राज ठाकरे यांच्या भाषणातील सर्व प्रमुख मुद्दे एकाच ठिकाणी…

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी भाषण करताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. आपण याठिकाणी स्पष्टीकरण द्यायला नव्हे तर भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलो आहे, असं त्यांनी पहिल्यांदाच स्पष्ट केलं. मी मराठीत बोलतो त्यामुळे हिंदी भाषिकांचा गैरसमज होतो त्यामुळे आज मी हिंदीत बोलणार आहे. हे माझं पहिलंच हिंदी भाषण आहे, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या भाषणाच्या पूर्वी उत्तर भारतीयांनी त्यांचं खास आदरातिथ्य केलं. त्यांना शिवराज्याभिषेक प्रतिमा आणि तलवार भेट देण्यात आली. 

राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-

-मुंबईतल्या उत्तर भारतीयांसाठी बोलायचं असतं, तर मराठीतून बोललो असतो, पण भाषण बिहार, उत्तर प्रदेशात दाखवलं जाणार असल्यामुळे हिंदीत बोलतोय

-हिंदी भाषा चांगली आहे, पण हिंदी राष्ट्र भाषा आहे हे चुकीचं आहे, कारण राष्ट्रभाषेचा निर्णय कधी झालाच नाही

-मला तुमच्या लोकांना काही गोष्टी समजून सांगायच्या आहेत, त्यामुळे हिंदीतून बोलणार आहे

-जर तुम्हाला एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जात असाल, तर अगोदर पोलीस स्टेशनमध्ये सगळी माहिती द्यावी लागते, कायद्यातच याची तरतूद आहे

-मला कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही, माझी भूमिका जी होती, ती फक्त हिंदीत सांगायला आलोय

-महाराष्ट्राच्या भूमीपूत्रांना रोजगारात प्राधान्य मिळावं यात चूक काय? यूपीत रोजगार असेल तर त्यांनाच प्राधान्य मिळेल

-भारत हा युरोपसारखा, ज्याला आपण राज्य म्हणतो तो एक-एक देश आहे, त्यालाच आपण भारत म्हणतो, तुमच्यासाठी उद्योग न आणू शकणाऱ्या यूपी-बिहारच्या राजकारण्यांची चूक आहे

-या देशात जेवढे पंतप्रधान झाले, त्यातले 70-80 टक्के यूपीतले आहेत, मोदींचाही मतदारसंघ वाराणसी आहे

-राज्यात माझ्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना प्राधान्य मिळावं, कोणत्याही राज्यात जाता तेव्हा त्या राज्यातील भाषा शिकावी, परदेशात जाता तेव्हा हिंदीत बोलता का?

-महाराष्ट्रात जे झालं, ते देशात वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं, इतर राज्यातलं दिसत नाही का?

-महाराष्ट्रात तर काहीच झालं नाही, आसाममध्ये बिहारच्या तरुणाचं मुंडकं कापलं होतं, बिहारी हटाओ आंदोलन तिथे झालं, पण त्याविषयी कुणी काही बोललं नाही

-महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीच्या जाहिराती यूपी आणि बिहारमध्ये आल्या, महाराष्ट्रात का नाही? तिथले सगळे मुलं इथे आले, मग महाराष्ट्रात या भरतीची माहिती का होऊ दिली नाही?

-महाराष्ट्रात रोजगार असेल, तर तो मराठी माणसालाच मिळाला पाहिजे, ही मागणी केल्यानंतर संबंधितांनी जी भाषा वापरली त्यानंतर काय करायचं होतं? आरती करायची का?

-तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा लोक मारहाण करतात, अपमानास्पद वागणूक मिळते, याचा सवाल कधी यूपी, बिहारच्या नेत्यांना विचारणार नाहीत का?

-मुंबईतल्या उत्तर भारतीयांच्या नेत्यांनी जी आग लावली, त्यानंतर संघर्ष सुरु झाला

-उद्योग यूपी, बिहारमध्येही जावेत, तिथेही रोजगार मिळावेत, पण तिथून निघतात आणि इथे मुंबईत येतात, यूपी, बिहार आणि झारखंडमधून मुंबईत दररोज 38 ट्रेन भरून येतात आणि रिकाम्या जातात

-प्रत्येक शहराची एक क्षमता असते, इथे मुलांना अॅडमिशन मिळत नाहीत, फुटपाथवार चालायला जागा नाही, फक्त लोकसंख्या वाढतेय, महाराष्ट्र पोलिसांचा सर्वात जास्त वेळ कुठे जातो हे त्यांना विचारा, यूपी, बिहार, झारखंडच्या सीमेवर सर्वाधिक चौकशी सुरु

-हाराष्ट्रात अशी परिस्थिती नव्हती, पण 1995 ला झोपडपट्टीवाल्यांना मोफत घर ही योजना आली आणि फुकट घरांसाठी जास्त लोकसंख्या आली

-बाहेरुन कुणीही येतो आणि टॅक्सी चालवता चालवता आमच्या आई-बहिणींना शिव्या देतात, आम्ही सहन करणार नाही, महाराष्ट्रातील मुस्लीम राहतात तिथे दंगली कधीही होत नाहीत

-आझाद मैदानातील मोर्चात जो प्रकार झाला होता, त्यात बाहेरुन आलेले मुस्लीम होते, हेच तुमच्या यूपी किंवा बिहारमध्ये झालं तर काय कराल?

-60 च्या दशकात मुंबईत दक्षिण भारतीयांविरोधात संघर्ष झाला होता, पण त्यांच्या नेत्यांनी उद्योग आणले आणि त्यांचं मुंबईत येणं बंद झालं

-महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार नाही आणि बाहेरुन आलेल्यांना कामं मिळत असतील तर संघर्ष होणार की नाही हे तुम्हीच सांगा

-मी इथे जे बोलतो, ते दिल्लीतून वेगळं दाखवलं जातं, टीआरपीसाठी राज्या-राज्यांमध्ये संघर्ष पेटवला जातोय

-अमिताभ बच्चन यांच्यासारख्या व्यक्तीला जन्मभूमीविषयी एवढं प्रेम असेल तर राज ठाकरेला विरोध का? हीच माझी भूमिका होती आणि हीच भूमिका असेल