

मराठा आरक्षणाची सद्यस्थिती काय आहे?

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर मराठा आरक्षण मिळणार की नाही हे ठरणार आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल विरोधात आला तरी राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असेल असं मुख्यमंत्री विधीमंडऴात म्हणाले आहेत. मात्र सध्या तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न अधांतरी असल्याचं चित्र आहे.