मराठा आंदोलन पेटलं… राज्यभरात कुठं-कुठं काय-काय घडलं?

मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

मराठा आरक्षणासाठी आता पुण्यातही लढा सुरु करण्यात आला आहे. परळी येथील मराठा ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. 

कालपासून पुण्यात आंदोलनाला सुरुवात झालीय. आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. 

दरम्यान, पहिल्या दिवशी आंदोलनकर्त्यांची संख्या कमी होती, मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अशा पद्धतीने आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच याठिकाणी मराठा बांधवांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. 

 

परळी मराठा मोर्चाच्या समर्थनासाठी साताऱ्यात ठिय्या आंदोलन

परळी मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा पाठिंबा वाढताना दिसतोय. आता साताऱ्यातही परळीतील मराठा बांधवांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करण्यात येतंय. 

मराठा आरक्षणाच्या नावाखाली सरकारनं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली. मूक मोर्चानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत म्हणून परळीत ठोक मोर्चा काढण्यात आला होता. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. 

दरम्यान, साताऱ्यात मराठा समाज एकवटला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करुन आंदोलनाची मागणी केली जातेय.

 

मराठा आमदार आणि खासदारांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये मराठी समाजातील आमदार-खासदारांबद्दल प्रंचंड संताप आहे. हा संताप आता सोशल मीडियावर उफाळून येताना दिसतोय.

सोशल मीडियावर मराठा तरुण मराठा आमदार आणि खासदारांना श्रद्धांजली वाहात आहेत. ईश्वर यांच्या आत्म्याला शांती देवो…, अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्या जात आहेत.

विधिमंडळात मराठा आरक्षणावर मराठा आमदारांनी आवाज न उठवल्याचा आरोप केला जातोय. न बोलणाऱ्या, हातात बांगड्या भरलेल्या, मराठा समाजाशी गद्दार झालेल्या मराठा आमदार आणि खासदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं या पोस्टवरील पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. 

 

पाटोद्यात मराठा समाज आक्रमक, घातला मुख्यमंत्र्यांचा दहावा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाज आता आणखी आक्रमक झाला आहे. पाटोद्यात तर चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक दहावा घालण्यात आला आहे. 

मुख्यमंत्र्यांचा दहावा घालून मराठा समाजाने सरकारचा निषेध केला. मुख्यमंत्र्यांच्या फोटोला हार घालून मराठा तरुणांनी यावेळी मुंडन देखील केलं. यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. 

दरम्यान, मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अन्यथा गंभीर परिणामांना तयार रहावे, अशा इशारा आता मराठा समाजाकडून सरकारला दिला जातोय. 

 

…तर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये; सोलापुरात मराठे आक्रमक

मराठा समाज आपल्या उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. आज सोलापुरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. वारी सुरळीत व्हावी असं वाटत असेल तर मुख्यमंंत्र्यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये. मराठा समाजाची फसवणूक करून याल तर उद्रेक होईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. 

आंदोलनामुळे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, चक्का जाम आंदोलनातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

57 मोर्चे शांततेत केले आता आमचा अंत पाहू नका; मराठा समाज आक्रमक

57 मोर्चे शांततेत केले आता आमचा अंत पाहू नका; अशा शब्दात आता मराठा समाज आक्रमक होताना पहायला मिळतोय. राज्यभरात एसटी बस पेटवण्याचे प्रकार सुरु आहेत. 

सोलापूर-बार्शी रस्त्यावर एसटी बस पेटवण्यात आली आहे. बसमधील सर्व प्रवाशांना उतरवून ही बस जाळण्यात आल्याची माहिती आहे. 

दरम्यान, परळीत गेल्या चार दिवसांपासून मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन सुरु आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी मराठे आता रस्त्यावर उतरले आहेत. 

 

संतप्त मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर आता मराठा आमदार

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या निशाण्यावर आता मराठा आमदार असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर मराठा आमदारांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर आता त्यांच्या पुतळ्यांचं दहन सुरु आहे. 

नांदेडमध्ये जिल्ह्यातील 6 मराठा आमदारांच्या पुतळ्यांचं दहन करण्यात आलं. नांदेडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र आलेल्या आंदोलकांनी मराठा आमदारांचे पुतळे जाळले. 

मराठा आमदार मराठा आरक्षणासाठी आवाज उठवत नाहीत. ते काहीच कामाचे नाहीत, अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. मराठा आमदारांविरोधात यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. 

 

हिंगोलीत मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण; 3 बसची तोडफोड

मराठा समाजाच्या मुक मोर्च्यानंतर आता मराठा समाज ठोक मोर्चे काढत आक्रमक होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील धरणे आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.

सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरूवात झाली. त्यासोबत जवळा बाजार येथे चक्का जाम आंदोलन सुरू असताना आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यात महामंडळाच्या 3 बसची तोडफोड केली आहे.

दरम्यान, पोलिस बंदोबस्त असतानाही लोक आक्रमक होत आहेत. आक्रमक आंदोलकांमुळे पोलिसांची धांदल उडत आहे.

 

औरंगाबादमध्येही मराठा आंदोलकांनी मराठा आमदारांना वाहिली श्रद्धांजली

मराठा समाज पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. औरंगाबादमधील क्रांती चौकात मराठा समाजातर्फे ठिय्या अांदोलन करण्यात आले. 

नागपूरचा पोपट काय म्हणतोय, मराठा आरक्षण नाय म्हणतोय, जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा यावेळी देण्यात आला. 

मराठा आमदार आणि खासदारांना यावेळी श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. या आंदोलनाच्या निमित्ताने मराठा समाजाचा रोष समोर येताना दिसतोय. 

 

गोदातिरी मराठा आमदारांच्या नावाने दशक्रिया विधी

मराठा आंदोलनाचे पडसाद नाशिकमध्येही पहायला मिळत आहे. गोदातिरी मराठा आंदोलकांनी मराठा आमदारांच्या नावाने दशक्रिया विधी केला. 

विधीमंडळात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आमदारांनी आवाज उठवला नाही, असा मराठा समाजाचा आरोप आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा आमदारांना रोषाचा सामना करावा लागतोय. 

गोदावरीच्या तिरी मराठा आमदारांच्या नावे धार्मिक विधी तसेच मुंडन करण्यात आलं. मराठा आरक्षण न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.