ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकरांना ‘गावाकडच्या माणसा’चं पत्र

प्रति,

मा. निवृत्ती महाराज देशमुख – इंदुरीकर

नमस्कार,

आपली प्रवचने इतकी प्रबोधनपर असतात की त्याला तोड नाही. त्याची जाणीव तुम्हालाही आहेच. नाहीतर ‘मी एवढा पैसा कमावतो’ हे तुम्ही उघडपणे सांगितले नसते. साध्या समाजाला त्याच्याच भाषेत खडसावणे तुम्हाला चांगलेच जमते. कर्ते पुरुष, म्हातारी माणसं, तरुण, तरुणी कोणीही तुमच्या तडाख्यातून सुटत नाही. आता परिस्थिती इतकी आली आहे की तुम्ही शालजोडीतले हाणण्यापेक्षा खरोखरच मारले तरीही लोक हसतील, सुधारणा करतील. अगदी नाही म्हटले तरी हजार श्रोत्यांमधून एक जरी सुधारला तरी ते श्रेय मोठे असेल.

व्यसने, दारू, चालीरीती, गैरसमज, काडीमोड अशा अनेकानेक विषयांवर तुम्ही बोलत असता. त्यातून प्रबोधन अपरिहार्य आहे. फक्त त्याची आकडेवारी जमा करण्याची तसदी कुणी घेणार नाही. कारण? अहो, कारण असे की तुम्ही राजकारणी नाही आणि राजकारण्याला धरूनही नाही. तुमचा आपला ‘वन मॅन शो’ आहे. तुमचे बोलणे हडसून, खडसून असते. फक्त त्याला विनोदाची झालर असते. ती कला तुम्हाला साध्य झाली आहे. गंभीर मुखवट्याने प्रवचने करणारे कित्येक आहेत.

असो, तुम्हाला अधिकाधिक जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे बळ मिळावे, हीच अपेक्षा. तुकाराम, ज्ञानेश्वर जाऊ देत पण अलीकडच्या गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या आसपास जरी पोहोचलात तरीही तुम्ही आणि आम्हीसुद्धा धन्य होऊ…

शुभेच्छा!

 

आपलाच, 

गोपाळ बाळू गुंड

( लेखक ‘आडतास’ या ग्रामीण व्यक्तीसंग्रहाचे लेखक आहेत )