या उबर ड्रायव्हरच्या कविता ऐकाल तर तुम्हीही चाट पडाल…

गेल्या महिन्यात एका कॉन्फरन्ससाठी इंदोरला जाण्याचा योग आला. एअरपोर्टमधून बाहेर येऊन उबर बुक केली आणि ड्रायव्हरला फोन लावला.

“भैय्या उबर बुक किया हैं.”

“बस दो मिनिटमें आ रहा हूँ सर.” म्हणत त्याने फोन ठेवला.

गाडीत बसतानाच ड्रायव्हरची वाढलेली दाढी, अस्ताव्यस्त केस पाहून मी जरा चिंतेत पडलो. तो दिसायलाच मवाल्यासारखा दिसत होता. त्यात भर म्हणून त्याने खाल्लेल्या गुटख्याचा वास सगळ्या गाडीत येत होता. त्या वासाने मी अजूनच हैराण झालो.

बसून जरा स्थिरस्थावर होतोय तोच त्याने विचारले,

“तुम्ही कुठले सर?” (संभाषण अर्थात हिंदीमध्ये झालं. इथे लिहिताना मराठीमध्ये मांडतोय.)

“पुणे.” मी एका शब्दात उत्तर दिले.

“पुणे – म्हणजे कल्चरल अँड एज्युकेशनल कॅपिटल ऑफ महाराष्ट्रा. बरोबर ना सर?” त्याने मला विचारले.

“अरे वाह. तुम्हाला चांगलीच माहिती आहे.” मी त्याला दुजोरा देत म्हटले.

मी बोलतोय हे लक्षात आल्यावर त्याने शेजारच्या सीटवर पडलेली एक वही उचलली आणि म्हणाला,

“सर तुमची परवानगी असेल तर तुम्हाला काही दाखवू का?”

मीही फारसे आढेवेढे न घेता त्याला होकार दिला. त्याने वही माझ्या हातात दिली. वही पाहून मी चाट पडलो.

“हे सगळं तुम्ही लिहिलंय?” मी आश्चर्याने त्याला विचारले.

“हो सर मीच लिहिलंय सगळं.”

त्या वहीमध्ये त्याने स्वतः केलेल्या कविता होत्या. मी त्या चाळू लागलो आणि मुंबईवर केलेल्या एका कवितेने माझे लक्ष वेधून घेतले.

“मुंबई मतलब माया नगरी
बोले तो दो नंबरी
एकसा मौसम रेहता हरदम
नवंबर हो या जनवरी
किरण बोलना आता नहीं सुपरस्टार कहलाता है
कभी कोई आतंकी समुद्रसे आता है
बम्बई का एकही राजा गौरी सुताये
जो स्वाद का शौकिन हो वो इंदोर चला आये”

इंदोरबाबत आपल्याला असलेले प्रेम त्याने या कवितेतून व्यक्त केले होते.

“तुम्ही कधीपासून कविता करताय?” मी त्याला विचारले.

“सर चौथीत असल्यापासून मला कविता करायची गोडी लागली.” त्याने उत्तर दिले.

“अरे वा. मग शिक्षण किती झाले तुमचे?” माझा पुढचा प्रश्न.

“दहावीनंतर शाळा सोडली सर.”

“का बरं?” मी विचारात पडलो.

“शाळेत कधी मन रमलेच नाही. घरी वडिलांचा ट्रकचा व्यवसाय होता. मग तिथेच चिकटलो. त्या निमित्ताने फिरणे होऊ लागले. नंतर स्वतः गाडी चालवू लागलो. मग तर खूप फिरलो.  सबंध भारतात जिथे जिथे जाईल तिथली भाषा तोडकीमोडकी का होईना शिकू लागलो. देवाची कृपा बघा सर, आज मी 15 भाषा बोलू शकतो. गेल्या 20 वर्षांत अख्खा भारत फिरलोय असं म्हटलं तरी चालेल.”

“क्या बात है? मग या कवितांना बहर कधी फुटला?” मी खुश होत म्हणालो.

“बऱ्याच कवींसारखी माझीही स्टोरी आहे सर. गर्लफ्रेंड सोडून गेली आणि त्या दुःखात माझ्या काव्यप्रतिभेला धुमारे फुटले. आज इतक्या वर्षांनंतरही तिचे धन्यवाद मानतो. ती नसती तर मी एवढ्या कविता करूच शकलो नसतो.

