तुमच्या लग्नाच्या अल्बममध्ये हिंदी गाणी आहेत का? …तर तुमच्यावर दाखल होऊ शकतो गुन्हा

लग्न म्हणजे आपल्याकडे हौसमौज, मजामस्ती आणि पैशांची उधळण… यामध्ये अनेक गोष्टींना चांगलेच पैसे खर्च होतात. यामध्ये सर्वात जास्त पैसे कोणत्या गोष्टीला खर्च होत असतील तर ती गोष्ट म्हणजे लग्नाच्या व्हीडिओ अल्बमसाठी… आपल्याकडे लग्नाच्या आठवणी साठवून राहाव्या यासाठी लग्नाचा व्हीडिओ अल्बम बनवलाच जातो. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. आता तर प्री वेडिंग शूट नावाचं नवीनच खूळ आलं आहे. सैराट सिनेमाच्या गाण्यांनी या खुळाला बळ दिलं त्यामुळे आता हे खूळ चांगलंच फोफवलं आहे. शहरातच नव्हे तर गावातही लग्नाच्या आधी असे व्हीडिओ बनवण्याचं खूळ आहे. या हिंदी मराठी सिनेमांची गाणी वापरली जातात. लग्नाच्या अल्बममध्येही अशी गाणी वापरली जातात. ज्यांचं लग्न झालंय त्यांच्या अल्बममध्येही अशी गाणी असतील मात्र आता हे तुम्हाला अडचणीत आणू शकतं. अशी गाणी वापरल्यामुळे लोकांवर गुन्हे दाखल होत आहेत. 

नेमकं काय आहे प्रकरण?

टी सिरीज ही भारतातील मोठी म्युझिक कंपनी आहे. हिंदी तसेच देशाच्या प्रादेशिक भाषांमधील अनेक गाण्यांचे हक्क अर्थात कॉपीराईट या कंपनीकडे आहेत. लग्नाच्या अल्बममध्ये आपली गाणी वापरण्यावर या कंपनीने आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारे आमची गाणी वापरणं हा कॉपीराईटचा भंग आहे, असा दावा या कंपनीने केला आहे. कंपनीची गाणी वापरणाऱ्यांवर या कंपनीने गुन्हे दाखल केले आहेत. आणखी जे लोक कंपनीची गाणी वापरतील त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 

शेकडो जणांवर गुन्हे दाखल

टी-सीरिजने आपली गाणी वापरणाऱ्या 100 पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये बहुतांश फोटोग्राफर्सचा समावेश आहे. पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान या राज्यांसह देशातील अनेक ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यात एकट्या हरियाणात 30 दुकानदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. टी सीरिजनं केलेल्या कारवाईमुळे फोटोग्राफर्स हवालदिल झाले आहेत. 

टी सीरिजचं काय म्हणणं आहे?

टी सीरिजची गाणी वापरायची असेल तर परवानगी घ्यावी लागेल. अन्यथा परवानगी न घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकारे व्यावसायिक वापरासाठी गाणी वापरणं हे आमच्या कॉपीराईट्सचं उल्लंघन आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. 

यातून मार्ग काय आहे?

लग्नाच्या अल्बममध्ये टी सीरिजची गाणी न वापरणं हा सर्वात पहिला आणि सोपा मार्ग आहे. त्यानंतर फोटोग्राफर्स असोसिएशननं टी सीरिजसोबत बोलणी सुरु केली आहे. त्यातून तोडगा निघला तर टी सीरिजची गाणी वापरता येऊ शकतात, मात्र सध्याच्या परिस्थितीत तरी ते शक्य होईल, असं दिसत नाही. 

दुसरीकडे दुकानदारांनी आता ग्राहकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करणार नाही. व्हीडिओचा व्यावसायिक वापर करणार नाही, अशा अटी लिहून घेतल्या जात आहेत. आता व्हीडिओ तर बहुतांश सोशल मीडियावर शेअर करण्यासाठीच बनवले जातात त्यामुळे अशा अटी कोण मान्य करणार असा प्रश्न आहे. मात्र तुरुंगाची हवा खाण्याची तयारी असेल तर मात्र टी सीरिजची गाणी वापरण्यास कुणाचीच काही हरकत नसावी.