मुख्यमंत्रीसाहेब, मी काकासाहेब बोलतोय…

मुख्यमंत्रीसाहेब आज मी गोदावरीत उडी मारून प्राण त्याग केला. माझं आयुष्य मी संपवलं. पण मला आता तुमची चिंता लागलीय. तुमचं आता कसं होणार ? हा प्रश्न वारंवार सतावतोय, कारण साहेब आज एक काकासाहेब गेलाय, पण तुमच्या अजुन लक्षात येत नाहीय, “असे किती तरी काकासाहेब आपल्या प्राणाची बाजी लावायला तयार आहेत”.

मी तर सुरुवात केलीय, पण शेवट कोण करेल, याची कृपया वाट बघू नका. तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो, जर ही विनंती मान्य नसेल, तर तुम्हाला मग घरची “वाट” पकडावी लागेल, एवढं मात्र लक्षात ठेवा !!

सीमेवरील सैनिक क्षत्रूच्या गोळीनं शहिद होतो, त्याचा संपूर्ण देशाला अभिमान असतो. तो सैनिक कायमचा सर्वांच्या मनात घर करून राहतो. पण मी माझ्या बांधवांसाठी गोदावरीत झेप घेतली आणि माझा मृत्यू झाला. याचा मला एका सैनिकाप्रमाणे अभिमान आहे. खरं तर अनेक बांधव मला ओरडतायत, काकासाहेब हे काय केलं ? अशी आर्त आरोळी देत आहेत. पण खरं सांगू माझ्यासमोर काहीच पर्याय दिसत नव्हता. खरं तर हा गोदावरीत उडी मारून सरकारला इशारा देणं हा काही पर्यायच असू शकत नाही. पण इशारे तरी किती द्यायचे तुम्हाला ? तुम्हीच सांगा ? जगाने दखल घ्यावी असे ऐतिहासिक शांतपणे आम्ही मोर्चे काढले, काय झालं ? काय मिळालं ? याचा विचार तुम्हीपण करायला हवा. तुम्ही केलेल्या घोषणा सत्य परिस्थितीमध्ये किती उतरतायत याची माहिती तुम्ही घ्या ? म्हणजे तुम्हाला कळेल, खदखद काय आहे !

आम्ही साधी माणसं आहोत. प्रत्येकाला स्वप्न बघायचा अधिकार आहे आम्हीही ते बघतो पण आकाशात झेप घेताना पंखात जे बळ लागतं तेच बळच आमच्याकडे नाहीय मग तुम्ही सांगा आम्ही आकाशात झेप घ्यायचं स्वप्न कसं बधायचं ?

आषाढी एकादशीला पंढरपूरात विठूरायाची पूजा करायला तुम्हाला जाता आलं नाही, तुम्ही म्हणता” *दगडफेक करून आरक्षण मिळत असेल तर मी तयार आहे*” साहेब जर एवढंच हिंसक बनायचं असतं, तर आतापर्यंत झालेले ऐतिहासिक मोर्चे हे शांतेतेच्या मार्गानं झाले नसते. लाखोंच्या संख्येने झालेल्या मोर्चानंतर रस्त्यावर साधा एक पाण्याचा ग्लास दिसला नाही तो तुमचं डोकं कशाला फोडेल ?

दुसरं तुम्ही सापांबद्दल बोललात, साहेब हे काही आपल्याला पटलं नाही. पंढरपूरात पुजेला न जाण्याच्या निर्णयानंतर तुमची सोशल मीडिया चांगलीच सज्ज झाली होती. तुमच्या समर्थनासाठी फेक अकांउटवरून अतिरिक्त फौज मागवली होती. माझा प्रश्न एकच आहे पण कशासाठी ? सहानुभूतीसाठी ?

आजच्या आषाढी एकदाशीला जसा माझा वारकरी पाडुरंगाचं दर्शन घेऊन घराकडे जातो मला वाटतंय महाराष्ट्राच्या जनेतेचं दर्शन झालं असेल तर आता तुमचीही घरी जायची वेळ आलीय. सत्तेवर आल्यापासून मोर्चे, दंगली, हत्यांचे प्रमाण काही कमी झालेले नाहीय. मराठा, दलित, धनगर, मुस्लिम, आदिवासी, अशा विविध समाजाच्या लोकांनी तुमच्या कारकिर्दीत ऐतिहासिक मोर्चे काढले. माझा शेतकरी बांधव तुमच्याच कारकीर्दीत संपावर गेला. दुधासाठी सलग चार दिवस आंदोलन झालं. शेकडो किलोमीटरची पायपीट करत नाशिकवरून किसान मोर्चा मुंबईत दाखल झाला, यापेक्षा तुमचं अपयश ते काय?

बस्स करा आता, आता नाही सहन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सत्तेवर आलात, पण महाराजांच्या नावाला साजेसं असं काम तुम्हाला करता आलं नाहीय. तुमचं हे अपयश आहे. आज जे मी केलं आहे त्यामुळे माझा आत्मा शांत असेल पण इतरांचे पेटलेले आत्मे शांत करताना तुमचा दम निघेल.मी फक्त एक ठिणगी पेटवली आहे, वेळीच दखल घेतली नाही तर वणवा पेटून राख व्हावला वेळ लागणार नाही.

-वैभव परब, लेखक पत्रकार आहेत