सामन्याचा शंभरावा चेंडू आणि सव्वाशे कोटी भारतीयांचं स्वप्न तुटलं!

भारत विरुद्ध वेस्ट इंडीजमध्ये चौथा एकदिवसीय सामना मुंबईच्या ब्रेबॉन मैदानावर सुरु आहे. या सामन्यात विडींजच्या केमार रोंचने सामन्याचा शंभरावा चेंडू फेकला. तुम्ही म्हणाल असं काय खास होतं या चेंडूमुळे ज्यामुळे हे सारं लिहिण्याचा अट्टाहास केला जातोय. हा चेंडू खासच होता पण फक्त वेस्ट इंडीजसाठी, कारण या चेंडूनं समस्त भारतीयांचं एक स्वप्न तोडलं. विराट कोहली हा चेंडू खेळत होता त्यामुळे काय झालं असेल याचा अंदाज क्रिकेटवेड्यांना नक्कीच आला असेल. इतरांना कळलं नसेल तर खाली सविस्तरपणे हे सांगणारच आहे. 

आपल्याकडे शून्यावर आऊट होणाऱ्या फलंदाजांच्या आणि शतक केलेल्या खेळाडूंच्या बातम्या होतात. विराट कोहली मात्र याला अपवाद आहे, कारण त्याचं शतक चुकल्याच्या बातम्या होतात. हो तुम्ही बरोबर वाचताय, शतक चुकलंय. तेही सलग चौथं… जे विश्वविक्रम करणार होतं. श्रीलंकेच्या संगकाराच्या विक्रमाची बरोबरी करणार होतं. मात्र तो रोंचचा शंभरावा चेंडू आणि विराट कोहली, आठवलं तरी क्रिकेटप्रेमींच्या विशेषतः विराट प्रेमींच्या काळजात धस्स होईल.

नक्की झालं काय?

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये त्यानं शतक झळकावलं होतं. आजच्या सामन्यात शतक झळकावून आणखी एक विक्रम स्वतःच्या नावावर करण्याची संधी विराट कोहलीकडे होती. श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकाराच्या नावावर ४ सलग शतकांचा विश्वविक्रम आहे. आजच्या ब्रेबॉन स्टेडियमवरील सामन्यात शतक झळकावून या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी विराट कोहलीला होती, मात्र ती संधी विराटला साधता आली नाही.

नेमकं काय झालं त्या चेंडूवर?-

११ व्या षटकातील ५ व्या चेंडूवर शिखर धवन ३८ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. विश्वविक्रम करण्याची संधी असल्याने विराटकडे साऱ्यांचं लक्ष होतं. विराटची सुरुवात काही खास झाली नाही. मध्ये त्याने दोन चौकार मारले खरे, मात्र त्याच्यात तो आत्मविश्वास जाणवत नव्हता. १६ वं षटक टाकण्यासाठी रोंच आला तेव्हा भारताची धावसंख्या ९८ धावांवर १ बाद अशी होती. कुणाला माहीत होतं भारतीयांसाठी हे षटक काळजाला चटका लावून जाणारं ठरेल. रोंचच्या पहिल्या ३ चेंडूंचा सामना रोहित शर्माने केला. रोंचने चौथा चेंडू कोहलीला टाकला, हा चेंडू कोहलीच्या बॅटची कड घेऊन विकेटकीपर होपच्या हातात विसावला. विराटनं बाहेरच्या चेंडूला बॅट लावण्याची चूक केली, मात्र होपनं कोणतीही चूक केली नाही. विराट बाद झाला होता, स्टेडियमवर सन्नाटा पसरला होता आणि सोबत चुराडा झाला होता असंख्य भारतीयांच्या स्वप्नांचा जे त्यांनी विराट कोहली या आपल्या कर्णधारासाठी पाहिलं होतं…

आज भारतीयांचं हे स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी विराटसारख्या योद्ध्यासाठी ते फार कठीण नाही. तो काळही फार लांब नाही. पुन्हा भेटूया अशा कोणत्यातरी देशासोबत, अशाच कोणत्यातरी मैदानात… विराट तेव्हा तुम्हाला नक्कीच निराश करणार नाही.