फेक न्यूज – ट्रम्प ते मोदी; तुम्ही आणि आम्ही…

खरे पाहता फेक न्यूज किंवा चुकीची किंवा दिशाभूल करणारी बातमी याची मुळे आपल्याला मागच्या तीन ते चार वर्षात डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक अन् त्यांनी बरोबर म्हणून वापरलेलं चुकीचे संदर्भ यामध्ये सापडतील. अमेरिकेसारख्या अतिशय स्वातंत्र्यप्रिय लोकशाही राष्ट्रामध्ये फेक न्यूज ही संस्थात्मक पातळीवरून खाजगी पातळीवर आली असून यामुळे देशाच्या प्रतिभेला धोका निर्माण झाला असल्याचे आपल्याला दिसून येते. फेक न्यूजचा इतिहास पाहताना आपल्याला फार इतिहास उकरून काढावा लागत नाही.

साधारण सन २००२ च्या सुमारास अमेरिकन प्रसारमाध्यमे ही एकसुरात इराककडे मानवी अस्तिवास धोका निर्माण करणारी अस्त्रे आहेत, अशा बातम्या कोणत्याही तथ्यांविना केवळ पेंटागोनच्या हवाल्याने प्रसिद्ध करत होती. हे सर्व इतकं शिस्तबद्ध होतं की यामुळे अमेरिकन जनमत इराकवर युद्ध करण्यासाठी अनुकूल केलं गेलं. हे जनमत तयार करण्यासाठी खोट्या माहितीचा वक्तव्यांचा आधार घेतला गेला अन त्याला वारेमाप प्रसिद्धी देण्यात आली. पेंटागोनने प्रोपौगंडा हा सिद्धांत वापरला. प्रपोगंडा हा मास कम्युनिकेशन मधील सिद्धांत अर्धसत्य, दिशाभूल करणारी मतं, अन स्वहितासाठी खोटी माहिती याचा पुरस्कार करतो.

खरे पाहिल्यास कोणत्याही राष्ट्रात जेव्हा राज्यकारभार हा लोकांनी निवडून दिलेल्या लोकांमार्फत चालत असतो, तेव्हा लोकांना सत्यता जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. अशाप्रकारे शेवटी जगविख्यात वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्सने 2004 साली इराक युद्धाच्याप्रसंगी चुकीचं वार्तांकन केल्याबद्दल अन् दिशाभूल केल्याबद्दल जनतेची माफी मागितली.

जनसंवादाची साधने मर्यादित अन अधिक केंद्रित असल्याने खोट्याचा प्रसार हा केंद्रित होता. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. भांडवलाचे अमर्याद चलनवलन अन् तंत्रज्ञान यामुळे माहितीचे स्रोत हे देखील विकेंद्रित झाले आहेत अन् माहिती पाठवणारा व्यक्ती हा खऱ्या अर्थाने माहितीवर अधिराज्य गाजवणारा घटक बनला आहे.

डोनाल्ड ट्रम्प, भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक माध्यमांना फाटा देऊन, तंत्रज्ञानाच्या मदतीने उगम पावलेल्या समाजमाध्यमांच्या जोरावर आपले स्थान अढळ केले आहे. यामुळे थेट नेता ते वाचक असा संबंध प्रस्थपित झाल्याने त्याला वैयक्तिक मर्यादा आल्या आहेत. खरं खोटं याची शहानिशा करण्यासाठी कोणतेही प्रमाण उपलब्ध नाही. यामुळे हवा तो अर्थ काढायला वाचक मोकळा आहे. इथे खऱ्या अर्थाने आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला आव्हान उभे राहत आहे.

गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी लष्करप्रमुख अन् पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव यामध्ये महत्वपूर्ण बैठक झाल्याचे पालनपुरच्या प्रचारसभेत सांगितले. याचा व्हायचा तो परिणाम झाला. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी या बैठकीची शहानिशा न करता बातम्या दिल्या अन् देशातील वातावरण कलुषित केले. प्रचाराच्या शेवटच्या घडीमध्ये अशा फेक न्यूज पेरल्या गेल्या. हे काम देशाच्या सर्वोच्च नेत्याने केले.

काही दिवसांनी जेव्हा काँग्रेसने राज्यसभा बंद पाडली तेव्ह देशाला मनमोहन सिंह यांच्या एकनिष्ठतेबद्दल कोणतेही शंका नाही, सरकारने असे राज्यसभेत जाहीर केले. परंतु त्याचा परिणाम अगोदरच झाला होता. भाजपला थोड्या फरकाने विजय मिळाला. परंतु आजही मनमोहन सिंह यांच्याविषयी असलेलं मत किंवा बातम्या तशाच आहेत.

देशाचा पंतप्रधान जर अशा प्रकारची वक्तव्ये करून फेक न्यूजचे उद्गाते ठरत असतील तर जमिनीवर फार वेगळी परिस्थिती नसावी. प्रसिद्धीमाध्यमे केवळ एखाद्या व्यक्तीच्या बोलांवर विश्वास ठेवणारी असतील तर त्या देशातील स्वतंत्रता अस्तिगत होत आहे याचे भान ठेवावे.

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी अशाच बातम्या समाजमाध्यमांमध्ये पसरल्याने काही निष्पाप लोकांचा बळी गेला. अशा वेळी खोटी बातम्या ओळखण्यासाठीचे तंत्रज्ञान अन् विवेकबुद्धी यांचा समन्वय घालणे आवश्यक आहे. फेक न्यूजचा विळखा हा विकेंद्रित झाला आहे हाच सर्वात मोठा धोका आहे.

 -प्रा. शेखर पायगुडे ( लेखक एमआयटी विद्यापीठात पत्रकारितेचे प्राध्यापक आहेत )