व्हायरल सत्य : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो फोटो अटलजींच्या निधनावेळचाच?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनावेळचा हा फोटो असल्याचं सांगितलं जातंय. या फोटोद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं जातंय. मात्र हे खरं आहे का याची पडताळणी ‘सविस्तर’नं केलीय. वाचा काय समोर आलं….

त्या दिवशी नेमकं काय झालं?

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झालं. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देश शोकसागरात बुडाला. आपल्या नेत्याचं निधन झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसेच भाजपच्या अनेक मंत्र्यांची एम्समध्ये उपस्थित राहून स्वतः वाजपेयींच्या प्रकृतीविषयी वारंवार विचारणा केली.

व्हायरल पोस्टमध्ये काय दावा करण्यात आलाय?

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असताना मोदी एम्सच्या डॉक्टरांसोबत हसत होते. असा दावा विविध व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. 

नेमकं काय आहे सत्य?

मुद्दा क्रमांक 1 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अटलजींच्या निधनाच्या दिवशी घातलेला ड्रेस आणि व्हायरल फोटोमधील ड्रेस हा एकच असल्याचं स्पष्ट दिसत आहे. नरेंद्र मोदींच्या खिशात एक काळ्या रंगाचा पेन दिसत आहे. हा पेनही दोन्ही फोटोंमध्ये तोच असल्याचं दिसत आहे. संबंधित दोन्ही फोटोंची तुलना या लिंकवर क्लिक करुन पाहता येईल

मुद्दा क्रमांक 2 – पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासोबत असलेले बॉडीगार्ड… व्हायरल फोटोत आणि वाजपेयींच्या निधनाच्या दिवशी असलेले बॉडीगार्ड सारखेच असल्याचं संबंधित फोटोत दिसत आहे. संबंधित फोटोंची या लिंकवर क्लिक करुन पाहता येईल

मुद्दा क्रमांक 3 – मोदींचा व्हायरल फोटो एम्समधील नसल्याचा दावा केला जातोय. हा फोटो केरळचा असल्याचा दावा केला जातोय. मात्र मोदींच्या केरळ भेटीचा फोटो पाहिल्यास त्यात मोदींनी स्लीव्हलेस शर्ट घातल्याचं दिसत आहे. व्हायरल फोटोत मात्र मोदींनी फुल बाह्याचा शर्ट घातला आहे. 

मुद्दा क्रमांक 4 – मोदींचा व्हायरल झालेला फोटो केरळचा नव्हे तर एम्समधीलच आहे. या दाव्याची पुष्टी करणारी गोष्ट म्हणजे या फोटोत दिसणारे डॉक्टर… डॉ. शिव कुमार चौधरी असं त्यांचं नाव आहे आणि ते एम्समधीलच डॉक्टर आहेत. 

वरील सर्व गोष्टींचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं त्याच दिवसाचा आहे. तसेच तो एम्समधीलच आहे. मात्र सोशल मीडियावर हा फोटो अटलजींच्या निधनाच्या नंतरचा असल्याचा दावा केला जातोय. हा दावा मात्र खोटा आहे. कारण मोदी दुपारी 2 वाजून 45 मिनिटांच्या आसपासच एम्समधून निघून गेले होते. तर अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झाल्याची घोषणा संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी करण्यात आली. मात्र हा फोटो त्याच दिवशीचा असल्याचंही समोर आलं आहे.