समोर गर्दी दिसल्यानंतरही ड्रायव्हर रेल्वे का थांबवत नाही?

अमृतसर रेल्वे दुर्घटनेमुळे सारा देश सुन्न झाला आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 61 जणांचा मृत्यू झाला असून 70 लोक जखमी झाले आहेत. जोडा फाटक परिसरात हा अपघात घडला. रावण दहनावेळी जमलेली गर्दी रेल्वे रुळांवर उभी होती आणि फटाक्यांच्या आवाजामुळे रेल्वे आल्याचं त्यांना कळालं नाही. भरधाव रेल्वेनं रेल्वेरुळावर उभ्या असलेल्या लोकांना अक्षरशः चिरडलं. या धक्कादायक घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या रेल्वे अपघाताची जबाबदारी नेमकी कुणाची? रेल्वे, स्थानिक प्रशासन, आयोजक की बघ्यांची? या प्रकरणाची चौकशी होईल आणि त्यातून दोषींवर कारवाई होईल. या पलिकडे अनेकांना एक प्रश्न अनेकांना पडला आहे. तो म्हणजे एवढी मोठी गर्दी दिसूनही ड्रायव्हरने रेल्वे का थांबवली नाही? ( पुढचा लेख वाचण्यापूर्वी लक्षात घ्या भारतीय रेल्वेच्या ड्रायव्हरला लोकोपायलट म्हणतात )

रेल्वेमध्ये कोणता ब्रेक असतो?

आपल्याकडे रस्त्यावर चालणाऱ्या ट्रक-बसला ज्याप्रमाणे एअरब्रेक असतो. तोच एअरब्रेक रेल्वेमध्ये असतो. ज्यामध्ये एक पाईप असतो. त्यात जोराची हवा भरलेली असते. ही हवा नायलॉनच्या एका ब्रेक शू ला पुढे मागे करते आणि हाच नायलॉनचा ब्रेक शू रेल्वेच्या चाकांवर घासून रेल्वे थांबते. गाडी जेव्हा सामान्य स्थितीमध्ये उभी असते तेव्हा ब्रेक लागलेला असतो. 

लोकोपायलट ब्रेक केव्हा दाबतो?

लोकोपायलटला गाडी चालवायचा नव्हे तर ब्रेक दाबण्याचा पगार मिळतो, असं नेहमी गमतीत म्हटलं जातं. गाडी चालवायचं लोकोपायलटच्या हातात नसतं. सिग्नल पाहून त्याला ती चालवावी लागते. हिरवा सिग्नल असेल तर गाडी पूर्ण वेगाने चालते. भारतात हा वेग प्रतितास 160 किलोमीटरपर्यंत असू शकतो. जेव्हा लोकोपायलटला पिवळा सिग्नल मिळतो. तेव्हा तो गाडीचा वेग कमी करतो. गाडीचा वेग कमी करण्यासाठी त्याच्याजवळ दोन ब्रेक असतात. एक इंजीनवाला ब्रेक आणि दुसरा संपूर्ण गाडीचा ब्रेक.

गाडीच्या प्रत्येक डब्याच्या प्रत्येक चाकाला एक ब्रेक असतो. ब्रेक पाईपनं हे सारे ब्रेक एकमेकांना जोडलेले असतात. लोकोपायलटला एकापेक्षा जास्त पिवळे सिग्नल मिळायला लागले की तो अत्यंत कमी वेगाने गाडी चालवतो. जर सिग्नल लाल असेल तर लोकोपायलटला कोणत्याही परिस्थितीत गाडी सिग्नलपूर्वीच रोखावी लागते. लाल सिग्नल पार करणं मोठी चूक मानली जाते आणि त्याची चौकशीसुद्धा होते. 

लोकोपायलट इमर्जन्सी ब्रेक केव्हा दाबतो?

