पुण्याची शिवडी फेसबुकवर; म्हणते कदापि माफ करणार नाही!

पिंपरी चिंचवडमध्ये प्रियकरानं रुसलेल्या प्रेयसीला मनवण्यासाठी लावलेले पोस्टर चांगलेच चर्चेचा विषय ठरले होते. शिवडे, आय अॅम सॉरी असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं होतं. एक दोन नव्हे तर रस्त्याच्या कडेला असे तब्बल 300 पोस्टर्स लावण्यात आले होते. या प्रकारानं पिंपरीत हा विषय चर्चेचा ठरलाच होता. मात्र पोलिसांनी अवैध फ्लेक्स लावल्याच्या नावाखाली संबंधित प्रियकराला शोधून काढलं आणि ज्या मित्राच्या मदतीनं त्यानं शहरभर फ्लेक्स लावले त्या दोघांना दंड ठोठावला. हा दंड 72 हजार रुपये एवढा असल्याचं कळतंय. 

पुण्याच्या शिवडीचं फेसबुकवर आगमन-

रुसलेली प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार होती, त्यामुळे पुण्यातील एका पठ्ठ्यानं हे पोस्टर्स लावले होते. सोशल मीडिया मात्र यासंदर्भातील विनोदांनी लोटपोट झाला होता. आता हीच शिवडी फेसबुकवर अवतरली आहे. 

फेसबुकवर पुण्याची शिवडी नावाने काही पेज तसेच काही अकाऊंट सुरु करण्यात आले आहेत. पुण्याची लाडकी शिवडी अशा नावाने काही प्रोफाईल सुरु झाल्या आहेत. लोकांचा या प्रोफाईलला वाढता प्रतिसाद पाहता फेसबुकवर अवतरलेली शिवडी लोकांच्या आवडीचा विषय ठरली आहे. 

‘Shivde, I am Sorry’ पोस्टरवरुन विनोदांचा पाऊस-

‘Shivde, I am Sorry’ असं लिहिलेले पोस्टर्स आता क्रॉप करुन कुठंही चिटकवले जात आहेत. एका फोटोत तर चक्क अण्णा हजारे बसलेले आहेत. आणि त्यांच्या शेजारी हे पोस्टर्स उभारलेलं पहायला मिळत आहे. दुसऱ्या एका फोटोत नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर पहिल्यांदा ‘Shivde, I am Sorry’ असं लिहिलेलं पोस्टर्सचं जमिनीत गाडलं होतं. असं दिसत आहे. आणखी एका फोटोत इजिप्तच्या पिरॅमिडवर हा फ्लेक्स झळकताना पहायला मिळतोय. याचप्रमाणे हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात देखील हा फ्लेक्स सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. हिटलरच्या एका फोटोमागे देखील झाडावर हाच फ्लेक्स लावल्याचं दिसत आहे.

‘Shivde, I am Sorry’ वापरुन मिम्स-

सध्या मिम्सची सोशल मीडियात चांगलीच चलती आहे. मिम्सवाल्यांनी शिवडीचा विषय नसता उचलला तरच नवल. शिवडीवरुन, तिच्या प्रियकरावरुन आणि या पोस्टर्सवरुन मिम्स बनवले जाऊ लागले आहे. याशिवाय टेक्स्ट पोस्टर्स देखील मोठ्या प्रमाणावर बनवले आहेत. पुण्याची शिवडी नावानं असलेल्या फेसबुक पेजवरुन देखील अशा प्रकारचे काही पोस्टर्स शेअर करण्यात आलेले आहेत. हे पोस्टर्स वाचणाऱ्यांना खळखळून हसायला भाग पाडतात. 

फेसबुकच नव्हे ट्विटरवरही शिवडीचे चाहते-

फेसबुकच नव्हे तर ट्विटरवरही शिवडीचे चाहते पाहायला मिळत आहे. शिवडीच्या नावानं ट्विटरवरही विनोद केले जात आहेत.  नावाचा हॅशटॅग वापरुन ट्विट केली जात आहेत. ही ट्विट चांगलीच हीट होताना दिसत आहे. फेसबुकवर शिवडीचं झालेलं आगमन ट्विटरवरील अनेकांना पटलेलं दिसत नाही. त्यांच्या मते शिवडीनं ट्विटरवर यायला हवं. ट्विटरकऱ्यांची ही मागणी लक्षात घेऊन शिवडीचं ट्विटरवर लवकरच आगमन झाल्यास आश्चर्य वाटायला नको.