हनन हमीदची स्टोरी वाचून तुम्हीही म्हणाल, “पोरी आम्हाला तुझा अभिमान वाटतो!”

केरळमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. केरळ या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सारा देश केरळच्या पाठीशी उभा राहिला आहे. नानाविध प्रकारची मदत देशभरातून केरळवासीयांसाठी पाठवली जात आहे. या मदतीमध्ये एका विद्यार्थिनीची मदत मात्र साऱ्या देशात कौतुकाचा विषय ठरत आहे. हनन हमीद असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. तिने केरळच्या पूरग्रस्तांसाठी तब्बल दीड लाख रुपयांची मदत केली आहे. 

कोण आहे हनन हमीद?

हनन मूळची कोचीनजवळच्या मंडवाना गावात राहणारी मुलगी… आईचा घटस्फोट झाल्यानं आई आणि छोट्या भावासोबत राहणारी… महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता घरखर्चाला हातभार लावण्याची जबाबदारी तिच्यावर कोवळ्या वयातच पडली. मात्र हनन हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. आर्थिक अडचण सोडवण्यासाठी तीने मासे विकण्याचा निर्णय घेतला. भल्या पहाटे उठून मासळीबाजारातून मासे खरेदी करायचे आणि सकाळचे कॉलेज झाले की मासे विकायला बसायचे हा तिचा रोजचा परिपाठ. 

हमीदची मदत का ठरतेय चर्चेचा विषय?

मासे विकून पोट भरणारी आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलणारी मूळच्या केरळच्या पूरग्रस्तांसाठी मदत करते. तीही थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दीड लाख रुपयांची. दुसऱ्यांसाठी रुपया खिशातून काढण्यापूर्वी हजारदा विचार करणाऱ्या समाजात ही नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे. सोशल मीडियावर लोक त्यामुळेच तिचं कौतुक करत आहेत. मात्र एवढी एकच गोष्ट यामागे नाही तर काही दिवसांपूर्वीच या हननला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. 

का ट्रोल झाली होती हनन?

घरखर्च भागवण्यासाठी आणि महाविद्यालयीन खर्च उचलण्यासाठी हनन मासे विकण्याचं काम करत होती. केरळमधील वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. या घटनेचं वार्तांकन करण्यात आलं. हननची कहाणी लोकांच्या मनाला भिडली होती. तिला मदत करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले होते. स्वतः मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तिचं कौतुक केलं होतं. 

काही लोकांना मात्र हननची ही कथा खोटी वाटली होती. त्यांनी हननला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यातच हननला फिल्मची ऑफर आली. ट्रोल करणाऱ्यांच्या हाती आयतं कोलीत आलं. खरंतर तिच्याविषयीची बातमी हा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा एक भाग होता, असे समजून तिच्यावर टीका सुरू झाली. डोक्यावर आच्छादन न घेताच मासे विकायला बसली, यावरूनही तिला लक्ष्य केले गेले आणि तिला घराबाहेर पडणे अशक्य झाले. त्यांनी हननवर अत्यंत टोकदार शब्दात टीका करण्यास सुरुवात केली. तिला अत्यंत वाईट पद्धतीनं टोल करण्यात आलं. आधीच्या कौतुकाचे रुपांतर क्षणात टीकेच्या भडीमारात झाले. यावेळी चक्क मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि केंद्रीय मंत्री अल्फोंस कन्नाथनम हननच्या समर्थनार्थ उतरले होते. मुख्यमंत्र्यांनी तर ट्रोलर्सवर पोलीस कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

हनन या हल्ल्याने थोडी विचलित झाली असली तरी तिने आपला निश्चय मात्र ढळू दिला नाही. ट्रोल करणाऱ्यांनी तीने चोख शब्दात प्रत्युत्तर दिलं होतं. 

हनननं एवढे पैसे कुठून आणले?

मासे विकून स्वतःचा खर्च आणि महाविद्यालयीन खर्च भागवणाऱ्या हननकडे एवढे पैसे आले कुठून असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर हननने केरळच्या पूरग्रस्तांना दिलेले पैसे हे तिला आलेल्या मदतीतूनच दिलेले आहेत. मासे विकून संघर्ष करणाऱ्या या पोरीची कथा माध्यमांनी छापल्यानंतर तिच्यासाठी मदतीचा ओघ सुरु झाला होता. त्या मदतीतील काही पैसे हनननं केरळच्या पूरग्रस्तांना दिले आहेत. 

“हे पैसे लोकांनीच मला दिले होते. आता तेच पैसे मी गरजवंतांना दिल्यानं मला खूप छान वाटतंय”, असं हनन हमीदनं म्हटलंय. हननचं कौतुक होतंय ते यामुळेच…