काही प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत, मात्र नव्याने तुकाराम मुंढे तरी निर्माण होतील का?

तुकाराम मुंढे… सध्या पुन्हा एकदा चर्चेत असलेलं नाव. हे नाव आजच चर्चेत आहे असं नाही. तेे दर काही महिन्यांनी चर्चेत येतं. बातम्यांचा विषय बनतं. तुकाराम मुंढे, प्रामाणिक काम, राजकारण्यांशी पंगा आणि नंतर बदली… हे जणू आता समिकरणच झालं आहे. आता पुन्हा एकदा नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे. त्यांना मंत्रालयातील नियोजन विभागाचे सहसचिव पद देण्यात आलं आहे. नाशिकच्या महापालिका आयुक्तपदाची सूत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे द्या आणि त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारा, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. कर्तव्यनिष्ठपणे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला पुन्हा एकदा मंत्रालयाच्या चार भिंतींच्या आत बंदिस्त केलं जात आहे. 

13 वर्षात 11 वेळा बदल्या-

तुकाराम मुंढे यांची बदली होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आपल्या 13 वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या तब्बल 11 वेळा बदल्या झाल्या आहेत. 2005 साली तुकाराम मुंढे आयएएस झाले. त्यांना पहिल्यांदा सोलापूरचे प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. तिथं त्यांनी 2 वर्षे कार्यभार पाहिला. त्यानंतर सहाय्यक विक्रीकर आयुक्त हे पद सोडता त्यांना कुठेही 2 वर्षापेक्षा अधिक काळ काम करता आलं नाही. नानाविध कारणांमुळे त्यांच्या सातत्याने बदल्या होत राहिल्या. अनेक ठिकाणी तर त्यांना वर्षभरही काम करायला मिळालं नाही. या बदल्यांसाठी प्रामुख्याने त्यांचे राजकारण्यांशी होणारे वादच कारणीभूत ठरले. नाशिकमध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. 

तुकाराम मुंढेंना कुठं किती काळ ठेवलं?

1. सोलापूरचे प्रकल्प अधिकारी (ऑगस्ट 2005 ते ऑगस्ट 2007)

2. नांदेडचे उपजिल्हाधिकारी  (सप्टेंबर 2007 ते डिसेंबर 2007)

3. नागपूर जिल्हा परिषदेचे CEO (जानेवारी 2008 ते मार्च 2009)

4. नाशिकच्या आदिवासी विभागाचे आयुक्त (मार्च 2009 ते जुलै 2009)

5. वाशिमचे जिल्हा परिषदेचे CEO (जुलै 2009 ते मे 2010)

6. मुंबई खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे CEO (जून 2010 ते जून 2011)

7. जालन्याचे जिल्हाधिकारी (जून 2011 ते ऑगस्ट 2012)

8. मुंबई येथे सहाय्यक विक्रीकर आयुक्त (सप्टेंबर 2012 ते नोव्हेंबर 2014)

9. सोलापूरचे जिल्हाधिकारी (नोव्हेंबर 2014 ते एप्रिल 2016)

10. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त (मे 2006 ते मार्च 2017)

11. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष ( मार्च 2017 ते फेब्रुवारी 2018)

12. नाशिक महापालिकेचे आयुक्त (फेब्रुवारी 2018 ते नोव्हेबर 2018)

