…त्या रात्री अटलजींनी शरद पवारांना का फोन केला?, वाचा जबरदस्त किस्सा…

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर अनेक नेते मंडळी त्यांच्या आठवणी सांगत आहेत. राजकारणातील चाणक्य मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्यांसोबतचे काही किस्से सांगितले आहेत. 

वाजपेयींचे सर्व राजकीय पक्षातील नेत्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते नेहमी आपल्या विरोधकांचाही सन्मान करत. तसंच वाजपेयी कधी सूडबुद्धीनेही वागणार नाहीत, याचा विश्वासही विरोधकांना होता. विरोधी पक्षाच्या चांगल्या सूचनाही ते नेहमी आदराने आणि सन्मानाने स्वीकारायचे.

पुलोदच्या काळात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना जनता पक्षाचाही पाठिंबा होता. त्यामुळे राजकीय कामासाठी पवार आणि वाजपेयींचे संबंध आले. वेळेनुसार ते अधिक घट्ट होत गेले. 

सन 1996 साली वाजपेयींचे 13 दिवसांचे सरकार पडले. त्यावेळी पवार काँग्रेसचे संसदीय नेते होते. त्यामुळे त्यांनी संसदेत अविश्वास ठरावाच्या बाजूने आणि सरकारविरोधात भाषण केले होते. त्यावेळी वाजपेयींनी त्यांचे भाषण शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मात्र, त्या रात्री वाजपेयींनी पवारांना फोन केला. पवारांनी संसदेत केलेल्या भाषणाबद्दल वाजपेयींनी त्यांचे कौतुक केले. हा प्रसंग पवार यांनी सांगितला.

तसंच सन 2002 मध्ये गुजरातमध्ये मोठा भूकंप झाला होता. या भूकंपात मोठी हानी झाली होती. त्यावेळी केंद्रात भाजप आघाडीचे सरकार होते. महाराष्ट्रातील लातूरच्या भूंकपातील पुनवर्सनाचा पवारांना चांगला अनुभव होता. त्यामुळे पवारांनी स्वत: अटलजींकडे गुजरातमध्ये पुनवर्सनासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा वाजपेयींच्या काळात आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करुन त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड केली, अशा आठवणी देखील पवारांनी सांगितल्या.