#MaharashtraBandh | ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सकाळपासून कुठं-कुठं काय-काय घडलं?

मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र बंद’ला सुरुवात

मुंबई | मराठा आरक्षणासह मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ठाणे आणि नवी मुंबई वगळून उर्वरित राज्यात महाराष्ट्र बंद राहणार आहे. 

नागरिकाना वारंवार वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगत ठाणे आणि नवी मुंबईच्या मराठा आंदोलकांनी बंद न करण्याचा निर्णय घेतलाय. त्याऐवजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 

दरम्यान, मराठा समाजाला दिलेली आश्वासनं सरकारनं पाळली नाहीत. त्यामुळे मूक मोर्चानंतर मराठा समाजाने ठोक मोर्चे काढले. या दरम्यान अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आज महाराष्ट्र बंदची हाक देत मराठा समाजाने आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. 

 

नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम

उस्मानाबाद | मराठा क्रांती मोर्चानं मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उस्मानाबादमध्ये आगळ्यावेगळ्या आणि अत्यंत स्तुत्य पद्धतीने हा बंद करण्यात येणार आहे. 

उस्मानाबादमधील मराठा समाजाने रक्तदान शिबीराचं आयोजन केलं आहे. नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान, असा निर्धार मराठा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. 

दरम्यान, मराठा बंदमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, हा बंद शांततेत पार पाडावा, असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आलं आहे. 

 

मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम

मुंबई | सकल मराठा समाजाच्यावतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे या बंदच्या पार्श्वभूमिवर खबरदारी घेत अनेक जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंज करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर, औरंगाबाद या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र बंद दरम्यान सोशलमीडियावरून खोट्या अफवा पसरू नयेत आणि हिंसाचार घडू नये म्हणून खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद

पुणे | मराठा आरक्षणासाठी आज राज्यात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बंदरम्यान पुण्यातील पीएमपी बसचे काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. 

बंददरम्यान शहरालगतच्या ग्रामीण भागातील बससेवा बंद कारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास 14 मार्गांवरील बस बंद करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, शहरातील बस सेवा सुरळीत ठेवण्यात येईल. मात्र, त्यावेळी कुठे पीएमपीचे नुकसान झाले तर त्यामार्गावरील बससेवा सुरू ठेवायची की नाही याचा विचार करण्यात येईल असं पीएमपी प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 020-24503206 हा हेल्पलाईन क्रमांक पीएमपीने जारी केला आहे. 

 

शिवरायांची ‘ही’ शिकवण लक्षात ठेवून मराठा मोर्चेकरी आंदोलनात सहभागी!

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा मोर्चेकऱ्याच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात सहभागी होताना मराठा मोर्चेकऱ्यांनी शिवरायांनी दिलेली शिकवण घेऊन आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन सोशलमीडियावरून एका फोटोद्वारे करण्यात आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की, शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही हात लागता कामा नये, ही महाराजांची शिकवण लक्षात ठेवूनच मराठा मोर्चेकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हायचं, असा मजकूर या फोटोमध्ये आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आंदोलनाला सुरवात झाली आहे. ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन होत आहे. 

 

नंदुरबार बंद करण्याचं आव्हान देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून दिलगिरी व्यक्त

नंदुरबार | नंदुरबार बंद करण्याचं आव्हान देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखानं दिलगिरी व्यक्त केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांना यासंदर्भात पत्र देण्यात आलं आहे. 

आज 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चानं बंद पुकारला आहे. याच दिवशी आदिवासी गौरव दिवस असल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी मराठा आंदोलकांवर संतापले होते. 

दरम्यान, मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मराठा बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असं आमश्या पाडवी यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या वक्तव्याचा शिवसेना पक्षाशी संबंध नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. 

38793882 435241783651164 4644642290332073984 n - नंदुरबार बंद करण्याचं आव्हान देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून दिलगिरी व्यक्त

 

नगरमध्ये बैलगाडी रस्त्यावर सोडून आंदोलनाला सुरुवात!

अहमदनगर | नगरमध्ये मराठा आंदोलनाला सुरवात झाली आहे. नगरमधील जामखेडमध्ये मराठा मोर्चेकऱ्यांनी बैलगाड्यांची रॅली काढत आंदोलनाला सुरवात केली. त्यानंतर रस्त्यावरच बैलगाड्या सोडून देण्यात आल्या.

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभर मराठा आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, अहमदनगरमध्ये आंदोलनाला सुरवात झाली आहे. शहरात 9 ते 5 या वेळेत चक्काजाम करण्याचा निर्णय मराठा मोर्चेकऱ्यांनी घेतला आहे.

 

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 7 हजार पोलीसांचा बंदोबस्त!

पुणे | महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात होणाऱ्या आंदोलनातील सुरक्षेसाठी तब्बल सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी शांततेत आंदोलन करावे, असं आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केलं आहे. 

पुणे शहरात जिल्हाधिकारी कार्यालय आमि खडकमाळ येथील तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन होणार आहे. त्यामुळे या जागेंवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकर चौकात आंदोलन होणार असल्याने तेथेही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात 2200 पोलीस, 900 होमगार्ड, 3 राज्य राखीव पोलीस गट, 1 दंगल नियंत्रक पथक, 20 स्ट्रायकिंग कंपनी, असा बंदोबस्त आहे. 

 

टाळ मृदुगांच्या गजरात मराठा मोर्चेकऱ्यांकडून सरकारचा निषेध!

पुणे | टाळ मृदुगांच्या गजरात मराठा मोर्चेकऱ्यांकडून सरकारचा निषेध करण्यात आला. तसंच जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक रोखून धरली. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्रबंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळेपुणे जिल्ह्यातील मावळमधील कान्हे फाटा येथे भजन कीर्तन करत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. 

दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले असून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलने होत आहेत.

 

आंदोलनामुळे राज्यात एसटी सेवा बंद!

पुणे | महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पुण्यासह राज्यातील एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची गैरसोय होणार आहे. 

मागील मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांनी मोठ्याप्रमाणावर एसटीला लक्ष्य केलं होतं. त्यात एसटीचं मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे प्रवाशांना अर्ध्यात सोडून त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, बंददरम्यान प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन, परिस्थिती आणि पोलीस संरक्षण घेऊन बस सोडण्याबाबत आगार स्तरावर निर्णय  घ्यावा, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

 

पोलिसांची ड्रोनद्वारे मराठा मोर्चेकऱ्यांवर करडी नजर

चाकण | ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चाकणमध्ये पोलीस आंदोलन कार्यकर्त्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवत आहेत. 

चाकणमधील मागील मराठा आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे आज पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.  

दरम्यान, चाकणमधील महत्त्वाच्या परिसरात पोलीस ड्रोनद्वारे लक्ष ठेऊन आहेत. तसेच साध्या वेशातही पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

 

औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक; रस्त्यावर टायर पेटवलं!

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. मराठा मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून सरकारचा निषेध केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र बंद असून ठिकठिकाणी मराठा मोर्चेकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, आंदोलन अहिंसक मार्गानं करावं, सरकारी मालमत्तेचं नुकसान करू नये, असं आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलकांना करण्यात आलं आहे.