गुजरातच्या व्यापाऱ्यानं 600 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिल्याची बातमी खोटी; वाचा काय आहे सत्य

गुजरातच्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून कार भेट दिल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. हरे कृष्ण या आपल्या कंपनीत काम करणाऱ्या 600 कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्याचं वृत्त होतं. सावजी ढोलकीया असं या कंपनीच्या मालकाचं नाव आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत याच बातमीची चर्चा आहे. लोक या बातम्या शेअर करत आहेत. काश आम्हालापण असा मालक भेटला असता अशा पोस्ट करत आहेत. मालक ढोलकियांवर देखील सगळीकडून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. मात्र, या बातमीचा आता एक नवा पैलू आहे. ‘मेरान्यूज डॉट इन’ नावाच्या वेबसाईटनं या बातमीसंदर्भात एक खळबळजनक खुलासा केला आहे. कंपनीतल्या कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांनी हा प्रकार नेमका काय आहे? खरंच या कर्मचाऱ्यांना मोफत कार मिळाल्यात का? हे समोर आणलं आहे. 

नेमका काय आहे हा प्रकार?

सावजी ढोलकियांच्या कंपनीमधले कर्मचारी कॉस्ट टू कंपनी या तत्वावर काम करत आहेत. कॉस्ट टू कंपनी म्हणजे कर्मचाऱ्याला एका वर्षात किती पगार द्यायचा? हे आधीच जवळपास निश्चित केलेलं असतं. हा सगळा एकूण कर्मचाऱ्यावर केला जाणारा खर्च म्हणजेच ‘कॉस्ट टू कंपनी’ त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये CTC सुद्धा म्हटलं जातं. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून जी रक्कम मिळते ती त्यांच्या दर महिन्याच्या पगारातून कापली जाते. दिवाळीला बोनस म्हणून कार भेट देताना कार कंपनीला संपूर्ण रक्कम अदा केली जाते. त्यामुळे ‘हरे कृष्ण डायमंड कंपनी’ ही कंपनी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना कार देते पूर्णसत्य नाही तर ते अर्धसत्य आहे. कारसाठी दिलेले पैशातील मोठी रक्कम ही कर्मचाऱ्याच्या सीटीसीतली म्हणजेच पगारामधलीच असते.

या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा-

सावजी ढोलकिया यांची कंपनी कर्मचाऱ्यांना कार मिळावी यासाठी ही युक्ती लढवत असली तरी यामध्ये त्यांच्याच कंपनीचा मोठा फायदा असेल. तुम्ही म्हणाल कसा काय फायदा, कार कंपनी काय फुकटात गाड्या देते का? तर नाही कार कंपनी बिलकूल फुकटात गाड्या देत नाही. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजेच 600 गाड्यांची एकत्र खरेदी केली जात असेल तर डिस्काऊंट तर मिळतच असेल ना. होय सावजी ढोलकियांना प्रत्येक कारमागे डिस्काऊंट मिळतो. आणि या डिस्काऊंटचा आकडा देखील थोडाथिडका नाही. एका कारमागे सावजी ढोलकिया यांच्या कंपनीला 80 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळतो. त्यामुळे प्रत्येक कारची किंमत 80 हजार रुपयांनी कमी होते. 

कर्मचाऱ्यांच्या नावावर नसतात गाड्या-

डिस्काऊंटसोबत सावजी ढोलकियांच्या कंपनीला याचे आणखी काही फायदे मिळतात. तुम्हाला माहीत नसेल मात्र कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गाड्या त्यांच्या नावावर घेतल्याच जात नाहीत, त्या कंपनीच्या नावावर घेतल्या जातात. आणखी धक्कादायक बाब म्हणजे जे कर्मचारी गाड्या स्वीकारतात त्यांना पुढची 5 वर्ष हरे कृष्ण डायमंड कंपनीची  नोकरी सोडणार नाही, असं हमीपत्र लिहून द्यावं लागतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाच वर्ष नोकरी सोडता येत नाही याशिवाय महिन्याचा कारच्या कर्जाचा जो ईएमआय आहे, त्यातला अर्धा हिस्सा त्यांना भरावा लागतो. 

सावजी ढोलकिया यांच्या कंपनीचा आणखी एक फायदा आहे. कारचा जो जीएसटी भरण्यात येतो, त्याचं टॅक्स क्रेडीट कंपनीला मिळतं, कारण कंपनीच्या नावावर सगळ्या कार खरेदी केलेल्या असतात. त्यामुळे कंपनीला लाखो रूपयांच्या जीएसटीचं क्रेडिट सुद्धा मिळतं.

खरंच उदारपणा की व्यवहार?

सुरतमधील एक कंपनी आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट करते. तोही दिवाळीचा बोनस म्हणून ही बातमी वाचायला चांगली असली तरी सत्य मात्र वेगळंच आहे. ही कंपनी अत्यंत उदारपणे आपल्या कर्मचाऱ्यांना कार बोनस देते असं चित्र रंगवणं चुकीचं आहे. कंपनीच्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्याच खर्चाने कंपनी त्यांना कार घेऊन देते, वर 5 वर्षे नोकरी न सोडण्याचं लिहून घेऊन काही भाग उचलते. मात्र कंपनीला त्याचे काही फायदेसुद्धा होतात, असा दावा ‘मेरान्यूज’नं केला आहे.