शिवरायांची कीर्ती बेफाम; भल्याभल्या बॉलिवूडवाल्यांना आवरेना मोह

छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात महाराजांबद्दल अपार आदर आहे, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असेना. आजवर आपल्या स्वार्थासाठी अनेकांनी महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. यामध्ये राजकारण्यांचा वाटा मोठा आहे. अनेक राजकीय पक्षांनी महाराजांचं नाव वापरुन आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. आता सिनेमांमध्ये देखील हा प्रकार शिरल्याचं पहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांचा उल्लेख सिनेमांमध्ये येणं भूषणावहच आहे, मात्र त्यांच्याबद्दल आदर असलेला प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून तर हे सुरु नाही ना?, अशा शंकेला वाव आहे. अलिकडच्या दोन उदाहरणांवरुन हे प्रकर्षाने समोर आलं आहे. 

‘माणिकर्णिका’च्या ट्रेलरमध्ये महाराज-

झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका नावाचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री कंगणा राणावतने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली असून ती राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या ट्रेलरची तर चर्चा झालीच मात्र यापेक्षा जास्त चर्चा झाली या ट्रेलरमधील एका डायलॉगची. हा डायलॉग अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांवर होता.

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुनर्स्थापित करु, असं झाशीची राणी लक्ष्मीबाई एका दृश्यात म्हणत असल्याचं दिसत आहे. मराठी माणसांच्या अंगावर या एका दृश्यानं काटा आल्याशिवाय राहात नाही. मणिकर्णिकाचा ट्रेलर तुफान हीट झाला आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये दीड कोटीपेक्षा जास्त वेळा हा ट्रेलर पाहिला गेला आहे.  ट्रेलर तर हीट झालाच आता शिवरायांना माणणारा हाच प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी केल्याशिवाय राहणार नाही. 

पाहा झाशीच्या राणीचा ट्रेलर-

सिनेमाच्या पत्रकार परिषदेतही शिवाजी महाराज-

मणिकर्णिका सिनेमाच्या पत्रकार परिषदेतही हा प्रकार पहायला मिळाला. पत्रकार परिषदेसाठी उभारलेल्या खास स्टेजवर महाराजांचा अश्वारुढ पुतळा ठेवण्यात आला होता. अभिनेत्री कंगणा राणावतने या पुतळ्यांवर गुलाबपुष्पांचा वर्षाव केला.

आता सिम्बाच्या गाण्यात शिवाजी महाराज-

रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधल्या हुशार दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक आहे. अभिनेता रणवीर सिंग आणि सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खानची भूमिका असलेला त्याचा सिम्बा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी त्याच्या गाड्या उडवणाऱ्या सिनेमांसाठी ओळखला जातो. हा सिनेमा त्याच कॅटेगरीतला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये त्याने याचा प्रत्यय दिला आहे. कलरफूल दृश्यांचा तर त्याच्या सिनेमात नुसता खच असतो. हा सिनेमाही त्याला अपवाद ठरला नाही. प्रेक्षकांची नस पकडायला रोहित शेट्टीला नेमकं जमतं. गोलमालची सीरिज असो नाहीतर सिंघम… सिंघममध्ये त्याने मराठमोळ्या बाजीरावचं पात्र घेतलं होतं. आता सिम्बातही त्याच पठडीचा वापर करण्यात आला आहे.

सिम्बा सिनेमाचं एक गाणं नुकतंच यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘आला रे आला सिम्बा आला’ असं या गाण्याचं शिर्षक आहे. रोहित शेट्टीच्या इतर गाण्यांप्रमाणे हे गाणं एकदम कलरफूल आहे. गाण्यात रंगबेरंगी नऊवारी नेसलेल्या मराठी स्त्रिया दाखवण्यात आल्या आहेत. गाण्याच्या शेवटी एक दृश्यं प्रेक्षकांचं लक्ष वेधल्याशिवाय राहात नाही. रणवीर सिंगसोबत नाचणाऱ्या स्त्रिया जेव्हा त्याला उचलून वर फेकतात तेव्हा त्याच्या पाठीमागे शिवरायांचा अश्वारुढ पुतळा दाखवण्यात आला आहे. 

सिम्बा सिनेमातील हेच ते गाणं-

खरंच आदर की प्रेक्षक खेचण्यासाठी वापर?-

बॉलिवूडवाल्यांना आपल्या सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करण्याचा मोह अनावर होतो ही खरंच भूषणावह गोष्ट आहे. मात्र शिवाजी महाराजांबद्दल आदर असल्यामुळे अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये शिवरायांच्या प्रतिकांचा वापर केला जातो की प्रेक्षक खेचण्यासाठी हा खरा प्रश्न आहे. 

कथेची गरज म्हणून तो वापर येत असेल तर ते फारसं डोळ्यांना खटकत नाही. मात्र अनेक ठिकाणी कथेची गरज नसताना त्या दृश्यांमध्ये शिवाजी महाराजांना दाखवलं जातं. राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका सिनेमात कथेचा भाग म्हणून संबंधित डायलॉग त्यात मिसळून जातो, मात्र सिम्बा सारख्या सिनेमांमध्ये तो जाणूनबुजून वापरला जातो, असं वाटत राहतं. हे दोनच सिनेमे नाहीत तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या प्रतिमा सिनेमात वापरल्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. मात्र हा वापर अलिकडच्या काळात वाढला आहे. अशा प्रकारे शिवरायांची प्रतिकं वापरण्याला कुणाची हरकत नसावी, मात्र महाराजांच्या नावाचा गैरवापर होऊ नये हे सर्वांनाच अभिप्रेत असावं.

-कृष्णा सुनील वर्पे ( लेखक ‘थोडक्यात’ न्यूज पोर्टलचे संपादक आहेत )