…तर मी अभिताभ यांच्याविरोधात रेखाला उभे केले असते- अटल बिहारी वाजपेयी

बोफोर्स प्रकरणी 1987 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आरोप झाले. त्यावेळी त्यांचे खास मित्र असलेल्या खासदार अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप झाले. आरोप होताच त्यांनी राजीनामा दिला. यावर अटलजींना प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला त्यांनी अत्यंत मिश्कील शैलीत उत्तर दिलं होतं.  अमिताभने खासदारकीचा राजीनामा दिला, तो बोफोर्स प्रकरणात खरोखरच आहे, असे तुम्हाला वाटते का?, असा प्रश्न अटलजींना विचारण्यात आला होता.

अमिताभ यांनी पंतप्रधान राजीव गांधींचा बचाव करण्यासाठी राजीनामा दिला असला तरी त्यांनी मुळात राजकारणातच यायला नको होते, असं मत अटल बिहारी वाजपेयी यांनी यावेळी व्यक्त केलं.

अमिताभचे भाऊ अजिताभ आपला व्यवसाय सोडून अचानक स्वित्झर्लंडमध्ये का गेले? त्यांची मुले ज्या महागड्या शाळेत शिकत आहेत, त्या शाळेची फी भरण्यासाठी इतका पैसा कुठून दिला जातोय, असे प्रश्‍नदेखील अटलजी बिहारी वाजपेयी यांनी यावेळी उपस्थित केले होते.

अमिताभ बच्चन तेव्हा लोकसभेत खासदार होते. इंदिराजींच्या निधनानंतर निवडणूक झाली होती. या लोकसभा निवडणुकीत अलाहाबाद मतदार संघातून अमिताभ बच्चन यांनी हेमवंती नंदन बहुगुणा यांचा पराभव केला होता.

हाच धागा पकडत अटलजींना आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता. 

“बच्चन यांना तुमच्याविरोधात उभे केले असते तर”, असा प्रश्‍न अटलजींना विचारला गेला होता.

अटलजी तेव्हा हसले होते. ते आपल्या मिश्कील शैलीत म्हणाले,

“तसे झालं असतं, तर मी निवडणूक लढवलीच नसती. मात्र मी अभिनेत्री रेखा यांना अमिताभ बच्चन यांच्याविरोधात लढावे, यासाठी मनधरणी केली असती.”