वेबसाईट हॅक करुन भाजपला धमकी; भाजप म्हणतं ती आमची वेबसाईट नाही… नेमकं काय आहे सत्य?

कोणत्याही संगणकीकृत यंत्रणांमध्ये हस्तक्षेप करण्याचे तसेच देखरेख ठेवण्याचे आणि मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचे अधिकार केंद्र सरकारने 10 तपास यंत्रणांना दिले आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सध्या जोरदार वाद सुरु आहे. अशाच भाजपला धक्कादायक असा एक प्रकार घडला आहे. BJP IT Cell नावाची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे.

हॅकर्सचं नेमकं काय म्हणणं आहे?- 

व्यक्तिगत संगणकावर लक्ष ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळेच ही वेबसाईट हॅक करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, असा संदेश हॅकर्सनी या वेबसाईच्या होम पेजवर झळकवला आहे. निवडणुकांच्या तोंडावर आम्ही ब्लॅक मनी बाळगणाऱ्या भाजप नेत्यांची नावं जाहीर करु, असा इशारा देण्यात आला आहे. 

भाजप आयटी सेल नावाची ही वेबसाईट कोणी हॅक केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

“भाजपच्या नेत्यांनी जेवढा काळा पैसा लपवून ठेवला आहे, आम्ही त्या सर्वांची नावं सार्वजनिक करु. आमच्याकडे भाजपाच्या काळ्या पैशांबाबतचे सर्व पुरावे आहेत. खासगीपणा हा आमचा अधिकार आहे. त्यात कोणीही हस्तक्षेप करता कामा नये. नियम बदला, जमत नसेल तर देश सोडा, नाहीतर परिणामांना सामोरे जा, असं हॅकर्सनी या संदेशात म्हटलं आहे. 

वेबसाईट आमची नाही, भाजपचा दावा-

भाजपच्या आयटी सेलची वेबसाईट हॅक, असं वृत्त माध्यमांमध्ये झळकलं होतं. मात्र भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. आमची अशा पद्धतीची कुठलीही अधिकृत वेबसाईट नाही, असा दावा त्यांनी केला आहे. आमच्या सर्व वेबसाईट सुरक्षित असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.

भाजपची नाही, मग वेबसाईट कुणाची?

हॅक झालेली वेबसाईट आमची नसल्याचा दावा भाजपच्या आयटी सेल प्रमुखांनी केला होता. त्यामुळे ही वेबसाईट आहे तरी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अमित मालवीय यांच्याच ट्विटमध्ये एका यूझरने ही वेबसाईट भाजप आयटी सेलची असल्याचा दावा केला. आपल्या दाव्याला पृष्ठी देण्यासाठी त्याने एक स्क्रीनशॉटही दिला. नागपूर भाजपचे आयटी सेल प्रमुख केतन मोहितकर यांच्या बायोमध्ये या वेबसाईटचा उल्लेख असल्याचं दर्शवण्यात आलं होतं.

केतन मोहितकरांनी यासंदर्भात एक नवं ट्विट करुन खुलासा केला आहे. नागपूर भाजप आयटी सेलची ही वेबसाईट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काही असामाजिक तत्त्वांकडून नागपूर शहर भाजप आयटी सेलची वेबसाईट हॅक करण्याचा प्रकार झालाय. आम्ही यावर काम करत आहोत. ही भाजप आयटी सेलची राष्ट्रीय वेबसाईट नाही. कृपया असं दाखवू नका, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

खरंच ही वेबसाईट भाजप आयटी सेलची नाही?

भाजपने ही आपल्या आयटी सेलची अधिकृत वेबसाईट नसल्याचा दावा केला आहे. नागपूर शहर भाजप आयटी सेलचे प्रमुख केतन मोहितकर यांनी ही नागपूर शहर भाजप आयटी सेलची वेबसाईट असल्याचं म्हटलं आहे. ही वेबसाईट कुणाच्या नावावर नोंद आहे याची माहिती घेतली असता ती केतन मोहितकर यांच्या नावावर नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेलची अधिकृत वेबसाईट नसल्याच्या दाव्यांना पृष्ठी मिळते.