ज्यांच्या विरोधात उभं राहण्यास शरद पवार धजावले नाहीत, त्यांच्या पुढे ‘राष्ट्रवादी’चं कोण टिकणार?

राजकीय पटलावर घडणाऱ्या काही घडामोडी तुम्ही खऱ्या माना किंवा खोट्या, मात्र या घडामोडींची चर्चा नेहमी होतच राहते. शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अशीच एक घडामोड म्हणजे 2009 सालची लोकसभा निवडणूक… लेखाचं शिर्षक त्याच निवडणुकीमध्ये घडलेल्या एका घटनेच्या चर्चेचा भाग आहे. जी चर्चा आजही या मतदारसंघातच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही चवीने चघळली जाते.

2009 सालच्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं नक्की झालं होतं. सुप्रिया सुळे खासदारकी लढवणार होत्या. मुलीसाठी धोका पत्करण्याची शरद पवार यांची तयारी नव्हती. त्यांनी स्वतःचा बारामती मतदारसंघ सुप्रिया सुळे यांच्यासाठी सोडला आणि स्वतःसाठी नव्या मतदारसंघाची चाचपणी सुरु केली. 

Related image

नुकतीच मतदारसंघांची पुनर्रचना झाली होती. बारामती मतदारसंघाचा काही भाग खेड मतदारसंघाला जोडून नवा शिरुर लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला होता. शरद पवार यांच्या दृष्टीने सोईचा असलेला हा मतदारसंघ होता. मात्र या मतदारसंघात त्यांना सामना करावा लागणार होता शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा. शिवाजीराव खेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार होते आणि याच खेडला काही भाग बारामतीचा जोडून शिरुर मतदारसंघ तयार झाला होता. आढळरावांची खासदारकीची 5 वर्षे नुकतीच पूर्ण झाली होती. जुन्या मतदारसंघात तर त्यांची क्रेझ होतीच, मात्र नव्याने जोडलेल्या भागातही त्यांनी अत्यंत कमी दिवसांमध्ये व्यापक जनसंपर्क तयार केला होता. गावागावांमध्ये शिवसेनेच्या शाखा उघडल्या होत्या. खुद्द शरद पवारांना आढळरावांच्या वाढत्या लोकप्रियतेचा चांगलाच प्रत्यय असावा. या निवडणुकीत आढळरावांच्या विरोधात शरद पवार उभे राहिले असते तर त्यांचा पराभव झाला असता असं नाही, मात्र विजय मिळवण्यासाठी शरद पवारांनाही संघर्ष करावा लागला असता. शिरुरमध्ये शरद पवारांचा वेळ गेला असता. परिणामी राज्यात प्रचार करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नसता. अखेर शरद पवारांनी शेवटच्या क्षणी सोलापुरातील माढ्याची निवड केली.

2009 सालच्या या प्रसंगाची आज चर्चा होण्याचं कारण म्हणजे नुकतीच होऊ घातलेली लोकसभा निवडणूक. एकेकाळी राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या या भागावर शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांनी सलग 15 वर्षे मांड ठोकली आहे. ना आढळरावांनी ती काढली, ना राष्ट्रवादीवाल्या कुणाला ती काढायला जमली. आता लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तशा अनेकांनी ‘मीच खासदार होणार’ अशा आरोळ्या ठोकायला सुरुवात केली आहे. मात्र यातील किती जणांमध्ये आढळरावांना हरवण्याची क्षमता आहे, हा मोठा प्रश्नच आहे. 

खरंतर शिवाजीराव आढळराव पाटील मुळात राजकारणी नव्हतेच. त्यांचा पिंड उद्योजकाचा. मुंबईत रहायला असलेल्या आढळरावांची ओळख संगणक क्षेत्रातील अग्रगण्य उद्योजक अशी होती. राष्ट्रवादीचे बडे नेते दिलीप वळसे-पाटील यांचे ते मित्र होते, त्यांनीच आढळरावांना राजकारणात आणलं. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे पहिले चेअरमन होण्याचा मान त्यांना मिळाला. 

Image result for Sharad Pawar Adhalrao

2004 साल शिवाजीराव आढळराव-पाटलांसाठी गेम चेंजर ठरलं. तेव्हाच्या खेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. खुद्द शरद पवार यांची आढळरावांच्या नावाला सहमती होती, मात्र ज्या दिलीप वळसे-पाटलांनी आढळरावांना राजकारणात आणलं होतं त्यांचाच या नावाला विरोध होता, अशी आजही चर्चा आहे. परिणामी ऐनवेळी शिवाजीराव आढळरावांचा पत्ता कट करण्यात आला. आढळरावांनी पहिला तर कारखान्याच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आणि तडक मातोश्री गाठली. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवण्यास धडपडणाऱ्या शिवसेनेसाठी ही संधीच होती. शिवाजीराव आढळराव पाटील धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढणार, हे तेव्हाच नक्की झालं. 

