आता गुन्हेगारांची खैर नाही; पुणे ग्रामीण पोलीस दलात आणखी एका दबंग अधिकाऱ्यांची एन्ट्री

पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी चांगलीच बोकाळलेली आहे. एमआयडीसी एरिया, धरणांद्वारे होणारा मुबलक पाणीपुरवठा, ऊस शेती यामुळे या भागातील लोकांच्या हातात चांगला पैसा खळखळू लागला आहे. कंपन्यांमधील कामांवरुन, जमीन खरेदी विक्रीवरुन या भागात नेहमी वाद होत असतात. भाई-दादांची संख्या या भागांमध्ये झपाट्याने वाढली आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी चार्ज घेतल्यानंतर कारवाईचा धडाका सुरु केला त्यामुळे भाई-दादांची बोबडी वळली आहे. अशातच आता सातारा पोलीस दलातील आणखी एका दबंग अधिकाऱ्याची पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याच्या बदलीमुळे या भागातील भाई-दादांची पुरती वाट लागणार असल्याचं बोललं जातंय.

कोण आहे हा दबंग अधिकारी?

पद्माकर भास्करराव घनवट असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. सातारा पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेचा कार्यभार त्यांच्याकडे होता. घनवट यांनी बदली करण्याची विनंती केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून ते पुणे ग्रामीण पोलीस दलात रुजू होत आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात ऑर्डर काढली आहे. 

No automatic alt text available.

घनवट यांच्या टीमची जबरदस्त कामगिरी-

पद्माकर घटवट यांच्या एलसीबी टीमने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. ४२ खून, ३१ दरोडे, फसवणूक, ५८८ जबरी चोरी इतक्या गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांच्या पथकाला यश आले आहे. घनवट यांनी आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ४२ पिस्तुल जप्त केल्या आहेत. मांडूळ चोरीचे ४ गुन्हे देखील त्यांनी उघडकीस आणले आहेत. ५० लाख रुपयांच्या बनावट नोटादेखील त्यांनी जप्त करण्यात यश मिळवलं आहे. 

११ जून २०१४ रोजी पद्माकर घनवट यांनी एलसीबीचा चार्ज घेतला होता. गेल्या ४ वर्षात त्यांनी केलेल्या कामांचा डोंगर थक्क करणारा आहे. साधारणतः पोलीस अधिकाऱ्याची २ वर्षांनंतर बदली होते, मात्र चांगल्या कामामुळे आणि कामाच्या धडाडीमुळे त्यांना कार्यकाळापेक्षा अडीच वर्षे जादा काम करता आले. तपासात असलेल्या धडाडीमुळे अनेक महत्वाच्या केसचा छडा लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

व्यायाम आणि खेळांची विशेष गोडी-

पद्माकर घनवट यांना व्यायाम करण्याची चांगलीच आवड आहे. वय वर्षे ५२ असून घनवट आजही न चुकता मैदानावर येतात. त्यांना धावण्याची आवड आहे. आतापर्यंत त्यांनी १० मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. धावण्यासोबतच त्यांना क्रिकेटचीही चांगलीच आवड आहे. बॅटिंग करुन स्वतः आऊट होण्यापेक्षा बॉलिंग करुन दुसऱ्याला आऊट करणे त्यांना जास्त आवडते. 

पद्माकर घनवट यांच्या बदलीमुळे हूरहूर-

पद्माकर घनवट यांच्या बदलीची माहिती मिळताच त्यांच्या परिचितांमध्ये तसेच सातारा पोलीस दलात एक प्रकारची हूरहूर पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर काही जणांनी पोस्ट लिहून घनवट यांच्या बद्दलच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 

घनवट यांच्याविषयी सोशल मीडियात व्यक्त झालेल्या निवडक प्रतिक्रिया-

१.भाऊसाहेब आसबे यांची प्रतिक्रिया-

पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांची सातारा मधून तब्बल साडेचार वर्षांनी बदली झाली . सातारा मधे एकही माणूस सापडणार नाही ज्यांना पद्माकर घनवट माहीत नाहीत . सेवेत रुजू झाल्यापासून जिथे त्यांनी काम केलं तिथे आपली छाप उमटवली आहे. सुरुवातीला ते मुंबई ला होते . त्या वेळी 1992 ला दंगली झाल्या तेव्हा फ़क्त ते इन चार्ज असणाऱ्या परिसरात दंगली होऊ शकल्या नाहीत अशी नोंद ‘अर्धी मुंबई’ या यूनिक फीचर्स ने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सापडते . 
सातारा मधे आपल्या कार्यकाळात त्यांनी जे अद्वितीय काम केले आहे त्याचे त्यामुळे त्यांच्या परिचितांना आश्चर्य नसेल . 
ते माझ्यासाठी अंकल . मी लहान असताना ते आमच्या शेजारीच रहायचे . तेव्हा अंकल म्हणजे काय चीज आहे याचा अंदाज नव्हता . पण सातारा सोडल्यावर आता वृत्तपत्रात जेव्हा त्यांच्या कामाविषयी वाचले तेव्हा अभिमान वाटला . अंकल तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे आम्ही सुरक्षित आहोत . 
थॅंक यु अंकल . पुणे आपली वाट पाहत आहे. 

 

२.प्रमोद नलावडे यांची प्रतिक्रिया-

आपल्या सातारा मध्ये चांगले काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना नेहमीच आदर सन्मान, पाठींबा मिळाला आहे. सामान्य सातारकर नेहमीच अशा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. पण आज आदरणीय पी आय घनवट सर यांच्या बाबतीत सामान्य सातारकर लोकांच्या प्रतिक्रिया पाहून असे वाटते की श्री. घनवट साहेबांएवढे प्रेम कदाचित अजून कोणालाच मिळाले नाही. या लोकांमधील कित्येक लोकांनी पोलीस स्टेशनची पायरीही चढली नसेल पण सरांच्या सर्वाना आपलेसे करून घेण्याच्या वृत्तीने त्यांनी तमाम सातारकर लोकांची मने निश्चितच जिंकली आहेत. सामान्य समाजमनात पोलिसांच्या बाबतीत असणारी नकारात्मक विचारसरणी पाहता घनवट साहेबांना मिळालेले हे प्रेम एखाद्या ‘मेडल’ पेक्षा तसूभरही कमी आहे असे वाटत नाही. जय हिंद…