Related image

राजकारण्यांसोबत वाद हेच बदलीचं कारण!-

तुकाराम मुंढे यांच्या नावापुढे सध्या कर्तव्यदक्ष असं विशेषण लावलं जातं. तुकाराम मुंढेंच्या कामाची कार्यपद्धती यामुळे त्यांच्या नावापुढे हे विशेषण लावलं जातं. ही खासियतच तुकाराम मुंढेंच्या अडचणीचा विषय बनली. याच खासियतमुळे त्यांना वारंवार बदल्यांचा सामना करावा लागला. ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी नियामानूसार काम करायचं, कामामध्ये धडाडी ठेवायची हे त्यांचं गुणवैशिष्ट्य राहिलं, मात्र नियम मोडायलाच असतात अशी धारणा असलेल्या आपल्या देशात हे अनेकांच्या अडचणीचं ठरलं. विशेषतः रोजच तुकाराम मुंढेंच्या तोंडावर तोंड असलेल्या राजकारण्यांच्या… राजकारण्यांच्या अनेक कामांमध्ये तुकाराम मुंढे आडकाठी ठरु लागले. अनेक ठिकाणी राजकारणी आणि तुकाराम मुंढे यांच्यात संघर्ष होऊ लागला. परिणामी राजकीय वजन वापरुन तुकाराम मुंढे यांची बदली हेच प्रत्येक ठिकाणी घडू लागलं. नाशिकसुद्धा त्याला अपवाद ठरलं नाही. करवाढीच्या आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरुन इथं पहिल्यांदा राजकारणी विरुद्ध तुकाराम मुंढे संघर्ष पेटला आणि तो पुढे वाढतच गेला आणि त्याचा शेवट ठरल्याप्रमाणे तुकाराम मुंढे यांच्या बदलीत झाला. 

लोक मात्र तुकाराम मुंढेंच्या पाठिशी-

Image result for तुकाराम मुंढे

राजकारणी आणि तुकाराम मुंढे संघर्षात प्रत्येक वेळी सरशी भलेही राजकारण्यांची झाली असेल, मात्र लोक नेहमी तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांची बदली होऊ नये यासाठी अनेक शहरांमध्ये जनआंदोलनं झाली आहेत. लोक तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले आहेत. आम्हाला अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेच हवेत अशा मागण्या झाल्या आहेत. एवढंच नव्हे तर एका शहरातून बदली झाल्यास दुसऱ्या शहरातील लोकांनी तुकाराम मुंढेंना आमच्या शहरात अधिकारी म्हणून पाठवा, अशी मागणी देखील केली आहे. आजही अशी मागणी करणारे लोक अनेक शहरांमध्ये आहेत. नाशिकच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याची बातमी जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा त्यांची उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळे अनेक उस्मानाबादकरांना आनंद झाला होता तर राजकारण्यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता होती. 

तुकाराम मुंढे या साऱ्याकडे कसं पाहतात?-

तुकाराम मुंढे यांची बदली झाली तर त्यांनी ती प्रत्येक वेळी स्वीकारली आहे. आपल्या बदलीवर फारसं बोलण्यात त्यांनी वेळ घालवला नाही. प्रत्येक वेळी बदली होताच नव्या ठिकाणी लगेच रुजू होणं आणि आपल्या कामाची तीच धडाडी कायम ठेवणं यातच त्यांनी स्वारस्य मानलं आहे. आता मात्र या साऱ्याचा आपल्या कुटुंबावर परिणाम होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आहे. काही महिन्यांमध्ये नव्या ठिकाणी बदली या साऱ्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाला भोगावा लागत आहे. 

Image result for तुकाराम मुंढे

“वारंवार होणाऱ्या बदल्यामुळे कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो. मुलांना सतत शाळा बदलाव्या लागतात. त्यांमुळे त्यांना एका ठिकाणी स्थिरावता येत नाही. माझ्या बदलीचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होणार नाही याची मी काळजी घेईन- तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली झाल्यामुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या धैर्याचं काय होत असेल?, नियमावर बोट ठेवून त्यांना राजकारण्यांचा सामना करता येत असेल का? की त्यांनाही बदलीच्या भीतीने राजकारण्यांच्या हो ला हो म्हणावे लागत असेल??? हे सारे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे कदाचित आपल्याला मिळणार नाहीत, मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नव्याने तुकाराम मुंढेसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण होणार नाहीत. 

-कृष्णा सुनील वर्पे ( लेखक ‘थोडक्यात’ आणि ‘सविस्तर’चे संस्थापक आहेत. )