तुम्ही अपयशी ठरताय का?; तर मग हा लेख एकदा नक्की वाचा…

आपल्या आजूबाजूला अनेक लोक संकल्प करताना ध्येय ठरवताना दिसतात. मात्र हे संकल्प ही ध्येयं ते पूर्णत्वाला नेतातच असं नाही. कारण काहीही असो मात्र ठरवलेल्या गोष्टींमध्ये अनेकांना अपयश येतं. काहीजण यशस्वी होतात. मग यशस्वी आणि अयशस्वी होणाऱ्यांमध्ये नेमका काय फरक असतो?…

फरक काहीच नसतो. फक्त ते मनाच्या कोणत्या अवस्थेचा वापर करतात यावर त्यांचं यश आणि अपयश अवलंबून असतं. एकदा तुम्ही मनाची अवस्था ठरवली की त्यासंबंधाने करायच्या गोष्टी आपण आपोआप करत जातो. आपल्या मनाचा कसा आणि कोणत्या दिशेने वापर करायचा यासाठी मनाच्या अवस्था माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. मनाची 3 भागात विभागणी केली जाते.

 

1) अचेतन मन (Unconscious Mind)

2) सचेतन मन (Conscious Mind)

3) अवचेतन मन (Sub-Conscious Mind)

 

अचेतन मन (Unconscious Mind)-

सर्वमान्य शब्दात सांगायचं झालं तर ‘कोमा’ हा शब्द या मनाची अवस्था सांगण्यास पुरेसा आहे. म्हणजे जी व्यक्ती कोमात असते त्या व्यक्तीचं मन अचेतन असतं.

-सचेतन मन (Conscious Mind)-

आपल्या मेंदूचा 10-12% भाग हा सचेतन मनाकडून वापरला जातो. सचेतन मनाचं काम काय तर एखाद्या गोष्टीवर विचार करणे, त्याचं नियोजन करणे, त्यासाठी तर्कशास्त्राचा वापर करणे, त्याचं विश्लेषण करणे व शेवटी त्यावर योग्य तो निर्णय घेणं. सचेतन मनाचा पूर्वी आलेल्या अनुभवांवर जास्त विश्वास असतो.

जसे की आगीत हात टाकला तर चटका लागतो. हे सचेतन मनात कायमचं कोरलं जातं. या अनुभवांवर आधारुन पुढे निर्णय घेतले जातात.

-अवचेतन मन (Sub-Conscious Mind)-

मेंदूचा 88-90% भाग अवचेतन मनाकडून वापरला जातो. अवचेतन मन आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या गोष्टींवर अवलंबून असतं. आपल्या सवयी, आपल्या भावना, आठवणी (भावनिक) व विश्वास इ. अवचेतन मनाकडे खूप शक्ती आहे. ठरवलेल्या गोष्टी पूर्णत्वाला नेण्याचं काम याकडून होतं. अवचेतन मन आपल्या विश्वासार्हतेवर व भावनांवर जास्त खेळतं.

उदाहरणाने जास्त स्पष्ट होईल- मला रोज सकाळी लवकर उठायची सवय आहे. रोज लवकर उठून व्यायाम व प्राणायाम केला तर आरोग्य चांगले राहते यावर माझा विश्वास आहे. मला लवकर उठणं, व्यायाम करणं, प्राणायाम करणं सोप्पं वाटतं. असं जर असेल तर माझे विचार- आचारही त्याच दिशेने असतील, त्यानुसारच माझं नियोजन असेल.

मात्र याउलट विचार केला तर, म्हणजे मी रोज सकाळी लवकर उठते. रोज लवकर उठून व्यायाम व प्राणायाम केला तर आरोग्य चांगले राहते यावर माझा विश्वास नाही. तसेच हे सगळं करणं मला खूप कठीण वाटतं. असं झालं तर माझे विचार-आचार बदलतील व हाच माझा अनुभव माझ्या सचेतन मनावर कोरला जाईल.

आपल्याकडून एखादं काम करुन घेणं हे पूर्णत: अवचेतन मनावर अवलंबुन असतं. आपल्या अवचेतन मनाला जर आपण ठामपणे सांगितलं तर आपण कधीही हाती घेतलेल्या कामात अयशस्वी होणार नाही. ठराविक काम करण्यासाठी अवचेतन मनावर ताबा मिळविणे खुप महत्वाचे आहे व अवचेतन मनावर ताबा मिळवण्यासाठी आपण करतो त्या गोष्टीवर आपला विश्वास असणं आवश्यक आहे.

 

लेखिका- डॉ. अश्विनी पाटील, ashwinitpatil@gmail.com