“प्रेममें जब असफलता मिलती हैं
बस वहींसे तो असली फिल्म चलती हैं”

सही कहा ना सर?” म्हणत त्याने कवितेतून आपल्या कविता करण्याच्या छंदाविषयी सांगितले.

“हे कमाल आहे सचिन सर.” नकळत मी त्याला सर म्हणू लागलो होतो. त्याचं पूर्ण सचिन गौर. चालत्या गाडीत त्याची कवितांची वही चाळत होतो आणि एका कवितेने लक्ष वेधून घेतले.

“सवाल क्या मंगल को मटण खाना चाहिये?
क्यू नही? मर्तो को बहाना चाहिये
कसमोसें सच नही निकलते?
खूबसूरत चेहरे देखने मंदिर जाना चाहिये..”

लोक मंदिरात कशाला जातात या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील कविता केली आहे. अशा अनेक कवितांमधून ते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. त्यामुळेच ते आपले नाव सवाल सचिन किंवा सचिन सवाल असेही सांगतात.

नागपंचमीला सापांना दूध पाजतात हे त्यांना आवडत नाही. ते कवितेतून त्याविरुद्ध आवाज उठवत म्हणतात

“साप तो मांसाहारी है
अंडे किडे मेंडक खाते है
ये तो हिंदू मायथॉलॉजी
जबरन दूध में डुबाती है”

पाऊस आजकाल कमी होत चालला आहे. नद्या कोरड्या पडत आहेत. ज्या आहेत त्या सांडपाणी सोडण्यासाठी जास्त वापरल्या जातात. या परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणतात,

“जिते जी प्यास बुझाती है
मरने के बाद मोक्ष दिलाती है
क्या आज की युवापिढी
इन नदींयो को बचा पाती है?”

मी ‘वाहवा’ करेपर्यंत ते पुन्हा म्हणाले,

“स्वर्ग जानेका मार्ग ये नदियां
प्रकृति का उपहार ये नदियां
जीवन में रफ्तार ये  नदियां
जुल्म में हमारे गिरफ्तार ये नदियां”

मी पुन्हा एकदा ‘क्या बात है’ म्हणत त्यांना दाद दिली.

आयुष्य हेच आपले गुरु आहे हे सांगताना ते म्हणतात,

“जिंदगी सबसे बडी ट्रेनर
सब कुछ सिखाती हैं
ये आपपे निर्भर करता हैं
कब अकल आती हैं”

इंदोर एअरपोर्टला आतमध्ये गाडी घेऊन जाण्याकरता 55 रुपये टोल लागतो. त्या विरोधात उपहासात्मक शब्दांत ते म्हणतात,

“एअरपोर्टपे पचपन की लडिया
वेलकम टू क्लिनेस्ट सिटी ऑफ इंडिया”

क्रिकेटचे शौकीन असलेले सचिन कधी हुक्की आली तरी इंग्लिशमध्ये लिहितात. अर्थात त्यातूनही ते काहीतरी संदेश देतातच. यातली एक दोन ओळींची कविता मला ऐकवत ते म्हणाले,

“Life is not a T20 or a Test Match
Think Positive always, Do Not Drop a Catch”

दरम्यान माझे हॉटेल आले होते. उबरची ही सफर कधी संपू नये असे प्रथमच मला वाटले. हॉटेलला गेल्यावर न राहवून मी पुन्हा त्यांना फोन केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला बोलावले. वेळही ठरली. सकाळी साडेसातला त्यांना फोन केला आणि पलिकडून आवाज आला,

“सर मी रोज सकाळी योगा क्लासला जातो. त्यामुळे तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. पुन्हा कधी इंदोरला आलात तर मात्र नक्की भेटू.”

आजही सचिन माझ्या संपर्कात आहेत. रोज एखादी कविता लिहून तिचा फोटो ते मला पाठवत असतात. उबरला गाडी लावून त्यांना अडीच वर्षे झाली. दोन वर्षांत 4500 हुन अधिक ट्रिप त्यांनी पूर्ण केल्या आहेत. यातून जे पैसे मिळतात त्यावर त्यांचे घर चालते. आपण अजून पैसे कमवावेत अशी त्यांची अजिबात इच्छा नाही. जे आहे ते उत्तम आहे, अधिकाची अपेक्षा न करणेच योग्य या भावनेतून ते आजही आपला व्यवसाय करतात.

लेखक- आदित्य गुंड, aditya.gund@gmail.com