साताऱ्याच्या हवेत पुन्हा मनोमिलनाचे वारे; दोन्ही राजे खरंच एकत्र येणार का?

सातारा विधानसभा मतदारसंघाचं राजकारण खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भोवती फिरत असतं. सातारा नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी सुरु झालेलं मनोमिलन २०१६ च्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत तुटलं, आता पुन्हा सातारच्या हवेत मनोमिलनाचे वारे वाहू लागले आहेत. त्याचे पडसाद सातारा नगरपालिका सभेत उमटले. नगर विकास आघाडीचे नगरसेवक बाळु उर्फ विनोद खंदारे यांनी ही मागणी सर्वसाधारण सभेत करुन मनोमिलनाच्या दिशेने वाट मोकळी केली आहे. मनोमिलनाची भाषा करणाराचा बोलवीता धनी कोण? अशीही कुजबुज सातारा येथे सुरू आहे

कोण आहेत बाळु उर्फ विनोद खंदारे???

बाळु उर्फ विनोद खंदारे हे नगरविकास आघाडीच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यांनी निवडणुकीत तत्कालीन नगराध्यक्ष विजय बडेकर यांचा पराभव केला होता. ते सातारा नगरपालिकेत एलईडी बल्बच्या वेषात बैठकीत गेले होते. वर्षभरापुर्वी झालेल्या सुरुची राडा प्रकरणात बाळू खंदारे उदयनराजेंच्या विरोधात आक्रमक होते. सुरुची राडा प्रकरणानंतर बाळू खंदारे कैदेत होते.

खंदारेंनी मनोमिलनाची मागणी केल्याने आश्चर्य-

मनोमिलन व्हावे, दोन्हीही राजांनी एकत्र व्हावे यासाठी खंदारे यांनी मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, कारण नगरपालिकेत नगर विकास आघाडीतील आक्रमक चेहरा अशी खंदारे यांची प्रतिमा निर्माण झाली होती. सुरुची राडा प्रकरणात उदयनराजेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या बाळू खंदारेंनी महाराज एक व्हा, अशी भूमिका कशी काय घेतली अशीच चर्चा सातारकर नागरिकांमध्ये आहे.

दोन्हीही आघाड्यांना वाटते मनोमिलन व्हावे-

नगरपालिकेत तिसऱ्या आघाडीला सत्तेत प्रवेश मिळू नये म्हणून याआधी मनोमिलन झाले होते. मनोमिलन सातारा पंचायत समितीत आणि सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकामध्ये होते. सविआचे नगरसेवक माजी नगराध्यक्ष निशांत पाटील यांनीही मनोमिलन व्हावे वाटते, असं म्हटलं आहे.

पुन्हा मनोमिलन होईल का ?

सातारा विधानसभा मतदारसंघातून सामान्य माणसाला आमदार करणार, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी जाहीर केली आहे तर शिवेंद्रसिंहराजे भोसले ही उदयनराजेना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याच्या विरोधात वारंवार बोलत आहेत. सातारा शहरात भाजपची ताकद वाढत असून आता भाजपचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. मनोमिलन झाले तर भाजपच्या वाढत्या ताकदिला शह देता येवू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. जर दोन्ही बाजूंनी पुढाकार घेतला तर हे मनोमिलन लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच होईल अशी शक्यता आहे. राजघराण्याशी जवळून संबंध असलेल्यांनी आता यासंदर्भात प्रयत्न सुरु केले आहेत. 

-युवराज जाधव ( लेखक पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत )