अटल बिहारी आणि तिच्या नात्याला नाव नव्हतं; ती नेमकी कोण होती???

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आयुष्यभर अविवाहीत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं कारण आजपर्यंत कोणालाच ठाऊक नव्हतं. मात्र त्यांना जवळची मैत्रीण होती. ही मैत्रीण सगळ्यांच्या परिचयाची होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मैत्रिणीचं नाव राजकुमारी कौल असं होतं. राजकुमारी कौल आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नात्याला अनेकांनी वेगळी नावं दिली होती. मात्र अटल बिहारी वाजपेयी याबाबत कधीच काहीही बोलले नाहीत…

महाविद्यालयातील मैत्रीण-

राजकुमारी कौल आणि अटल बिहारी वाजपेयी यांची मैत्री ग्वालियरच्या विक्टोरिया महाविद्यालयात (सध्याचं लक्ष्मीबाई महाविद्यालय) शिकत असताना झाली. काॅलेजच्या दिवसात दोघंही खुपच जवळचे मित्र-मैत्रिण होते. मात्र त्या काळात अशा मैत्रीला समाजाचा नकार होता. त्यामुळे समाजातील काही कारणास्तव त्यांना ही मैत्री विसरावी लागली होती.

अटलजींनी लिहिलेलं प्रेमपत्र

लेखक आणि पत्रकार किंगशुक नाग यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात तरुण वयातील अटलजींनी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी राजकुमारीला एक पत्रंही लिहिलं होतं. असा उल्लेख त्या पुस्तकात आहे परंतु, या पत्राला कधीच उत्तर मिळालं नाही. राजकुमारीलाही अटलजींसोबत आयुष्यभर राहण्याची इच्छा होती परंतु, त्यांच्या कुटुंबाचा याला प्रचंड विरोध होता. अटलजी ब्राह्मण कुटुंबातील होते तर कौल कुटुंब स्वत:ला उच्च कुळातील मानत होते, असा उल्लेखही त्या पुस्तकात आहे.

राजकुमारी कौलचं लग्न-

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अटल बिहारी वाजपेयी आरएसएसचे प्रचारक म्हणून कार्यरत होते. तेव्हा राजकुमारी यांचं जवाहरलाल नेहरु यांचे मेव्हणे ब्रिजनारायण कौल यांच्याशी लग्न झालं. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कायमचे वेगळे झाले होते. 

अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांची पुन्हा भेट-

अनेक वर्षानंतर राजकुमारी आणि वाजपेयींची पुन्हा एकदा एकदा भेट झाली. दिल्लीत राजकुमारी यांना ‘मिसेस कौल’ नावानं ओळखलं जात होतं. ब्रिजनारायण कौल रामजस महाविद्यालयात हेड ऑफ डिपार्टमेंट बनले होते. कौल कुटुंबसुद्धा तिथेच राहत होतं. वाजपेयींनी राजकुमारी आणि त्यांच्या नात्याबाबत कधीच उघड वक्तव्य केलं नाही. मात्र ते कौल यांच्या घरात अनेक वर्ष राहायला होते. ‘मला आणि अटलजींना कधी आपल्या नात्याचं माझ्या पतीसमोर स्पष्टीकरण द्यावं लागलं नाही.आमचं नातं समजून घेण्याच्या स्तरावर खूपच मजबूत आहे’ असं 80 च्या दशकात एका मुलाखतीत आपल्या नात्यावर बोलताना मिसेस कौल यांनी म्हटलं होतं.

राजकुमारी यांच्या दोन्ही मुली वाजपेयींनी दत्तक घेतल्या होत्या-

अटलजींनी जेव्हा ब्रिजनारायण-राजकुमारी यांच्या सोबत राहण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलींना नमिता आणि नम्रता यांना दत्तक घेतलं होतं. अटलजींचे माजी सहाय्यक सुधींद्र कुलकर्णी यांनी एका लेखात राजकुमारी कौल यांचा  उल्लेख ‘वाजपेयींच्या दत्तक मुलींची आई’ असा केला होता. या दरम्यान वाजपेयी यांच्यासोबतच त्यांच्या घराची संपूर्ण जबाबदारी मिसेस कौल यांनीच समर्थपणे पेलली होती.

राजकुमारी कौल मृत्यु-

2 मे 2014 रोजी राजकुमारी कौल यांचा मृत्यु झाला. त्यानंतर दोन्ही मुली नमिता आणि नम्रता यांना राजकुमारी यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला होता. त्या काळात अटल बिहारी वाजपेयी एकाकी पडले होते. मात्र अटल आणि मिसेस कौल यांनी आपल्या नात्याला कोणतंही नाव दिलं नाही आणि दोघांनीही यावर कायम मौन पाळलं.