लोकोपायलटला गाडी थांबवणं अत्यंतिक गरजेचं वाटेल तेव्हा तो गाडी थांबवू शकतो. रेल्वेरुळ व्यवस्थित नसणे, रेल्वेखाली काही येणे, रेल्वेपुढे काही दिसणे, गाडीमध्ये काही बिघाड असणे अशा प्रत्येक स्थितीत जिथं गाडी थांबवणं गरजेचं असेल तिथे लोकोपायलट इमर्जन्सी ब्रेक लावू शकतो. इमर्जन्सी ब्रेक दाबल्यानंतर 24 डब्यांची गाडी 100 किलोमीटर प्रतितास वेगानं धावत असेल आणि लोकोपायलटने जर इमर्जन्सी ब्रेक दाबला तर 800 ते 900 मीटर अंतरावर जाऊन पूर्ण गाडी थांबू शकते. मालगाड्यांसाठी हेच अंतर 1100 ते 1200 मीटर असू शकतं. याशिवाय मालगाडीत किती ओझं आहे त्यावरही ते अवलंबून असतं. अमृतसरच्या रेल्वे दुर्घटनेत जी गाडी होती त्या गाडीला इमर्जन्सी ब्रेक दाबल्यानंतर थांबायला साधारणतः 625 मीटर अंतर लागतं. 

गाडीच्या समोर कुणी आल्यानंतर लोकोपायलट ब्रेक का दाबत नाही?

साधारणतः भारतात जे अपघात घडतात त्यामध्ये अचानकपणे रेल्वेपुढे काही वाहन, जनावर किंवा माणूस आल्यामुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण जास्त आहे. रेल्वेची गती यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते. रेल्वे वेगात असते तेव्हा अचानकपणे कोणी समोर आलं तर लोकोपायलटला इमर्जन्सी ब्रेक दाबायला तेवढा वेळच मिळत नाही. 

वळणावर पुढचं पाहणं लोकोपायलटसाठी सर्वात कठीण गोष्ट असते. अशावेळी जवळ आल्यावरच साऱ्या गोष्टी दिसतात. रात्रीच्या वेळी तर या गोष्टी फारच कठीण होऊन जातात. इंजीनच्या समोरील भागात असलेल्या दिव्याच्या प्रकाशात रुळांवर जिथवर प्रकाश पडेल तिथपर्यंतच लोकोपायलट पाहू शकतो.

अमृतसरसारखी मोठी गर्दी रेल्वे रुळांवर असेल तर साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावरुन रात्रीच्या वेळी ती लोकोपायलटला दिसू शकते. अशावेळी इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवणं लोकोपायलटसाठी फार कठीण गोष्ट असते. ड्रायव्हरचा अशावेळी भरवसा असतो रेल्वेच्या हॉर्नवर. तो सतत हॉर्न वाजवत राहतो. अमृतसरच्या दुर्घटनेच्या व्हीडिओतही हा हॉर्न स्पष्टपणे ऐकू येत आहे. 

इमर्जन्सी ब्रेक लावल्यावर गाडी रुळावरुन खाली उतरते का?

इमर्जन्सी ब्रेक लावल्यावर गाडी रुळावरुन उतरते ही अंधश्रद्धा आहे. गाडीत किंवा रुळामध्ये काही बिघाड असेल तरच गाडी रुळावरुन खाली उतरते. आपतकालीन स्थितीत गाडी सुरक्षितरित्या थांबावी यासाठी इमर्जन्सी ब्रेक देण्यात आलेला आहे. इमर्जन्सी ब्रेक दाबल्यानंतर सहजासहजी गाडी रेल्वे रुळांवरुन खाली उतरत नाही. 

अमृतसरमध्ये काय झालं?

रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विन लोहानी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या मार्गावर 100 किलोमीटर प्रतितास या निर्धारित वेगानं रेल्वे चालते. ही घटना घडण्यापूर्वी गाडीचा वेग 92 किलोमीटर प्रतितास होता. गर्दी पाहताच लोकोपायलटनं ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. गाडी जेव्हा जमावाला धडकली तेव्हा गाडीचा वेग 68 किलोमीटर प्रतितास झाला होता. या गाड्यांना पूर्ण थांबण्यासाठी 625 मीटर अंतर लागतं. त्यामुळे गाडी थांबेपर्यंत गाडीने जमावाला उडवलं होतं.