अटल बिहारी वाजपेयी, भारतीय संघ आणि 2004 चा ऐतिहासिक विजय…

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारत पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. 1998 मध्ये त्यांनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरू केली. त्या पहिल्या बसने ते स्वतः पाकिस्तानला गेले होते. 

टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी एका मुलाखतीत वाजपेयींनी भारतीय क्रिकेट संघाची भेट घेतल्याचं सांगितलं. त्यासोबत तिथं झालेला किस्सा त्यांनी सांगितला.

‘भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, अशी अटल बिहारी वाजपेयींची तीव्र इच्छा होती. त्यासाठी क्रिकेट हा दुवा ठरेल असा त्यांना विश्वास होता. अटलजींमुळेच हा दौरा शक्य झाल्याचं शेट्टी सांगतात. सरकारने मंजुरी दिल्यानं बीसीसीआयनं भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आपला संघ तब्बल 19 वर्षांनी पाकिस्तानात जाणार होता. तेव्हा संघात कर्णधार सौरव गांगुलीसोबत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवाग हे दिग्गज खेळाडू होते.

पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान कार्यालयातून आम्हाला मेसेज आला होता. पंतप्रधानांना आपल्या टीमला भेटायचे होते. आम्ही भेटायला गेलो तेव्हा बागेत नेव्ही पथक देशभक्तिपर गाणी वाजवत होते. तेव्हा अटलजींनी आमच्यासोबत जवळपास तासभर गप्पा मारल्या. विशेष म्हणजे ते प्रत्येकाशी व्यक्तिगपणे बोलले. 

आम्ही आपल्या संघाच्या क्रिकेटपटूंचे ऑटोग्राफ असलेली एक बॅट वाजपेयीजींना भेट म्हणून दिली. त्यांनीही आम्हाला एक बॅट भेट दिली. त्या बॅटवर खेल ही नही, दिल भी जीतिये, शुभेच्छा’, असं लिहिलेलं होतं.

हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण सर्वांनी मनापासून खेळा, असं वाजपेयींनी सांगितलं. आम्ही निघलो तेव्हा वाजपेयींनी आम्हाला आणखी एक गाणं ऐकायला सांगितलं…. ते गाणं होतं- हम होंगे कामयाब…

पाकिस्तानच्या हद्दीत टीम इंडियाने 2004 साली मिळवलेला विजय कोणीही विसरू शकणार नाही. भारताचा तो पाकिस्तान दौरा ऐतिहासिक ठरला. भारत मालिका जिंकल्यानंतर वाजपेयींनी गांगुलीला फोन करुन शुभेच्छा दिल्या होत्या.