2004 सालच्या खासदारकीला शिवाजीराव आढळराव केवळ ईर्षेनं उभे राहिले होते. आपण निवडून येणार नाही, असं त्यांना वाटत होतं. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी हे बोलून दाखवलं आहे. मात्र राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून 20 हजाराच्या मताधिक्क्याने ते निवडून आले. 2009 सालापर्यंत आढळरावांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. यावर्षी स्वतः शरद पवार त्यांच्या विरोधात उभे राहिले नाहीत. विलास लांडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत आढळवारांनी राष्ट्रवादीपेक्षा 1 लाख 78 हजार मतं जास्त घेतली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तर राष्ट्रवादीकडे आढळरावांच्या विरोधात उमेदवारच नव्हता. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन देवदत्त निकम यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. निकमांना फक्त ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा अनुभव असल्याची टीका त्यावेळी त्यांच्यावर झाली. निकाल लागला तेव्हा राष्ट्रवादीने सपाटून मार खाल्ला होता. राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा आढळरावांनी 3 लाख 1 हजार मतं जास्त घेतली होती. आढळराव फॅक्टर प्लस मोदी लाट यांचा हा परिणाम होता. 

10308062_824191960944057_2797217580040961417_n

शिरुर लोकसभा मतदारसंघाची एक खासियत नेहमी सांगितली जाते. आमदारकीला जे लोक राष्ट्रवादीला मतदान करतात तेच लोक खासदारकीला शिवसेनेला मत देतात. या मतदारसंघातल्या सगळ्यांनाच आता हे तोंडपाठ झालं आहे. आंबेगावचे आमदार आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे-पाटील देखील शिरुर लोकसभा मतदारसंघातूनच येतात. मात्र त्यांनीही कधी आढळरावांच्या विरोधात उभं राहण्याची हिम्मत दाखवली नाही. आढळरावांची लोकप्रियता हे त्यामागचं कारण सांगितलं जातं. कधीकधी तर ही कृष्ण-सुदाम्याची जोडी असल्याची चर्चाही रंगते. दोघांनी ठरवून घेतलंय, खासदारकी एकाची तर आमदारकी दुसऱ्याची… तशा या फक्त चर्चा आहेत, काय खरं काय खोटं? ते या दोन्ही नेत्यांशिवाय कोणही नेमकेपणानं सांगू शकत नाही.

एकेकाळी शिरुर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. शिरुरमधील 6  पैकी 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार होते. राज्याच्या राजकारणात जसे राष्ट्रवादीचे सवते सुभे प्रकर्षानं जाणवतात, तसेच सवते सुभे इथल्या राष्ट्रवादीवाल्याचे होते. राज्याच्या राजकारणातून जशी राष्ट्रवादीची सद्दी संपत गेली तसा शिरुरमधला राष्ट्रवादीचा प्रभाव कमी होत गेला. या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर आजही राष्ट्रवादीची सद्दी आहे हीच काय ती राष्ट्रवादीसाठी जमेची बाब. आता शिरुरमधली आढळरावांची सद्दी संपवायची असेल तर राष्ट्रवादीकडे दोनच पर्याय आहेत, एक म्हणजे अधेमधे चर्चा होतात तसं आढळरावांनाच राष्ट्रवादीत आणायचं. नाहीतर आढळरावांच्या तोडीस तोड उमेदवार देऊन गटतट विसरुन लढायचं… यातलं काही झालं नाही तर नेहमीप्रमाणे शिरुरमध्ये राष्ट्रवादीचं पानिपत ठरलेलं… 

 ‘कोणत्याही परिस्थितीत विजय… कोणत्याही दहशतीची पर्वा न करता… लढा कितीही प्रदीर्घ आणि मार्ग कितीही खडतर असला तरीही विजय हवाच. कारण एकच, विजयाशिवाय तरणोपाय नाही…’

2014 सालची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर विस्टन चर्चिल यांचं हे वाक्य आढळराव पाटील यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. तेव्हा या वाक्याची त्यांना किती गरज होती माहीत नाही, मात्र येत्या निवडणुकीत त्यांना या वाक्याची गरज पडेल असं चित्र आहे. वर सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीकडे आढळरावांना टक्कर देईल असा एकही उमेदवार नाही, मात्र शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपनं शिवसेनेच्या या गडाला खिंडार पाडण्याची तयारी सुरु केली आहे.

Image may contain: 2 people, people smiling, people standing, beard and text

( सोशल मीडियावर झळकत असलेले पोस्टर्स )

पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि आता भाजपला पाठिंबा देणारे आमदार महेश लांडगे यांनी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. पालकमंत्री गिरीश बापट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यांना पाठबळ असल्याचं सांगितलं जातं. आत्ताच महेश लांडगे यांच्या नावापुढे भावी खासदार असलेले अनेक बोर्ड पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लागलेले दिसतात. आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली नाही तर आढळरावांना राष्ट्रवादीसोबतच भाजपच्या उमेदवाराचाही सामना करावा लागणार आहे. अर्थात महेश लांडगे यांच्यासाठी ही लढत वाटती तेवढी नक्कीच सोप्पी नाही, मात्र आढळरावांना मात्र कष्ट घ्यावे लागतील हे नक्की…

-कृष्णा सुनील वर्पे ( लेखक थोडक्यात न्यूज पोर्टलचे संपादक आहेत )