आजच्या सात सर्वात महत्त्वाच्या बातम्या –

1. मी राजीनामा दिलाच नाही; मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा- स्नेहलता कोल्हे

अहमदनगर | मी राजीनामा दिला नसून माझ्या राजीनाम्याची पोस्ट खोटी आहे, असं भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी म्हटलंय. माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण पाठिंबा आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या कोपरगावच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचं वृत्त होतं, मात्र ते त्यांनी फेटाळून लावलं आहे. 

दरम्यान, सोशल मीडियात स्नेहलता कोल्हे यांच्या स्वाक्षरीसह त्यांचा राजीनामा व्हायरल झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा राजीनामा कोल्हे यांच्या लेटरहेडवर आहे. 

मग हा राजीनामा कुणाचा?

2. जातीच्या आधारावर नव्हे आर्थिक निकषांवर आरक्षण द्या- राज ठाकरे

पुणे | जातीच्या आधारावर नव्हे तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायला हवं, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. ते पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. 

एका जातीला आरक्षण दिली तर दुसरी जात उभी राहील, तिसरी जात उभी राहील. त्यातून एकमेंकांबद्दल द्वेष निर्माण होतो, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, बाबांनो उगा आंदोलना दरम्यान हकनाक बळी पडू नका. हे सरकार फक्त तुमच्या भावनांशी खेळत आहे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

 

3. आंदोलन थांबवा, सरकार ठराविक महिन्यात आरक्षण देईल- नारायण राणे

मुंबई | आंदोलन थांबल्यास ठराविक महिन्यात सरकार आरक्षण द्यायला तयार आहे, असं भाजपचे खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

विविध मराठा समाजाच्या संघटनांनी नारायण राणे यांची भेट घेतली. तसेच राणे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची मागणी केलीय. 

मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हिंसाचार बंद व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. मुख्यमंत्री आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावाच लागेल, असं राणे म्हणाले. 

 

4. साप सोडण्याचं वक्तव्य करणाऱ्यांमध्ये मोठमोठी राजकीय नावं- चंद्रकांत पाटील

साप सोडण्याचं वक्तव्य केलं गेलंय आणि त्यामध्ये मोठमोठी राजकीय नावं गुंतलेली आहेत, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा. ते चुकीची वक्तव्य करणार नाहीत. साप सोडण्याच्या वक्तव्याची रेकॉर्डिंग आहेत आणि मी ती ऐकवायला तयार आहे, असं ते म्हणाले. 

दरम्यान, जास्त उसकवू नका नाहीतर जी मोठमोठी नावं यात गुंतलेली आहेत ती आम्हाला जाहीर करावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चाला चेहरा असावा म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीन नावं सुचवली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे, शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे आणि ते ज्या घरात जन्माला आले त्या घाटगे घराण्याचे वंशज समरदीप घाटगे यांची नावं चंद्रकांत पाटीलांनी सुचवली आहेत. 

 

5. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई | मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. 

मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहे. ही राज्य सरकारने केलेली कारवाई सुडाची आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, आंदोलनाच्या पहिल्या आठ दिवसात निष्क्रिय राहिलेल्या सरकारने, आपले अपयश लपविण्यासाठी कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी केली आहे. 

 

6. मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्त्व आता खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे?

पुणे | मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्त्व खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वीकारावं अशी अनेक मराठा संघटनांची विनंती होती. उदयनराजे यांनी ती विनंती मान्य केल्याची माहिती आहे. 

मराठा समाजाच्या काही संघटनांनी आज पुण्यात उदयनराजे यांची भेट घेतली. त्यावेळी आपण मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्त्व करण्यास तयार असल्याचं उदयनराजेंनी स्पष्ट केल्याचं कळतंय. 

उदयनराजे आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या इतर नेत्यांशी बोलून ते मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं कळतंय. मराठा आरक्षणाबद्दल ठोस भूमिका मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असंही उदयनराजेंनी म्हटलंय. 

 

7. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही!

लातूर | मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेने दिला आहे. लातूरमधील पत्रकार परिषदेत नानासाहेब जावळे यांनी ही घोषणा केली. 

सभागृहात मुद्दा मांडण्याऐवजी मराठा आमदारांनी राजीनाम्याचे स्टंट करु नयेत. एवढीच कळकळ असेल तर मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर उपोषण करावं, असं ते म्हणाले. 

दरम्यान, चर्चा बिर्चा काही नाही आधी आरक्षण द्या आणि नंतर चर्चा करा, असं ते म्हणाले. तसेच शरद पवारांनी ठाम भूमिका घ्यावी, वेळोवेळी भूमिका बदलू नये, असंही ते म्हणाले.